Sunday, March 26, 2017

मैत्री

काल रात्री सुखरूप घरी पोचलो . सुखरूप यासाठीच की सकाळी जाग आली तेव्हा घरच्या अंथरुणात होतो . बऱ्याचदा असे होते कि बिल मागविले की पुढे काय होते हे मला  कळतच नाही . त्यामुळे कालचे बिल मागविणे आणि सकाळी जाग येणे यामध्ये काय घडले  ते आठवत नव्हते.
नेहमीप्रमाणे आवरले सौ. नेहमीप्रमाणेच शांत होती. पण आज जास्त शांत वाटते का ?? की हे माझ्या मनाचे खेळ आहेत ??की  हि वादळापूर्वीची शांतता आहे  ?? असावी कारण टेबलवरचा ग्लास दोन वेळा खाली पडला . नशीब आज कामावर जायचेच होते .घरी असतो तर पूर्ण दिवस असे आवाज ऐकण्यातच गेला असता . मला माझ्या मित्रांबद्दल सहानुभूती आहे  जे काल माझ्याबरोबर  होते आणि ज्यांना आज सुट्टी आहे .
पण काय करणार  बरीच वर्ष न भेटलेले मित्र काल  भेटले  . सुदर्शन उर्फ पेंड्या बऱ्याच वर्षांनी अमेरिकेतून आला .साला अजून आहे तसाच आहे ,शरीरात आणि स्वभावात हि फरक  पडला नाही . प्रत्येक शब्द विचार करून बोलणारा.मनीष तर लग्नानंतर भेटलाच नाही आणि कॉन्टॅक्टमध्येही नव्हता . तोहि आला .इतकी वर्ष झाली पण चेहऱ्यावरचे हास्य बदलले नाही .नाही पंच मारायची सवय.. ठाण्यात असला तर प्रमोद उर्फ पम्या नक्कीच येतो भेटायला .अर्ध आयुष्य देश विदेशात फिरतीवर असलेला हा माणूस एकदम पॉईंट टू पॉईंट बोलतो ,स्पष्ट बोलतो . रेल्वेत नोकरीत असणारा विवेक खरा मितभाषी पण आपली मते बिनधास्त मांडणारा आणि शब्द दिला तर त्याप्रमाणे वागणारा . एकदा येतो बोलला कि येणारच . तर किरण आला कि पार्टीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेणार  .  त्याची मतेही ठाम आणि विचार करायला लावणारी .आमचे सुनील कधीतरी येतात पण नवीन काहीतरी शिकवून जातात . समोरच्या वेटरवर छाप कशी पडावी हे यांच्याकडून शिकावे .संजय भेटायला नेहमी उत्सुक पण लांब प्रवासामुळे नेहमी शक्य होत नाही रात्री उशीर होतो . पण एकदा ठरले कि सगळ्यांशी  संवाद साधण्याचे काम त्याच्या  हाती . संतोष तर समाजकार्यात बिझि झालाय . पण आमच्याही स्टार्ट गिविंग फौंडेशनच्या कामात खूप ऍक्टिव्ह असतो .समाजकार्य ,स्वतःचे काम ,पक्षाचे काम यामध्ये दिवस कसा निघून जातो तेच काळात नाही त्याला .  पण तरीही एकदा येतो म्हणाला की हजर . अजितही नोकरी एकीकडे ,घर एकीकडे उशिरा सुटणार म्हणून शक्यतो नेहमी येणे टाळतो ,पण कोणाच्या घरी कार्य असेल ,कोण गंभीर आजारी असेल ,कोणाचे निधन झाले असेल तर हा येणारच .पहिल्यापासून शांत आणि संथ त्याची कितीही खेचा हा आपला शांतपणे हसून मान डोलावणार .तसे मी ,राजेंद्र ,मिलिंद रेग्युलर भेटणारे त्यामुळे आमची उपस्थिती पक्की होतीच .
सांगायचं मुद्दा हा कि आज जवळ जवळ तीस वर्ष आम्ही एकत्र एकमेकांच्या संपर्कात आहोत. आज जो तो स्वतःचे स्थान निर्माण करून आहेत ,त्यांना त्यांच्या ठिकाणी आणि समाजात योग्य मान मिळत आहे तरीही एकत्र आलो कि त्याकाळात निघून जातो  तिथे फक्त आम्ही मित्र असतो . कोण मोठा कोण छोटा हा इगो नसतो .असते ती निव्वळ मैत्री  .आणि एकमेकांवर असलेला प्रचंड विश्वास  . खरे तर त्यावेळी इतर काही टाईमपास नव्हता .कॉलेज हि दूर जंगलात, त्यामुळे एकदा आलो कि ताबडतोब परतायला s. t. नसल्यामुळे थांबावे लगायचेच . म्हणूनच आम्ही एकत्र राहिलो . सगळ्यांची सुख दुःखे कॉमन त्यामुळंच एकमेकांबद्दल आपलेपणा वाटू लागला .  खरे तर हेच यश आहे स्टार्ट गिविंग फौंडेशनचे ,इथे कोणीही कोणावर अविश्वास दाखवीत नाही . प्रत्येकजण आपले काम प्रामाणिकपणे करतोय . भले चूका काढतील ,मनातील शंका विचारतील पण अविश्वास दाखविणार नाही .  कालची संध्याकाळ आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन जोमाने सामोरे जाण्याची ऊर्जा देऊन गेली हे निश्चित.

(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment