Monday, November 12, 2018

ऑनलाईन डॉक्टर

ऑनलाईन डॉक्टर
रविवारच्या दुपारी भरपेट जेवून आरामात झोपून आवडीचे पुस्तक वाचत पडणे यासारखे दुसरे सुख नाही . पुस्तक वाचता वाचता कधी झोप लागते ते कळत ही नाही आणि नेमका तोच आनंद मी घेत होतो . पण अचानक कोणीतरी  खांदा धरून हलवतोय याचा भास होऊ लागला .थोड्या वेळाने भास अधिक तीव्र झाला म्हणून नाईलाजाने मी डोळे उघडले तर समोर दिलीप उभा ."भाऊ उठा.....बाबा कसे तरी करतायत ".तो काळजीने म्हणाला .तसा मी उठलो. काल तुझ्या बाबांचा शनिवार फारच जोरात होता असे बोलावेसे वाटले.. पण गप्प बसलो. म्हटले चल बघू आणि त्याच्या बरोबर निघालो.
दिलीप आमच्या बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होता .त्याच्या घरी पोचलो तर बाबा तळमळत होते."काय करायचे भाऊ ...?? आज रविवार ... डॉक्टरही नसेल दवाखान्यात .हॉस्पिटलमध्ये न्यायचे का ....."?? तो काळजीने म्हणाला.
"नाही  तितके काही सिरीयस दिसत नाही. ऍसिडिटीचा त्रास होत असेल...".मी म्हणालो. मनात म्हटले नको नको म्हणताना तिसरा पेग घेतला की असेच होणार त्यानंतर ते चायनीज खाणे ."त्यांना लिंबू पाणी दे नाहीतर .... मी म्हटले "मी डॉक्टर पाहतो " खरे तर इतका मोठा देह आम्ही दोघे तिघे चौथ्या मजल्यावरून खाली आणायच्या कल्पनेनेच मला घाम फुटला होता .
मी फोन करून बंड्याला बोलावले आणि त्याला सर्व परिस्थितीची कल्पना दिली.बंड्याने हसून सर्व समजले अशी खूण केली आणि म्हणाला "काळजी करू नका मी सोय करतो डॉक्टरची ."असे बोलून एक फोन लावला .समोरच्या व्यक्तीला आपला अड्रेस देऊन फोन बंद केला . पाच मिनिटात डॉक्टर येईल . आणि खरेच सातव्या मिनिटाला डॉक्टर बिल्डिंग खाली बाईक पार्क करत होता. .बंड्या त्यांना वरती घेऊन आला .आणि आमची ओळख करून दिली" हे डॉक्टर अतुल सहस्त्रबुध्ये .."त्यांना  पाहिल्यावर माझे त्यांच्याविषयी मत चांगले झाले .साधारण 35 ते 37 चा तरुण दिसत होता . आता जाऊन त्याने बाबांना चेक केले .बॅगेतून एक इंजेक्शन काढून त्यांना दिले .मग त्याच्या पॅडवर काही औषधें लिहून दिलीपच्या हाती कागद दिला .ही औषधे द्या दोन दिवस.अपचन झालेय .. यावयात खाण्यावर कंट्रोल असावा . असे म्हणून हसला.मग खिश्यातून मोबाइल काढून त्याने बाबांचा फोटो काढला  नंतर त्याने बाबांच्या तब्बेती विषयी सर्व माहिती दिलीपच्या विचारून मोबाईलमध्ये भरून घेतली .
"डॉक्टर तुमचे किती झाले.......मी विचारले तसे त्यांनी सातशे रुपये असे सांगितले"मी नॉर्मली पाचशे घेतो पण आज रविवार आणि त्यात त्यांना माझ्याकडेच इंजेक्शन दिले त्याचे जास्त पैसे.." त्याने हसत हसत स्पष्टीकरण दिले.
"हरकत नाही हो .. पण तुमचा दवाखाना कुठेय....??.या विभागात तुमचा दवाखाना पाहिल्याचे आठवत नाही" मी सहज विचारले .
"नाही हो.... माझा दवाखानाच नाहीय. मी मोबाइल डॉक्टर आहे".तोही सहज म्हणाला.
"म्हणजे ..."?? मी आश्चर्याने विचारले.
"म्हणजे मी तुमच्या घरी येऊन उपचार करतो . त्यासाठी तुमच्याकडे फक्त माझा फोन नंबर पाहिजे.आता पहा ना....?? मी जागा शोधणार.. मग दवाखाना बनविणार ...त्यात लाखो रुपये गुंतवणार आणि पेशंटची वाट पाहत बसणार. पेशंटही इथे आपला नंबर कधी लागेल याची वाट पाहत बसणार . आणि  दवाखान्यात रोज यावे लागणार मला.. माझीही कामे  अडतात. म्हणून विचार केला आपणच पेशंटकडे जायचे.नाहीतरी लांबचे पेशंट दवाखान्यात येत नाहीत आणि घरी येऊन डॉक्टर सर्व्हिस देणार असेल तर कोणाला नकोय..??त्यांचाही वेळ वाचतोय. डॉक्टरांनी समजावले .
"पण डॉक्टर ...काही उपकरणे दवाखान्यात असतात त्यामुळे तिथे ट्रीटमेंट करणे सोपे नाही का ...?? दिलीप ने प्रश्न केला .
