Tuesday, December 29, 2020

नाईट ..... एली वायझल

नाईट ..... एली वायझल 
अनुवाद....... आशा कर्दळे
मेहता पब्लिशिंग हाऊस
हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी.
नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भट्टीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली.
नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील  पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे.
छळछावणीतील  प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो.
सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय.
एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले.
हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही.
मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. 
या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली .
लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला .
अंगावर काटा आणणारे आत्मकथन

No comments:

Post a Comment