Saturday, October 17, 2020

पत्थरातील पाझर

पत्थरातील पाझर
"शेवटचे कधी रडलायस तू ..."?? त्याच्या हातातून ग्लास खेचून घेत तिने विचारले.
तो फक्त हसला.
 तशी ती चिडली." बघ असेच वागतो तू नेहमी.. ती  घोट घेत म्हणाली.
खरे तर ती लाल शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट मध्ये एकदम भारी दिसत होती .शर्ट नको तिकडे एकदम घट्ट बसला होता.दोन उघडी बटणे कोणालाही घायाळ करू शकत होती.
 त्याने काही न बोलता सिगारेट शिलगावली.
 "इथे भरदिवसा स्त्रियांवर अत्याचार होतायत.कोवळ्या मुलीही यातून सुटत नाहीत .पण तू यावर कधीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीस .माहीत तरी आहे का आपल्या देशात काय चालू आहे ...??ती चिडून म्हणाली.
 "बरे मग.... ?? मी काय करू ...?? त्याने थंड आवाजात तिला विचारले.."कालच दिलेला प्रोजेक्ट पूर्ण केलाय आपण तोही वेळेच्या आधी.कितीतरी पैसे वाचविले आपण कंपनीचे. तेच आपले काम आहे.आता चार दिवस आराम करू...." तो सहज म्हणाला.
"हेच ... हेच....!! फक्त स्वतःचे काम.अरे पाचशे वर्षे लढून आपण ती जागा ताब्यात घेतली.आता तिथे सुरेख मंदिर बांधू ... किती अभिमानाची गोष्ट आहे ही....". ती पुन्हा उत्साहात ओरडली.
" नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे ..."त्याने हसून मान डोलावली.
" परत तेच .....तुला कधी आनंद झालेला दिसला नाही . कधी चर्चा करताना पाहिले नाही मी...."तिने टोमणा मारलाच.
तो पुन्हा हसला.
" दगड आहेस दगड ....!!  देशात काय चालू आहे याची काहीच माहिती नाही तुला .. उद्या त्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा  निषेध करण्यासाठी कॅडल मोर्चा काढतोय . तू येणार आहेस का ...."?? तिने खोचकपणे विचारले.
"नाही मी बाहेर चाललोय .."त्याने हसत उत्तर दिले .
"ए.. उद्या शॉपिंग करायची का ...??  बोनस तर देणार आहे कंपनी आपल्याला ..." तिने विचारले . 
"तीन महिने झाले हे कपडे घेऊन ... पुन्हा नवीन ?? त्याने स्वतःकडे आणि तिच्याकडे डोळे वटारत विचारले .
"घ्या .. यातही अरसिक तू .. माहितीय मला.पण आहेत ना पैसे...?? थोडी मजा करू की..मी देईन पैसे दोघांच्या शॉपिंगचे .... " तिने त्याचा हात हाती घेऊन म्हटले .
त्याने खांदे उडवून बिल मागितले . बिल घेऊन आलेल्या वेटरकडे पाहून अचानक त्याला कसलीतरी आठवण झाली .
"मित्रा.. मी दिलेला मोबाईल पोरगी वापरते ना ..?? काही अडचण असेल तर सांग . आणि तिचा नेट पॅक संपत आला की आठवण कर मला . भरेन मी .." भारावून जाऊन त्या वेटरने त्याचा हात हाती घेतला . 
ती आश्चर्याने बघत होती.
"ऑनलाईन अभ्यासासाठी त्याच्या मुलीकडे स्मार्टफोन नव्हता.माझा जुना फोन दिला मी . पण फोन असला तरी नेट पॅक भरावेच लागते ..मग ते ही भरतो मी" सहज स्वरात म्हणत तो बाहेर पडला.
बाहेर येताच त्याने कोपर्यावरच्या फुलवालीकडे जाऊन हार घेतला आणि पैसे पुढे केले . 
"ताई ... काय म्हणते छोकरी ...??? जातेना क्लास ला नेहमी .. "?? त्याने आपुलकीने विचारले.
" हो भाऊ.... रोज जाते आणि सरांना तुमचा नमस्कार ही सांगते. पोरगी गुणांची आहे.पटापट शिकते सर्व आता आजूबाजूच्या मुलींनाही शिकवते ... "त्याने हसून हात जोडले.
ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
"कोण पोरगी ..?? कसला क्लास ...??? आणि हा हार का घेतोस तू .. कधी देवापुढे फारसे हात जोडलेले पाहिले नाहीत मी .." तिने पुन्हा डोळे वटारले.
तो हसला..
"अग काही नाही ग .. तिला एक दहा वर्षांची मुलगी आहे. मागे तिची कोणीतरी छेड काढली.तशी ही टेन्शनमध्ये आली.मला कळले.. मग आपला सुहास आहे ना....?? कराटे क्लास घेणारा..??त्याच्याकडे पाठविले तिला कराटे शिकायला.आता निदान कोणी छेड काढली तर चार फटके तरी मारेल आणि हार कधी तरी घ्यावाच लागतो देवासाठी . तो मी हिच्याकडूनच घेतो ...."त्याने सहजपणे हात झटकत सांगितले .
बोलता बोलता दोघेही घराजवळ आले."उद्या जायचे का शॉपिंग ला ...."?? तिने विचारले .
"उद्या नको... अजून तीन दिवस थांब .. मी गावी चाललोय तीन दिवस . तिथल्या मुलांना कॉम्प्युटर शिकवणार आहे मी . शिवाय तिथल्या काही वाड्यांमध्ये फिरणार आहे मी...".त्याने कान पकडत सांगितले .
"आणि म्हणूनच तू तुझे जुने कपडे तिथे देणार आणि नवीन घेणार.माझे मन राखायला .. हो ना .... ?? तिने कमरेवर हात ठेवून नजर रोखत विचारले ."सर्व माहितीय मला. सर्वांना खुश ठेवायला बघतोस . स्वतः दगड बनून.चल आल्यावर फोन कर मला ... ती वळून चालू लागली . 
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नजरेआड होईपर्यंत पाहत बसला आणि स्वतःशी हसत घरात शिरला .टीव्ही वर नेहमीप्रमाणे ब्रेकिंग न्यूज चालू होत्या. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या निषेधार्थ उद्या कॅडल मोर्चा निघणार होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment