Sunday, December 31, 2017

बंड्याचे थर्टी फर्स्ट

फूडबझारमध्ये बंड्याला पाहून मी काहीसा चकित झालो. मलाही बघून तो हसला.समोर येऊन उभा राहताच मी म्हटले"आहेस कुठे  हल्ली.... ?? आणि हे काय..? थर्टी फर्स्ट ची तयारी का... ??
" काय हो भाऊ ...?? थर्टी फर्स्टला कोणी भाजी, साखर नेतो का ...?? हे सर्व घरच्यांसाठी. माझी थर्टी फर्स्ट घरीच.मी, आईबाबा आणि मनी.तुम्हीही या... विक्रम आणि वहिनींना घेऊन.मी जेवण बनविणार आहे सर्वांसाठी.मस्त बिर्याणी खाऊ घालतो तुम्हाला".बंड्याने खुले आमंत्रण दिले.
" तू ...आणि थर्टी फर्स्ट घरात ..?? शक्यच नाही.तीस तारखेपासून संध्याकाळी चालू करणारा तू ..चक्क घरच्यांसोबत नवीन वर्ष साजरे करणार.... ?? कोणी ऐकेल तर काय म्हणेल.... ?? मी अविश्वासाने बोललो.
" हो खरेच आहे भाऊ .... मागच्या एक जानेवारीला सकाळी मित्रांनी उचलून घरी आणले.नंतर दिवसभर झोपून होतो. मग संध्याकाळी बाबानी मस्त हजामत केली माझी. सोबतीला आई होतीच पण कधी नव्हे ते बहिणीनेही तोंडसुख घेतले . तिचा चेहरा पाहून खूप लाज वाटली मला स्वतःची.सर्वांची माफी मागितली पण बाबानी नवीन अट समोर ठेवली .कष्टाच्या पैश्याची किंमत तुला समजली पाहिजे असे ते म्हणाले.मग शेवटी त्यांनी सांगितले फक्त एक वर्ष तू घरची पूर्ण जबाबदारी घे.असे समज आपले चारजणाचे हे कुटुंब आता तुला चालवायचे आहे. घरात एक पैसा देत नाहीस आणि मीही मागत नाही . त्याचा परिणाम काल दिसून आलाच . आजपासून घरातील खर्चाची जबाबदारी तू घ्यायची आहेस. ती ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आणि मानसिकही. शिक्षा म्हणून मी ते स्वीकारले .पाहिले काही दिवस काहीच वाटले नाहीं पण हळू हळू खर्च म्हणजे काय..? संसार कसा चालवतात हे समजू लागले . आई वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जा .औषधपाणी बघा. मनीचे ड्रेस ,तिचा पॉकेटमनी . रोजचे खर्च . गॅस बुकिंग . पहिल्यांदाच मला कळले घरातील लाईट बिल किती येते . एकदा तर आईच्या गोळ्या संपलेल्या. रात्री अकरा वाजता घेऊन आलो . पहिल्यांदा मजा वाटली पण मग हळू हळू कळत गेले आईवडिलांनी संसार कसा केला . बनियन ,शर्ट,चपला वरून नेहमी बाबाना बोलायचो पण आता कळू लागले ते का असे वागायचे .केवळ पैश्याचेच नाही तर नाती कशी जोडायची सांभाळायची तेही शिकलो . कोणाच्या प्रेताला,दिवसाला ,लग्नाला ,बारशाला पूजेला मलाच जावे लागले . काय करणार अटच तशी होती ना . पण आपली माणसे कोण आपले स्थान काय ते समजून आले . त्यांच्या डोळ्यात आपलेपणा दिसला .आहो मी वर्षात इतके कमावले मग बाबानी किती कमावले असेल?? लोक आपल्याबद्दल चांगले बोलतात ही भावनाच किती आनंददायी असते .बाहेर पडलो की मित्रांसोबत असतो पण घरात शिरलो की कुटुंबप्रमुख होऊन सर्व जबाबदारी स्वीकारतो .त्यामुळे छान वाटते आता.
मी हसलो"तरीच वर्षभर कुठे जास्त दिसला नाहीस .आणि आम्हाला थांगपत्ताही लागू दिलास नाहीस.पणवर्ष संपले. आता तू मोकळा झालास त्या अटीतुन . उद्यापासून परत जुना बंड्या दिसणार आम्हाला.मी मुद्दाम म्हटले .
"सॉरी भाऊ ...आता जुना बंड्या गेला . यापुढेही हीच जबाबदारी घ्यायची ठरविले आहे मी . हे सर्व करूनच बाकीचे करेन.एक सांगू इतकी वर्षे दारू पितोय पण दारूची चव काही बदलली नाही हो. मग तिच्याच मागे का धावावे सारखे .काहीतरी निमित्त काढून पियालाच पाहिजे का ?? त्यापेक्षा नवीन काही तरी शिकूया म्हणतोय . तुम्ही आहातच पाठीशी".बंड्याही हसत म्हणाला .मीही त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि फूडबाझारमधून बाहेर पडलो .
© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment