Monday, October 19, 2020

ती एक देवी ...२

ती एक देवी ....२
"चल ग पोरी लवकर ...." प्रेमाने आपल्या दहा वर्षाच्या छकुलीकडे पाहत ती म्हणाली. नवरात्रीचा उत्साह सगळीकडे ओसंडून वाहत होता. आजच्या रंगाचा ड्रेस छकुलीच्या अंगावर खुलून दिसत होता . तिच्याही अंगावर आजच्या रंगांची साडी खुलून दिसत होती . घट्ट अंगावर बसणाऱ्या नऊवारीत ती सहज वावरत असे  डोंबारीच्या कलेत निष्णात होती ती . आता तिची छकुली ही तिच्याच पावलावर पाऊल टाकून तयार होत होती ..
आज शहर एका रंगाने उजळून निघाले होते . स्त्रियाच काय तर पुरुष लहान मुले ही त्या रंगाचे कपडे घालून फिरत होते .
तिने भर गर्दीतील एक जागा निवडली आणि छकुलीच्या मदतीने खेळाची तयारी केली.ठराविक अंतरावर बांबू बांधून त्यावर दोरी टांगली . बांबू पडणार नाहीत याची खात्री केली . साधारण आठ फुटावर ती दोरी बांधली होती . दोघीही  हवेत दोरीवरून चालण्यात एक्सपर्ट होत्या . त्यांची तयारी पाहून हळू हळू गर्दी जमू लागली. 
पुरेशी गर्दी जमताच त्यांचा खेळ सुरू झाला . छकुलीने हातात ढोल घेऊन बडवायला सुरवात केली आणि तीने सराईतपणे दोरीवरून चालण्यास सुरवात केली.वरून चालताना तिचे सगळ्या गर्दीवर लक्ष होते . कोण कोणाकडे पाहून सूचक इशारे करतय... तर कोण गर्दीचा फायदा घेत स्त्रियांशी लगट करतेय . तर काही जणांची पाकिटे कशी उडवली जातील याचीही तिला कल्पना होती. पण तिच्याकडे पर्याय नव्हता . गर्दीचा फायदा सगळेच घेतात .... आपल्याला ही गर्दीची आवश्यकता आहेच. हताश होऊन तिने निराशेने मान डोलावली आणि खेळ चालू केला . 
खेळ संपायला आला. छकुलीने हातात थाळी घेऊन गर्दीत फिरायला सुरवात केली आणि तिने सामान आवरायला.
अचानक छकुलीने संतापाने मारलेली किंकाळी तिला ऐकू आली . दचकून तिने पाहिले तर छकुली हातात काठी घेऊन एका तरुणावर धावून गेली होती . हातातील काठीने सपासप त्या तरुणावर वार करत होती . त्या तरुणांच्या बाजूलाच तिच्याच वयाची मुलगी अंग चोरून उभी होती .
एका क्षणात तिला काय झाले ते कळले . पण ती शांतपणे उभी राहिली. काठीने मारता मारता छकुलीच्या तोंडाचा पट्टा सुरू होता.
"लाज नाही वाटत पोरींच्या अंगाला हात लावायला ....?? घाणेरडा आहेस तू .. ."आजूबाजूचे ताबडतोब पांगले . तर काही त्याला बाजूला घेऊन गेले .काही क्षणात रस्ता रिकामा झाला . तिथे फक्त ती आणि छकुली उरले होते . भानावर येऊन छकुलीने हातातील थाळीकडे बघितले . थाळी रिकामी होती .
"आये... आज काहीच नाही मिळाले ग... "रडवेल्या आवाजात तिने सांगितले .
"नाही ग पोरी... आज जे काही मिळाले ते आयुष्यभर पुरेल मला ... " तिने छकुलीला जवळ घेऊन म्हटले . मुलीला दिलेली शिकवण आज कामी आली होती तिच्या . आकाशाकडे पाहून तिने हात जोडले ,
होय देवीच आहेत त्या .
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment