Sunday, November 11, 2018

त्यांचीही दिवाळी .....५

त्यांची ही दिवाळी ...५
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्या नाक्यावर धमाल असते . मी विक्रम आणि बंड्या दरवर्षीप्रमाणे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत उभे होतो.
इतक्यात समोरून वासुदेव आला.नेहमीप्रमाणे पालिकेचा गणवेश अंगावर होता.आम्हाला पाहून थांबला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.पण त्याचे काहीतरी बिनसलेले दिसून येत होते.याबाबतीत विक्रम खूप हुशार ...त्याने पटकन विचारलेही.."काय रे वाश्या...!! आजपण ड्युटी का ...??
"तुम्ही रस्त्यावर कचरा टाकणे कमी करा... आपोआप आम्हालाही अश्या सणांना सुट्टी मिळेल..". वासुदेव तडकून म्हणाला.
"आता तू कचराखात्यात कामाला आहेस ही आमची चूक आहे का ....?? नशीब जास्त शिकलास नाही नाहीतर कमिशनर झाला असतास .. .."विक्रमने ताबडतोब उत्तर दिले .
"च्यायला ....इथे तुम्ही बोला.. घरी तो पोरगा बोलतो" वासुदेव चिडून म्हणाला .
"कोण बंटी ....?? मी चमकून म्हणालो .
"हो रे भाऊ .... तो सारखा चिडतो हल्ली. म्हणतो मित्र चिडवतात कचरेवाल्याचा पोरगा ..कोणत्याच सणाला घरी नसतो मी . दिवाळीला सर्वांच्या घरी जाऊन फराळ गोळा करतो त्याची लाज वाटते त्याला .आजही बोलला चालले पप्पा कचरा गोळा करायला....लोकांकडे दिवाळी मागायला.अरे डॉक्टर.. ,पोलीस ...,सणासुदीला काम करतात याचा याना अभिमान वाटतो.पण आम्ही रोज तुम्ही केलेली घाण गोळा करून नेतो याचे काही वाटत नाही त्यांना .एक दिवस सुट्टी घेतली तर कचऱ्याचे ढीग जमतील तरी आमच्याच नावाने शिव्या देतील."
"जाऊ दे रे वश्या ...पोरगा लहान आहे .मोठा झाला की कळेल त्याला" मी समजूत काढली त्याची.तो मान डोलावून निघून गेला.आम्ही शांत झालो.
काही वेळाने अचानक विक्रम उठला" भाऊ.. चल सोसायटीत राऊंड मारू .बंड्या चल एक मोठी पिशवी घे ..अर्थात विक्रमच्या ऑर्डरपुढे आम्ही मान तुकवणार हे ठरले होतेच . पिशवी घेऊन विक्रम वासुदेवच्या घरासमोर उभा राहिला आणि ओरडला "वहिनी.. दिवाळी ... विक्रमच आवाज ऐकून बंटी आणि वहिनी बाहेर आले .
"भाऊजी.. तुम्ही सगळे ... आज अचानक फराळ मागायला .."तिने तोंडावर हात ठेवून कुतूहलाने विचारले.
"हो ..अनाथाश्रमात काही फराळ द्यायचा ठरवलं आहे . म्हणून सगळ्यांकडून गोळा करतोय "तसा वहिनीने काही फराळ आणून दिला.
बंटी म्हणाला.." काका छान काम करतायत ."
"हो ना..मग तुही चल आमच्याबरोबर ."विक्रम सहज म्हणाला. तसा तो तयार झाला.आम्ही 2/3 घरात फिरून फराळ गोळा केला ,तसेच काही छोट्या मुलांचे जुने कपडे गोळा केले. मग विक्रम आम्हाला कारमध्ये बसवून निघाला.
काही वेळाने त्याने एका डम्पिंग ग्राउंडजवळ गाडी थांबवली आणि एका दिशेकडे बोट दाखवून म्हणाला "बंटी.... तो बघ तुझा बाप काय करतोय ..?? 
बंटीने त्यादिशेने पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला . डम्पिंग ग्राऊंडच्या एक कोपऱ्यात काही गरीब मुले बसली होती आणि वासुदेव आणि त्याचे साथीदार आपल्या पिशवीतील फराळ त्या मुलांना पेपरमधून देत होते.
"काका हे काय आहे ..."?? बंटीने आम्हाला विचारले. "अरे तुझ्या बापाला विचार न ??? सगळे तुला चिडवतात बाप कचरा गोळा करतो म्हणून .. बघ आज तो काय काय करतोय...
बंटी धावत त्याच्याजवळ गेला . बंटीला पाहून वासुदेव खुश झाला." ये रे ...हा फराळ वाट त्यांना "त्याच्या हाती फराळाची पिशवी देत वासुदेव म्हणाला .
"पण पप्पा कोण ही मुले ....?
"अरे ही अनाथ रस्त्यावर फिरणारी मुले आहेत. इथे आम्ही कचरा टाकला की धावत येऊन त्यात काही मिळते का ते शोधत बसतात . मग कोणी अर्धी खाल्लेली मिठाई टाकलेली असते तर कोणी फुटबॉल.....इथे त्यांना जगण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो बेटा. आपल्या समाजाची हिपण एक बाजू आहे . लोक अन्नाची नासाडी करतात ते फेकून देतात आणि अशी शेकडो मुले अश्या अन्नाच्या शोधात असतात. आम्ही हे रोज बघतो म्हणून त्यामुलांना निदान सणाच्या दिवशीतरी चांगले खायला मिळावे  म्हणून आम्ही घरोघरी जाऊन दिवाळी मागतो . मी तुला दरवर्षी नवीन कपडे घेतो आणि तुझे जुने कपडे याना देतो . तुझी जुनी खेळणी ,पेन्सिल ,रंगीत खडू जे काही असेल ते याना देतो . आम्ही आमच्यापरीने जमेल ते करतो"" वासुदेव त्याला म्हणाला.
" पाहिलस बंटी... कचरा गोळा करणारा तुझा बाबा नक्की काय करतो ते.तो फक्त कचरा गोळा करीत नाही तर कचरा जमा होऊ नये म्हणूनही प्रयत्न करतोय. तुला प्रत्यक्ष दाखवून तुझे डोळे उघडावे म्हणून  इथे घेऊन आलो. आता तुला पप्पांचा नक्कीच अभिमान वाटत असेल.." विक्रम बंटीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
"हो पप्पा... मी चुकलो ,यापुढे मीही कमीतकमी कचरा निर्माण करायचा प्रयत्न करेन ,अन्नाची नासाडी होऊ देणार नाही.
शेवटी आमच्या विकीला प्रॅक्टिकल जमते याचा पुन्हा अनुभव आम्हाला आला
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment