Wednesday, December 2, 2020

द लास्ट गर्ल.... नादिया मुराद

द लास्ट गर्ल.... नादिया मुराद 
अनुवाद.... सुप्रिया वकील 
मेहता पब्लिकेशन
उत्तर इराकमधील कोचो गावातील यजिदी धर्माची ही तरुणी.याजिदी हा अल्पसंख्याक धर्म . इतर धर्मासारखीच त्यांचीही काही तत्वे आहेत. काही परंपरा आहेत. कोचो गावात ह्या धर्माचे बहुसंख्य लोक राहतात. धर्मांतर आणि लग्नाआधी कौर्मांयभंग या गोष्टी त्यांच्यासाठी निषिद्ध आलेत.
 सद्दाम हुसेनच्या अस्तानंतर आयसिस अर्थात इस्लामिक स्टेट तिथे प्रबळ झाली.हळूहळू ते उत्तर इराकच्या दिशेने सरकू लागले आणि एक दिवस त्यांनी या सुखी गावावर ताबा मिळवला.
 सर्वप्रथम त्यांनी पुरुष आणि स्त्रियांना वेगळे केले . नंतर एक मोठी कबर खोदून त्यांनी सर्व पुरुषांची गोळ्या घालून हत्या केली. नादियाचा एक भाऊ यातून कसाबसा वाचला . पण ती घटना त्याच्या मनावर शेवटपर्यंत कोरली गेली. नादिया आणि इतर स्त्रियांना दुसरीकडे हलविण्यात आले. पुढे नादिया आणि तिच्या आईची ताटातूट झाली. काही वर्षांनी एका सामूहाईक कबरीत तिच्या आईचा मृतदेह सापडला.
नादिया आणि इतर तरुणींना सेक्स गुलाम म्हणून विकले गेले . तिच्या मालकांनी तिच्यावर अमानुष बलात्कार आणि अत्याचार केले. तिला एका  माणसाकडून दुसऱ्या माणसाला विकले गेले. तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिले गेले.एक दिवस ती तिथून पळून गेली. एका  मुस्लिम कुटुंबाने तिला आसरा दिला इतकेच नव्हे तर तिला कुर्दस्थानातील सुरक्षित जागी पोचवायला मदत ही केली.
 त्यानंतर  नादियाने आपली  कथा जगाला सांगितली . तिच्यामुळेच संयुक्त राष्ट्राने कोचोमधील हत्याकांड ही वंशहत्या आहे हे अधिकृतरित्या मान्य केले. संयुक्त राष्ट्राने तिला सदिच्छादूत म्हणून मान्यता दिली. यजिदी लोकांवर अत्याचार करणाऱ्या आयसिसला शिक्षा व्हायला हवी अशी तिची इच्छा आहे . कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये असे ती म्हणते . हे सर्व भोगणारी मी जगातील शेवटची मुलगी ....द लास्ट गर्ल ...असावी.
हे पुस्तक नाही तर माणुसकीला काळिमा लावणाऱ्या घटनांची कहाणी आहे. आताच्या अत्याधुनिक युगात जगाच्या एका कोपऱ्यात इतके काही भयानक चालू असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. तिथल्या लोकांना फक्त सुखाने जगायचे आहे . सत्तेवर कोणीही येवो पण आम्हाला सुखाने जगू द्या असेच त्यांचे म्हणणे आहे पण त्यांची ही इच्छा ही पूर्ण होऊ शकत नाही .

No comments:

Post a Comment