"कसली उपकरणे  बेड...?? मग बाबा इथेही बेडवर आहेत . त्यांचे बीपी आणि डायबेटीस तपासायचे यंत्र माझ्याकडे आहे . माझ्या पेपरवर मी लिहून दिलेली औषधे तुम्हाला कोणत्याही मेडिकल दुकानातून मिळू शकतात . तसेच नॉर्मल ताप,सर्दी खोकलाची औषधें माझ्या बॅगेत असतात . टाके मारायचे नवीन उपकरण ही माझ्याकडे आहे .ह्या सर्व तपासण्या मी इथेही करू शकतो . मदतीला पेशंटचे नातेवाईक असतात .आता यानंतर मला दुसऱ्या पेशंटचा कॉल येईपर्यंत मी माझी पर्सनल कामे करू शकतो"डॉक्टरांनी आपली बॅग उघडून दाखवली.
" पण मग तुमचे चार्जेस कसे ..."?? मी मूळ मुद्द्यावर आलो.
"हो .. तो महत्वाचा प्रश्न  आहे. पण मी घरी जाऊन चेक करणार म्हणजे इतर डॉक्टरांपेक्षा जास्त चार्ज घेतो हे खरे ...मी माझ्या चार्जमध्ये माझ्या येण्याजाण्याचे  पैसे ऍड करतो . म्हणजे बघा ना तुम्ही याना जवळच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तर कमीत कमी पंचवीस रुपये  टॅक्सीचे लागले असते त्यामध्ये तुमचा अर्धा तास गेला असता मग मी एकूण 100 रु तुमच्या बीलात लावले . इंजेक्शन चे दोनशे आणि माझे दोनशे असे पाचशे रु पण तुम्ही रविवारी बोलावलात म्हणून अधिक दोनशे रुपये घेतले .काही चुकीचा हिशोब आहे का ..."?? त्याने आम्हालाच प्रश्न केला.
"अजिबात नाही डॉक्टर .. बंड्या अचानक बोलला.नाहीतरी मोठ्या आजारासाठी लोक स्पेशालिस्टकडे जातात आणि तिकडे जाण्याचा सल्ला ही तुमच्याकडून येतो .दवाखान्यात फक्त बेसिक आजारासाठी लोक येतात त्यानं बऱ्याचजणांना सर्दी खोकला ताप असेच आजार असतात .काही टेस्ट करायच्या झाल्या तर तुम्ही त्या तुमच्या लेटरहेडवर लिहून देतात.औषधे ही बाहेतून आणायला सांगतात.मग त्यासाठी दवाखान्यात यायची गरज काय...??आणि लोक हल्ली सांगेल तेव्हडी फी निमूटपणे देतात".
"पण आता माझे बाबा सिरीयस असते तर?? दिलीपचा प्रश्न ..
"मग मी ताबडतोब तुम्हाला औषधें आणायला सांगितली असती .तुम्हाला वेळ लागत असेल तर मी माझ्या केमिस्टकाढून मागवली असती. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची परिस्थिती असती तर मीच फोन करून अँबूलन्स मागवली असती आणि तुम्हाला त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे आहे ते विचारले असते तुमच्याकडे हॉस्पिटलचा पर्याय नसता तर त्याचीही व्यवस्था मी केली असती . अँबुलन्समधून त्यांच्या बरोबर गेलो असतो आणि त्यांना ऍडमिट करून उपचार चालू होईपर्यंत त्यांच्यासोबत राहिलो असतो. पण तासागणिक माझा चार्ज वाढत गेला असता".
अरे बापरे हे फुल तयारीतच  असतात मी मनात म्हटले. "पण डॉक्टर अश्यावेळी तुम्हाला दुसऱ्या पेशंटचा कॉल आला तर ... "बंड्याने तोंड उघडले.
"तर मी दुसऱ्या डॉक्टरला फोन करून त्याच्याकडे पाठविला असता "ते हसत म्हणाले" काय आहे बंड्या..... इथे हल्ली लोकांना सर्व घरबसल्या हवे आहे . फोनवरून सर्व मागविण्याची सवय लागली आहे . घरापासून ते अंत्ययात्रेच्या सामानापर्यंत सर्व ऑनलाईन मागवितात मग डॉक्टर का नको .लोकांना कोणताही त्रास नकोय ...त्यांना दवाखान्यात लाईन लावायची नाही .त्यासाठी ते जास्त पैसेही द्यायला तयार आहेत.अरे खाली येऊन साखरही घ्यायचा त्यांना कंटाळा येतो तीच साखर ते दहा रुपये जास्त देऊन ऑनलाईन मागवितात मग आपण तशी सेवा का देऊ नये ...??म्हणून मीही ऑनलाईन सेवा सुरू केली . माझ्यासारखे पाच सहा डॉक्टर आहेत . एकमेकांकडे पेशंट फिरवतो आम्ही . म्हणून ह्या पेशंटची सगळी माहिती फोटो सेव्ह केलाय . पुढच्यावेळी मला फोन केला आणि मी दुसरीकडे असलो तर दुसरा येईल पण त्याच्याकडे यांची सगळी माहिती पोचविण्याचे व्यवस्था झालेली असेल" डॉक्टर हसत म्हणाले.
" पण पेशंट मिळतात का तुम्हाला ..."??मी विचारले.
" हो मिळतात की .....दिवसाला दहा ते पंधरा पेशंट कुठे जात नाहीत. पुरे आहेत...,आम्हालाही आमच्या फॅमिलीसाठी वेळ मिळतो.पुरेसा पैसा मिळतो . माझा फोन नंबर लक्षात ठेवा आणि कधीही गरज लागली तर बोलवा मी किंवा कोणीतरी येऊन पेशंटवर योग्य उपचार करतील याची खात्री देतो तुम्हाला"असे बोलून सर्वांशी हात मिळवून ते बाहेर पडले आणि बाईक स्टार्ट करून निघूनही गेले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment