Tuesday, December 1, 2020

स्पर्श

स्पर्श
खरे तर स्पर्शाचे ज्ञान मला गर्भातच झाले होते. माझी वाढ होताना आईचा पोटावरुन फिरणारा हात फारच उबदार होता.
पण बाहेर आले तेव्हा डॉक्टरांचा स्पर्श एक आनंददायी आठवण होती . सुटकेसाठी धावून आलेला देव अशीही धारणा त्या स्पर्शात होती.
नंतर बाबांनी हळूच कुशीत घेतले तो स्पर्श जणू एका विश्वासाची अनुभूती होती.जगाच्या पाठीवर कुठेही कोणत्याही क्षणी हा स्पर्श माझ्यामागे उभा राहील हा विश्वास देत होता.
हळूहळू मोठी होत गेले तशी अजून स्पर्शाची भाषा कळू लागली. हात धरून शाळेत घेऊन जाणारा तो भावाचा स्पर्श . जणू रक्षण करण्यासाठीच त्याचा जन्म झालाय.
 आजीचा डोक्यावरून मायेने फिरणारा स्पर्श जगातील सर्व सुखे तिने आणून दिलीय हीच जाणीव करून देतात. तर काही चुकले तर कान पकडणारा आजोबांचा स्पर्श संस्कार घडवितात .
पण त्या शेजारच्या काकांचा स्पर्श नकोसा का वाटतो मला..??. त्यांचा पाठीवरून फिरणारा हात का अंगावर नकोसे वाटणारे शहारे आणतोय ...?? अंगावर पाल फिरतेय असेच का जाणवते मला .
कॉलेजमध्ये प्रियकराच्या मिठीत शिरल्यावर अंगावर मोरपीस फिरल्याचा आनंद देणारा गालावर गुलाबी लाली आणणारा स्पर्श... तर मित्राच्या मिठीत सुरक्षिततेची जाणीव करून देणारा स्पर्श...
पण बस आणि ट्रेनमध्ये शरीरावर नको त्या ठिकाणी होणारा किळसवाणा स्पर्श घरी येऊन आंघोळ केली तरी मनातून जात नाही .तर रस्त्यावरील भिकार्याचा स्पर्श होण्याआधीच अंग आक्रसून घेते.
लग्नाच्या पहिल्या रात्री शरीराचा रोम रोम फुलवीत जाणारा संपूर्ण शरीरावर फिरणारा नवऱ्याचा स्पर्श कधीच दूर होऊ नये असे वाटते.
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला उराशी कवळटाच पान्हा फुटणारा तो एक स्पर्श .
तर आयुष्य संपताच स्वकीयांनी पायाला हात लावून अनंतात विलीन करण्यासाठी केलेला स्पर्श .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment