Friday, March 24, 2017

डॉक्टर

आज गणेश चतुर्थी .मी लवकर उठून काकांकडे निघायची तयारी करत होतो . इतक्यात विक्रम आत शिरला . त्याचा चेहरा पाहूनच समजलो गंभीर प्रसंग आहे .
"भाऊ चल रवीला घेऊन हॉस्पिटल मध्ये जाऊ ,त्या दिवशी त्याला बाईकने धडक दिली होती तो हात अजून सुजलाय ".
म्हटले ",ओके ,फ्रॅक्चर असेल तर बांधून येऊ".
.आम्ही त्याला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये शिरलो तेव्हा सकाळचे साडेदहा झाले होते . OPD  मध्ये  त्याचा नंबर लावून बसलो .थोड्यावेळाने चेकिंगला घेऊन गेले .x रे रिपोर्टमध्ये त्याच्या हाताचे फ्रॅक्चर मोठे दाखवत होते .डॉक्टर ने सांगितले  ऑपरेशन  करून पट्ट्या टाकाव्या लागतील. प्रथमोपचार केल्यामुळे रवीला बरे वाटत होते .तो शांतपणे बसून होता .आम्ही अस्वस्थपणे आमचा नंबर कधी येईल याची वाट पाहत होतो .
दोन तरुण डॉक्टर तिथे ड्युटीवर होते . ते सतत आतबाहेर करीत होते . गर्दीमुळे त्यांना प्रत्येकाला उत्तर देता येत नव्हते .आम्हाला सांगितले वेळ आली कि बोलावू आत आणि परत आत निघून गेले . इथे विक्रमाची अस्वस्थता वाढत होती . वाट बघण्यासारखे दुसरे कंटाळवाणे काम नाही . शांतपणे रवीला झोपलेले बघून तो मध्येच शिव्या घालत होता .
बाहेर  रुग्णांची सख्या वाढत चालली होती. दुपारी दोन वाजता मी सौ. ला फोन करून सांगितले  पूजेला येत नाही तुम्ही आवरून घ्या . मध्येच एक डॉक्टर बाहेर गेला आणी पाच मिनिटांनी आत आला. येताना त्याच्या हातात छोटे पार्सल होते मी हसून मानेने खुणावले तर हसून म्हणाला "वडापाव .
शेवटी रात्री 11 वाजता एका रुग्णाच्या नातेवाईकाचा संयम संपला . बाहेर आलेल्या डॉक्टरच्या अंगावर  धावून जात तो म्हणाला "सकाळी अकरा  वाजल्यापासून माझी आई ऑपरेशनसाठी इथे बसून आहे पण तुम्ही तिला अजून आत घेतले नाही .काही सांगत नाही किती वेळ आम्ही बाहेर उभे राहणार ?? .तसा तो डॉक्टर त्याला प्रेमाने म्हणाला", भाऊ थोडा वेळ थांबा .आतमध्येहि इतर ऑपरेशन चालू आहेत .ते झाले कि घेऊच "
",कसले ओपेशन चालू आहेत ??,नुसते टाईमपास करताय तुम्ही ?? तस तो डॉक्टर खवळला त्याची प्रेमाची भाषा संतापाने घेतली .शेवटी तरुण रक्त ते .
",ए !!!तोंड आवर ,जरा आत येऊन बघ काय चालू आहे . इथे पहिल्यांदा सिरीयस पेशंट ,मग लहान मूल आणि मग इतर पेशंट असे प्राधान्य दिले जाते . आता आतमध्ये एका लहान मुलाचे ऑपरेशन चालू आहे आणि त्यात काही समस्या निर्माण झाली  आहे .दोन तासाचे ऑपरेशन चार तास झाले तरी चालू आहे .आमचे सिनियर डॉक्टर स्वतः उभे आहेत तिथे .दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आईचे  तब्बेत इतकी सिरीयस  नाही कि तिचे आजच आताच ऑपरेशन व्हायला पाहिजे ,ते भाऊ बघ ," माझ्याकडे बोट करून तो म्हणाला ",सकाळी  दहा वाजल्यापासून ते पेशंट बरोबर आहेत पण अजून एकही शब्दांनी त्यांनी विचारले नाही आम्हाला ".
त्याने माझ्याकडे  बघितले मी हसून फक्त मान डोलावली. खरे तर माझाही संयम  सुटत चालला होता .पण डॉक्टरांच्या सांगण्याने माझे समाधान झाले शिवाय सकाळपासून दोघांचीही धावपळ मी पाहत होतोच . तस  तो नातेवाईक शांत झाला .
रात्री साडेअकरा वाजता त्यांनी रवीला आत घेतले आणि विक्रम कोपऱ्यात जाऊन बाकावर आडवा झाला आणि मी चहाचे घुटके घेत बसलो. रात्री एकला त्यांनी मला काही औषध आणायला पाठविले .परत पहाटे साडेतीनला दुसरी औषध .पहाटे चारला ब्लड बँकेत जाऊन आणलेले रक्त परत करण्यास सांगितले .
सकाळी सहा वाजता त्यांनी आम्हा दोघांना  आत बोलावले आणि पेशंट ला xरे काढायला घेऊन जा असे सांगितले . मी आणि विक्रम रवीला स्ट्रेचरवर ठेवून x रे काढायला गेलो . अर्ध्या तासाने परत घेऊन आलो . डॉक्टरने ओके म्हणून रिपोर्ट दिला आणि प्लास्टर करायला पाठविले . पण प्लास्टर करणारा शिफ्ट संपल्यामुळे निघून गेला होता म्हणून डॉक्टर स्वतः पुढे आला आणि आम्हाला मदतीला घेऊन प्लास्टर पूर्ण केले . तो पर्यंत सकाळी साडेसात झाले . आम्ही दोघांनीच रवीला आठव्या मजल्यावरील वॉर्डमध्ये ऍडमिट केले आणि घरी निघालो . निघताना ते दोन्ही डॉक्टर चहा पिताना दिसले त्यांना बघून आम्ही हात हलविला तसे त्यांनीही  हसून प्रतिसाद दिला .
मग परत आंघोळ ,नाश्ता करून आम्ही दोघे हॉस्पिटल मध्ये हजर झालो तर हे दोघेही वॉर्ड मध्ये राऊंड मारायला हजर होतेच .
मी न राहवून त्यांना विचारले ",डॉक्टर तुमची नक्की ड्युटी किती आहे ??
ते हसून म्हणाले ",आम्हीच विसरून गेलो आमची ड्युटी ,इथे इतके पेशंट असतात कि त्यांची तपासणी करण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नाही ,आणि रिकामा वेळ मिळाला तर आपण इलाज केलेला पेशंट कशी प्रगती करतोय हे बघण्यात  वेळ जातो .  ह्या लोकांचे जीवन मरण आपल्यावर आहे हि जाणीव आम्हाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. त्यातही तुमच्यासारखे समजूतदार माणसे असतील तर त्रास कमी होतो पण अर्धवट माणसे भेटली कि त्यांना समजावण्यातहि वेळ निघून जातो . सगळ्यांनाच वाटते आपला माणूस पहिला बरा व्हावा .त्याना त्यांचे सण साजरे करायचे असतात ,पार्ट्या करायच्या असतात ,तर घरची जबाबदारही  स्वीकारायची असते आणि त्यात चूक झाली तर खापर इलाज करणार्यांवर फोडले जाते . आता काल त्या मुलाने आईच्या ऑपरेशन साठी किती गोंधळ घातला,एक दिवस  ऑपरेशन  पुढें गेले असते तर  काही फरक पडणार नव्हता .शिवाय तिच्या काही टेस्ट  थोड्या निगेटिव्ह निघाल्या . आता सर्व हे त्या मुलाला सांगत बसू कि आत अडकलेल्या पेशंट वर इलाज करू ?? पण लोकही खूप भावनिक झालेली असतात त्यांना आपला माणूस हॉस्पिटल मध्ये आलेलाच सहन होत नसतो आणि मग काही उलट घडले कि राग आमच्यावर काढतात .
इतक्यात स्पीकरवरून त्यांना कॉल आला आणि ते OPD निघाले. विक्रम माझ्याकडे वळून म्हणाला "आयला भाऊ खरेच मूर्ख आहे मी .माझे बघताना इतरांचे काय होत असेल याकडे लक्षच देत नाही .

No comments:

Post a Comment