Tuesday, June 25, 2024

सैंधव

SAINDHAV
सैंधव
सैंधव चंद्रप्रस्थ पोर्टवर एक क्रेन ऑपरेटर म्हणून काम करतो.त्याला सहा वर्षाची एक गायत्री नावाची मुलगी आहे .शेजारची मनोग्न तिची काळजी घेते .तिचे सैंधववर प्रेम आहे.
एक दिवस शाळेत खेळत असताना अचानक गायत्रीला चक्कर येते आणि तपासणी केल्यावर तिला स्पाईनल मस्क्यूलर अट्रोपी अर्थात एसएमए नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे आढळून येते. या आजारावर एकच औषध आहे आणि त्याची किंमत साधारण सतरा कोटी आहे असे डॉक्टर सांगतात.चंद्रप्रस्थ शहरात अशी दीडशे मुले आहेत असे त्याला सांगण्यात येते.
चंद्रप्रस्थमध्ये एक तरुण अतिरेकी पकडला जातो.त्याच्याकडून शहरात वीस हजार अशी तरुण मुले अतिरेकी बनली आहेत अशी माहिती मिळते. शस्त्रास्त्रे पैसे आणि अंमली पदार्थांनी भरलेले एक जहाज चंद्रप्रस्थ पोर्टवर पकडले जाते .
विकास मलिक आणि मित्रा माफियाचे हस्तक .त्यांचेच जहाज पोर्टमध्ये अडकलेले आहे. ते जहाज कोणी पकडले हे मित्राला कळते आणि तो हादरतो .
सायको पूर्वी माफियासाठी भाडोत्री मारेकरी म्हणून काम करायचा .हा इतका खतरनाक होता की त्याचे नाव ऐकून सर्वच घाबरून जायचे.आता तो शांतपणे आपले जीवन जगतोय असे त्याच्यावर नजर ठेवणारे सांगतात .पण त्याची छेड काढली तर तो परत येईल याची भीती सर्वाना आहे .मित्राने आपला मुलगा ही त्याच्या भीतीने परदेशी पाठवलाय .
हाच सायको या जहाजाच्या मागे आहे याची खात्री विकास मालिक आणि मित्राला आहे .
कोण आहे हा सायको ?? त्याचा सैंधवशी काय संबंध ? सैंधव मुलीच्या औषधासाठी सतरा कोटीची व्यवस्था करेल का ?
टिपिकल साऊथचा सिनेमा असेच या चित्रपटाला म्हणावे लागेल.प्रचंड गोळीबार ,अत्याधुनिक हत्यारे , भरधाव पाठलाग याने या चित्रपट भरलेला आहे.
व्यंकटेशने आपल्या वयाला साजेशी सैंधवची भूमिका केली आहे .तो एक्शन स्टार म्हणून शोभून दिसतो. विकास मलिकच्या भूमिकेत नवाझुद्दीन सिद्दीकी चीड आणतो.मित्राची छोटी भूमिका मुकेश ऋषीने सहज केली आहे.
ज्यांना हाणामारी आवडते त्यांना हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.

No comments:

Post a Comment