Wednesday, December 9, 2020

फ्रिक्वेन्सी

फ्रिक्वेन्सी
दोन व्यक्तींची मैत्री जुळते म्हणजे काय ....??? इंजिनियरिंग किंवा विज्ञानाच्या भाषेत त्याला फ्रिक्वेन्सी जुळणे म्हणतात.तर संगीतावर प्रेम करणारे ट्युनिंग जुळणे म्हणतात.तर साहित्यिक लोक मन जुळणे म्हणतात .आमच्यासारखी सर्वसामान्य माणसे तर स्वभाव जुळतो असेही म्हणतात .
खरे तर प्रत्येक मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या बाबतीत फ्रिक्वेन्सी जुळतं नाही. काहीजणांचा मैत्री करण्यामागे विशिष्ट हेतू असतो. काही अपेक्षा असतात.
ग्रुपमध्येही एक दोनच असे मित्र मैत्रिणी असतात ज्याच्याशी आपली फ्रिक्वेन्सी जुळते.काही वाटले तर आपण त्याच्याशीच बोलतो. बाजूला राहणारा मित्र सोडून आपण त्याला भेटायला जातो. त्याच्याकडे आपले मन मोकळे करतो .
बरे ही फ्रिक्वेन्सी काहींशी ताबडतोब जुळते.जरुरी नाही की ती व्यक्ती आपल्या वर्षानुवर्षे सहवासात असली पाहिजे. काही तर पहिल्या भेटीतच आपल्याला आवडतात . त्याची देहबोली ...बोलणे... आपल्याला आवडून जाते . इसमे कुछ खास बात है असे आपण मनात म्हणतो आणि ती व्यक्ती आपल्या जवळची होते.
खरे तर या फ्रिक्वेन्सीची जास्त गरज सोशल मीडियावर भासते. फेसबुक किंवा व्हाट्स अप ग्रुपमध्ये बरेचजण असतात पण त्यातील काही मोजकेच आपल्याला आवडत असतात .त्यांच्याशी बोलणे आपल्याला आवडते . त्यांचे नंबर ही आपण सेव्ह केलेले असतात. फेसबुकवर ही तेच ... हजार मित्र आपल्या यादीत असतात पण त्यातले किती आपल्याशी कनेक्ट असतात ...?? काही तर लिस्टमध्ये आहेत हे ही आपल्याला माहीत नसते . पण एखादी व्यक्ती असतेच जी आपल्या पोस्टवर कधीही रिऍक्ट होत नसली तरी आपल्याशी इनबॉक्समधून बोलत असते .तर काही बरीच वर्षे आपल्या सोबत वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असतात आपल्याला ओळखतही असतात पण त्यांच्याशी का कोण जाणे आपली फ्रिक्वेन्सी जुळत नाही . त्यातील काहीजण आपल्या फ्रेंडलिस्टमध्येही नसतात .
असे म्हणतात की मैत्री सात वर्षे टिकली तर आयुष्यभर टिकते . सुरवातीच्या काळात नेहमी तासनतास बोलणारे पुढे हळू हळू कमी बोलू लागतात पण याचा अर्थ असा नव्हे त्यांचे विषय संपलेले असतात . त्यांची मैत्री अधिक गहिरी होत जाते एकमेकांवर हक्क दाखविला जातो. अधिकार येतो. कधीही केव्हाही बोलू शकतो आपल्या मनातील भावना शेयर करू शकतो इतकी दोस्ती घट्ट होते.
पण काहीजणाशी अनेक दिवस बोलूनही फ्रिक्वेन्सी जुळत नाही . ती अनेकवेळा तुटत जाते. दोघेही आपल्यापरीने फ्रिक्वेन्सी मॅच करायचा प्रयत्न करत असतात पण नाही जुळत .
असो माझ्याशी बरेचवेळा असे घडते . तुमच्या बाबतीत असे घडते का ....????
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment