Saturday, October 17, 2020

ती एक देवी ...१

ती एक देवी ...१
त्या दोघीही बालपणापासूनच मैत्रिणी. एकत्रच आश्रमात वाढलेल्या.एकाच वयाच्या.नुकतेच तारुण्यात पदार्पण केले असल्यामुळे चेहऱ्यावरचा गोडवा लपत नव्हता.
आश्रमातील नियमानुसार रोज ठरलेले काम करायचे हे त्यांच्या अंगातच भिनले होते. दोघींनाही टापटीप नटण्या मुरडण्याची भारी हौस . कोणताही सण असो दोघींचा उत्साह बघण्यासारखा . आश्रमातील सगळेच त्यांचे कौतुक करायचे .
नवरात्र सुरू झाल्या की त्या जास्तच खुश.नऊ दिवस नऊ रंग वापरायचे . रात्री तालासुरात आरती .मग छोटा गरबा .एकत्र जेवण.खूप धमाल .
आज नवरात्रीचा पहिला दिवस . दोघींनी सकाळी उठून आजच्या रंगाचा ड्रेस घातला आणि एकमेकांना टाळी देत एकत्रच बाहेर पडल्या.
आज त्यांना लोकांकडून वर्गणी मागायचे काम दिले होते. घरोघरी ....रस्त्यावरील दुकानात ..येणाजाऱ्यांपाशी जाऊन वर्गणी मागायची . पावती फाडायची आणि धन्यवाद बोलून पुढे जायचे इतकेच काम....कोणावर रागवायचे नाही..उलट बोलायचे नाही. दोघीही या कामात हुशार होत्या . अर्थात हे काम करताना लोकांचे स्पर्श ,सूचक बोलणे समजायचे त्यांना . पण लक्ष न देण्याची सवय ही आपोआप लागून गेली होती त्यांना .
त्या फूटपाथवरच्या झोपडीत ती मोठ्याने रडत आपल्या आईशी भांडत होती . तिचे रडणे याना ऐकू आले . रडण्यावरून ती निश्चितच त्यांच्याच वयाची वाटत होती.कुतूहल म्हणून त्या दोघी झोपडीच्या दारात उभ्या राहिल्या.त्यांना बघून अचानक रडणे थांबले. 
आतून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला " काय हवंय आपल्याला ...."?? आवाजावरून ती प्रौढ वाटत होती बहुतेक त्या रडणाऱ्या मुलीची आई . दोघींनी अंदाज केला.
" काय झाले ताई ...?? ती रडते का ...?? एकीने धीर करून विचारले . दरवाजात अचानक दोघींना पाहून आतील स्त्री गप्प झाली .असेच होते आम्हाला पाहून  त्या दोघीही मनात म्हणाल्या .
"काही नाही हो ....म्हणे आजच्या रंगाचा ड्रेस हवाय . आता कुठून आणून देऊ तिला आजच्या रंगाचा ड्रेस आणि कोण बघणार आहे तिला ...  ती ही तुमच्यासारखीच ..." ती स्त्री त्रासाने म्हणाली . 
दोघीनी एकमेकींकडे पाहिले .  काहीतरी मनाशी खूणगाठ बांधून त्यातील एक म्हणाली " आई तुम्ही नका काळजी करू .. आजच्या रंगाचा ड्रेस मी घातला आहे . माझा ड्रेस द्या तिला .तिचा जुना ड्रेस मला द्या . पण मुलीला नाराज करू नका ...आणि आत शिरून कपडे उतरवू लागली .
"पण...."??? आई थोडी कचरत म्हणाली .
"पण बीण काही नाही .. दे मला तिचा ड्रेस ... आज मी घालेन उद्याचे उद्या ...". तिची मुलगी खुश होऊन म्हणाली.
काही न बोलता दोघीनी ड्रेस बदलले . त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून दोघीनी तिला आशीर्वाद दिला आणि बाहेर पडल्या.
थोडे पुढे जाताच त्यांच्या कानावर त्या स्त्रीची हाक ऐकू आली.त्या थांबल्या .
"तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही . तुम्ही स्वतः अंध असून माझ्या मुलीचे अश्रू पुसलेत ..तिला खुश केलेत ...."ती मनापासून म्हणाली.
"त्यात काय झाले आई ...?? आम्हालाच आमच्या बहिणीचे दुःख जाणवणार ना ....?? आमच्यामुळे ती खुश झाली यातच आनंद आहे आम्हाला ...."एकजण हसून म्हणाली .
"पण आजचा रंग हा नाहीच ...."ती अचब्याने म्हणाली .
"हो माहीत आहे आम्हाला . आयुष्यात काळ्या रंगाशिवाय कोणताही रंग माहीत नाही आम्हाला . जन्मापासूनच अंध आहोत आम्ही . पण त्याचे  दुःख करण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद मानून जगू . आम्ही मनातच ठरवतो आज आम्ही आजचा रंग नेसला आहे . मग आमची वागणूकही त्यासारखीच होते .आम्हीही इतरजणींसारखेच आम्हाला समजतो . आज तुमची मुलगी किती खुश झाली बघा . भले तिने दुसरा रंग नेसला असेल पण मनाने ती आजचाच रंग जगतेय. उद्यापासून रोज तिला त्या त्या रंगाचे कपडे द्या आज दिले तसेच  आणि हो कमीतकमी दहा रुपयांची पावती फाडा. आमच्या आश्रमाला देणगी म्हणून .....".असे म्हणत एकीने तिच्या हातात पावतीबुक दिले.
होय त्या देवीच आहेत 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment