Tuesday, June 25, 2024

तो आणि ती

तो अस्वस्थपणे ब्रिजवर तिची वाट पाहत उभा होता. सारखी नजर घड्याळाकडे जात होती आणि भरून येणाऱ्या ट्रेनकडे. शेवटी ती त्याला दिसली. धावतपळत, लोकांचे धक्के चुकवत येणारी. दुरूनच एकमेकांची नजरानजर झाली आणि अपेक्षित हास्य दोघांच्याही चेहऱ्यावर फुलले.चेहऱ्यावर दिसणारा थकवा आणि कंटाळलेले भाव कुठच्या कुठे निघून गेले. ती जवळ आली. "किती हा उशीर"? ती गोड हसून "सॉरी" म्हणाली. तिच्या हास्याने त्याचा राग क्षणात विरघळला "नेहमीचे आहे तुझे,माझ्या आधी कधीच येणार नाहीस " तो लटक्या रागाने बोलला.

दोघेही बाहेर पडले "कुठे जाऊया "?? "माहित नाही, कुठेही चल, दोघे एकत्र आहोत हेच खूप आहे माझ्यासाठी" ती बोलली. मग दोघेही चालत निघाले. आज त्याला कोणाशीही कसलाही वाद घालायचा नव्हता म्हणून रिक्षा, टॅक्सी काही नको. म्हणून चालतच निघाले. न विसरता त्याने थांबून 10 रु चे शेंगदाणे घेतले "अरे वा... आज पगार झाला वाटते, म्हणून ही चैन का ?? तिने चिडवले. त्यानेही हसून मान डोलावली.

समोरच पार्क होता. मोकळ्या बाकावर बसले. काहीवेळ निःशब्द शांतता. वादळापुर्वीची नाही बरं! वादळ शमल्यानंतरची. तसेही रोज घरी एकमेकांच्या सहवासात असायचे पण मोकळा वेळ कधीच मिळायचा नाही. जे काही बोलायचे ते चेहऱ्यावरून आणि डोळ्यातून. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर भेटायची संधी मिळाली होती. त्यामुळे काही सुचत नव्हते.

हळूच त्याने बॅगेतून गजरा काढला तिच्या समोर केला "हे कशाला आता??" पण चेहऱ्यावरचा आनंद काही लपला नाही. "किती खर्च कराल? आईंची औषधे घेतलीत का?" असे म्हणून पाठमोरी वळली. त्याने तो कसातरी तिच्या केसात माळला. आज कोणाचीच भीती वाटत नव्हती. जे मनात येईल ते पूर्ण करणार होता तो."अजूनही साधा गजरा माळता येत नाही " असे बोलून तीने तो व्यवस्थित केला. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला भरून आले, एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटला. आजही काही बोलायचे नव्हतेच तिच्या सहवासाचा आनंद लुटायचा होता फक्त. तिचीही अवस्था वेगळी नव्हती.

वन रूम किचनच्या त्या खोलीत आयुष्य गेले. सासू , सासरे, नणंद आजूबाजुला. सकाळी 5 वाजता दिवस चालू व्हायचा. स्वतःची तयारी ,मग नवरा, मग मुलगा, दुपारचे जेवण करून ऑफिस ला निघायची, त्याचेही काही वेगळे नव्हते. घाई घाईत बाहेर पडायचे. बरे तिच्या ऑफिसला मोबाईल बंदी त्यामुळे संपर्क नाहीच.रात्री उशिरा घरी यायचे. आणि ही येता येता रात्रीच्या जेवणाची तयारी करत यायची. आल्या आल्या सगळ्यांचे चहा पाणी मग जेवणाची तयारी. तो एका कोपऱ्यात बसून तिच्या हालचाली पहायचा. त्याचे आपले बरे होते. हातात मोबाईल घेऊन टाईमपास करायचा पण तिला टाईमपास हि नव्हता. मध्येच ती त्याच्याकडे बघायची. त्याने पाहिले कि गोड हसायची. तिच्या ह्याच हसण्यावर विरघळलायचा तो. घरात कधीही बोलणे व्हायचेच नाही. खूप काही असायचे त्यांच्या मनात पण संसाराच्या या पसाऱ्यात काही सुचत नव्हते. दोघांनीही खूप स्वप्ने बघितली होती आणि बघत राहणार. पण सध्या एकमेकांशी मोकळेपणानी आणि निवांत बोलणे हे देखील एक स्वप्न झाले होते. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी जायचो. ती सर्व आवरून बाजूला यायची तेव्हा त्याची मध्यरात्र झालेली असायची.

शेवटी त्याने ठरविले काही झाले तरी बाहेर भेटायचेच. त्याने तिला सांगितले. पहिल्यांदा तिने अडचणींचा पाढाच वाचला पण शेवटी तयार झाली. पण त्यासाठीही आठवडा गेलाच. रोज काहीना काही काम निघत होते. तिचीही घालमेल त्याला दिसत होती. पण सर्व सोडून भेटणे तिला पटत नव्हते. रोज त्याच्या जवळपास असणारा वावर बघून ती समाधान मानायची. शेवटी आज तो दिवस आलाच. ते दोघेही गप्प बसून  होते काय काय बोलू हेच कळत नव्हते. मध्येच एकमेकांकडे बघून हसायचे. शेंगदाणे तोंडात टाकायचे.

एकमेकांसाठी वेळ दिला याचा आनंदच ते उपभोगत होते, इथे शब्दांना थारा नव्हता. सहवासाचे सुख दोघेही  लुटत होते. तिने अलगद आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकले.हा दिवस संपूच नये असेच दोघांनाही वाटत होते. एक मूकपणे अश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त करीत होती तर दुसरा आवंढा गिळत येणारे अश्रू थोपावत होता. शेवटी बऱ्याच वेळाने दोघेही उठले. काही न बोलता एकमेकांच्या हातात हाथ गुंफून चालू लागले.

बाजारात येताच तिच्यातील गृहिणी जागी झाली "उद्यासाठी भाजी घ्यायची आहे, मसालाही संपत आलाय" असे म्हणत दुकानात शिरली. खरेदी आटपून दोघेही घराजवळ आले. तो थांबला आणि तिचा हाथ पकडून म्हणाला "माफ कर मला, सध्यातरी इतकेच देऊ शकतो तुला."  त्याच्या हातावर हात ठेऊन ती पुन्हा गोड हसली त्या हास्यातच खूप काही दडले होते. एक आनंदाचा ठेवा घेऊनच दोघे घरात शिरले परत आयुष्याला सामोरे जाण्यासाठी.

No comments:

Post a Comment