Friday, October 23, 2020

ती एक देवी ....४

ती एक देवी ....४
ते गाव जरी भारतात असले तरी भारताच्या लोकशाहीशी ...राज्यघटनेशी..काहीही संबंध नव्हता . जणू काही नकाशावर दाखवण्यासाठी ते गाव होते. गर्द रानात.... देशाच्या सीमेजवळ .
सर्व काळे धंदे तिथे चालायचे.भारतातील आणि परदेशातील गुंडांचे आश्रयस्थान होते ते .पोलीस किंवा सैनिकही तिथे जात नसत.पण गावाबाहेर सर्व वेढा टाकून बसलेले असायचे . कोणी बाहेर आला आणि नजरेस पडला तर टिपला जायचा . गावात पंचायत राज्य होते . पोलीस नावालाच.चुकून कोणी गेलाच तर त्याचे शवही दिसत नसे जंगलातील प्राण्यांना आयतीच मेजवानी.
पण गावात उत्सव मात्र हौसेने साजरे व्हायचे . तेच तर मनोरंजनाचे साधन होते .नाचगणे आणि पार्टी करायला काहीतरी कारण हवेच ...
आताही नवरात्री चालू होत्या.गावात सर्व त्या दिवशीच्या रंगाचे ड्रेस घालून फिरत होते .रात्री गरब्याचा कार्यक्रम होताच . पण आज एक खास गोष्ट होती.....
सीमेपालिकडून काही लोक आले होते.अनेक देशांच्या पोलिसांना ते हवे होते . काहीतरी मोठा प्लॅन होता..
 लवकरच कुठेतरी काहीतरी भयानक घडणार याची कल्पना सर्वाना आली होती.त्यांच्या करमणुकीसाठी काही गायिका आणि नृत्यांगना येणार होत्या .
ठरल्याप्रमाणे गरबा सुरू झाला . आजच्या रंगाचे ड्रेस घालून स्त्री पुरुष गरब्यात रंगून गेले होते.त्यानंतर खरा खेळ चालू झाला . शहरातून ज्या काही प्रसिद्ध नृत्यांगना आल्या होत्या त्यातील दोघी खूपच भांबावलेल्या दिसत होत्या.जणू काही त्यांना जबरदस्तीने आणले होते.
आजच्या रंगाचा ड्रेस त्यांच्या देहयष्टीला शोभून दिसत होता . कधीही नुसत्या हाताने फाटेल अशी तंग चोळी....  मांड्या जेमतेम झाकल्या जातील असा छोटा स्कर्ट.. नजरेत व्याकुळ भाव ... कधी एकदा हे संपून घरी जातो असे झाले होते त्यांना....
नवीन आलेल्या पाहुण्यांसमोर त्यांचा खाजगी नाच सुरू झाला . पाहुण्यांच्या नजरेतील वासना त्यांचे अंग जाळीत होते.  पाहुणेही आजच्याच रंगाचे कपडे घालून बसले होते.
मध्यरात्र होत आली आणि नृत्य संपताच पाहुण्यांनी आपापली तरुणी निवडली. त्यात त्या दोघी होत्या . रात्री आपले काय हाल होणार या विचारानेच त्यांचा अर्धा जीव गेला होता . नजरेत मरण स्पष्ट दिसत होते .मुकाटपणे त्या पाहुण्यांच्या सोबत दिलेल्या खोलीत शिरल्या.
सकाळ झाली ..
काहीजण पाहुण्यांना उठवायला खोलीत शिरले आणि समोरील दृश्य पाहून हादरले .प्रत्येक खोलीत एकेक पाहुणा रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता .कोणीतरी एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत त्यांचा गळा चिरला  होता . आलेल्या सर्व तरुणी गायब झाल्या होत्या . संपूर्ण गावात त्या तरुणींचा शोध चालू झाला .
इकडे गावापासून काही अंतरावर एका खोलीत त्या तरुणी शांतपणे झोपल्या होत्या . यावेळी त्यांच्या अंगावर भारतीय सैन्यदलाचा गणवेश होता .
होय त्या देवीच आहेत .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment