Monday, March 6, 2017

प्रेमविवाह

"भाऊ मी येतोय ",विक्रमचा फोन आला.
" ये पण काहीतरी घेऊन ये खायला ,घरात काही बनवणार नाही अशी सौ बोलली आहे" .  मी हसत म्हणालो .
"ते महत्वाचे नाहीय ,वेगळा प्रॉब्लेम आहे"!!
त्याच्या आवाजातील काळजी ऐकून मी गंभीर झालो . विक्रम आणि इतका गंभीर ???? नक्कीच काहीतरी  गंभीर प्रकरण आहे . थोड्या वेळाने तो आला आणि शांतपणे बसला .सौ हि काळजीने माझ्या बाजूला येऊन बसली .
"अरे यार, आमच्या चिंगीने घोळ केलाय "!!
" काय केले तिने" ?? मी काळ्जीनेच विचारले .
चिंगी  उर्फ चैत्राली ,विक्रमाची भाची हुशार MBA झालेली. एका कंपनीत 35000 रु पगारावर काम करते . अतिशय हुशार लाघवी आणि प्रेमळ स्वभावाची .
"अरे तिचा मित्र आहे एक .बाहेरच्या जातीचा आहे . बरीच वर्षे एकमेकांना ओळखतात .तिच्या घरीही येणे जाणे आहे .  त्यामुळे घरचेहि ओळखतात त्याला चांगले . त्याने हिला मागणी घातली लग्नाची ".
"अरे वा छानच आहे मग ,पुढे काय ?? मी खुश होऊन म्हटले
" पुढे तोच तर घोळ आहे . हि म्हणते मी अजून विचार केला नाही .निर्णय घेतला नाही" .
" म्हणजे काय" ?? इतकी वर्षे ओळखतात ना एकमेकांना तरी अजून निर्णय घेऊ शकत नाहीत ?? सौ. च्या आवडीचा विषय आला तेव्हा तिला कंठ फुटला .
झाले !!आता काही नाश्ता मिळणार नाही याची खात्रीच पटली. 
"बघांना वहिनी तेच तर सांगतोय मी. मुलगा चांगला आहे पण संसार करायचा तर बाकीच्या गोष्टी पाहायला नको ?आज तिला दुखवायचे नाही म्हणून तिची प्रत्येक गोष्ट उचलून धरतोय  तो .पण पुढे संसार आहे .त्यात हे चालणार आहे का ??
" म्हणजे ?? मी  कुतूहलाने विचारले
"अरे मुलगा साधा पदवीधर ,पुढचे शिक्षण अर्धवट सोडलेले ,घरात आई वडील . वडील हार्ट पेशंट ,तर आई सतत आजारी .साधा चहा करायला जमत नाही . लहान भाऊ इंजिनीरिंग करतोय . त्यात ह्यांच्या समाजात मुली फारश्या नोकरी करीत नाहीत ".
"देवा "!!! सौ काळजीने उद्गारली .
तिचा स्वर ऐकून माझी चहाची आशाहि मावळली .
" मग कठीण आहे हो भाऊजी."
  "बरे मुलगा काय करतो ?? माझा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न .
" तो जॉब करीत होता साधारण 20000 रु .पगार होता  नंतर शिक्षणासाठी जॉब सोडला. आता कसला तरी बिझनेस करतोय .
"कसलातरी" ??? मी चिडून विचारले.
" ए भाऊ, तू नीट विचार रे ".चहाची आशा मावळल्याबरोबर  विक्रमहि चिडला होता .
" एक सांग विकी तुमचे काय मत आहे" ??
"अरे आमचा तर विरोध आहे .प्रेमविवाहला आमचा विरोध नाही पण लग्नानंतर तिची ससेहोलपट होऊ नये असे वाटते .  काय काय करेल ती ?? नोकरी करेल ,सासू सासर्यांची सेवा करेल ,दिराचे कपडे धुवेल ,आणि नवर्यावर प्रेमही करेल ?? शक्य आहे का हे 24 तासात ?? बरे नोकरी सोडली तर खाणार काय हे ?? कसे भागेल यांचे ?? आणि तरीही या बाईसाहेब म्हणतात अजून निर्णय नाही घेतला .
विक्रमचा आवाज चढला .आज बाहेरच चहा नाश्ता करायचा आणि तोही माझ्याच पैशांनी हा निर्णय मी ताबडतोब घेतला . इतक्यात सौ म्हणाली" भाऊजी बरोबर आहे तुमचे. आपल्यावेळी असे नव्हते .एकत्र कुटुंब होते त्यामुळे सर्व एकमेकांना सांभाळून घ्यायचे पण हल्ली वेगळा संसार आणि तोही मोजकाच त्यामुळे नवी नवलाई संपली कि संसाराचे चटके चालू होतात . पैश्याची ओढाताण सुरु होते  . पिझा बर्गर ऑर्डर करून खाणाऱ्या मुली फार काळ हे सहन नाही करू शकत . त्यात सासू सासर्यांना सांभाळणे म्हणजे कठीण हो " माझ्याकडे तिरकी नजर टाकत ठसक्यात म्हणाली .
" विक्रम फारच गंभीर विषय आहे आपण बाहेर जाऊन बोलू ". मी माझे शेवटचे अस्त्र काढले .
तशी सौ . म्हणाली," हो चला मी पण येते . बाहेरच खाऊ ,नाहीतरी मला कुठे मिळते बाहेर पडायला ".
हा ही वार फुकट गेला शेवटी .
" हे बघ विक्रम तू बहिणीला घे आणि पहिला जाऊन त्या मुलाशी चर्चा कर  . त्याला तुमच्या मनातले सर्व प्रश्न विचारा .तो काय म्हणतो, कोणती आश्वासने देतो ती नीट ऐका . मग चिंगीशी  बोला तिला सर्व तुमच्या शंका विचारा तिला प्रश्न करा . मग दोघांना एकत्र बसवा आणि चर्चा करा . त्यातून जो निर्णय होईल तो घेऊन तिच्या आई वडिलांशी चर्चा करा .  तुम्हा दोन्ही कुटुंबात मोकळी चर्चा व्हायला पाहिजे . लपवाछापवि नको . म्हणजे उद्या काही झाले तरी दोन्ही कुटुंबाची जबाबदारी राहील.
"आणि त्यांनी नाही ऐकले तर ?? विक्रमच्या स्वरात काळजी डोकावली.
" मग नंतरची परिस्थिती आणि परिणामाना  तेच जबाबदार राहतील .हे बघ विकी मुले मोठी आहेत. पण ते फक्त आताचच विचार करतायत . मुलगी द्यावी श्रीमंतकडे आणि सून आणावी गरीबाकडली असे म्हणतात . मुलीच्या संसाराची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटते . संसार केवळ प्रेमावर चालत नाही तर संस्कार आणि पैसा हि लागतो . त्यांना भविष्याची जाणीव आपण करून द्यायला पाहिजे .दूरच कशाला हिच्या मैत्रिणीच्या मुलीने प्रेमविवाह केला .छान चालू होते  सगळे .मुलगीही  झाली .पण आता कुरबुरी चालू झाल्या . त्यादिवशी घरी येऊन हिला म्हणाली" मावशी खूप मोठी चूक केली मी लग्न करून . तेव्हा तुम्ही या गोष्टीचा नीट विचार करावा असे वाटते आणि आपसात चर्चा करूनच हा प्रश्न सुटेल . चिंगी समजूतदार आहे म्हणून  निर्णय घ्यायला उशीर होतोय. तुम्ही साथ द्या तिला .हळू हळू समजेल ती . हो! आणि कसे समजवायचे हे तुम्हीच ठरावा दुसर्यांना घेऊ नका" .
हे ऐकून विक्रम विचारात पडला .थोड्यावेळाने त्याने मान डोलावली आणि सौ. ला म्हणाला ",चला वहिनी आज बाहेर नाश्ता देतो तुम्हाला ".

(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment