Wednesday, November 7, 2018

त्यांची ही दिवाळी ....२

घड्याळात सकाळी पाचचा गजर झाला आणि तो अलगद उठून बसला तरीही त्याच्या सावध हालचालीने तिची झोप चाळवलीच.
"अरे....!! हे काय...?₹ तुम्ही निघालात का... ??? पहिली दिवाळी आहे आपली ."असे म्हणून तिने प्रेमाने त्याच्या गळ्यात हात टाकले.
" हो... पण मला जावेच लागेल.ड्युटी आहे माझी".तो हसत म्हणाला .नवीन लग्नाची धुंदी अजूनही त्यांच्या मनातून उतरली नव्हती.तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिले आणि गंभीर चेहरा करून खिडकीतून बाहेर पाहू लागली.तो हसला......अलगद तिला मिठीत घेऊन म्हणाला "तुला आधीच माहिती होते माझी ड्युटी कशी आहे तरीही हा आग्रह का.... ??  मी पडलो पोलीस.. त्यातही बॉम्बस्कॉडचा . इतर दिवशी घरी असलो तरी चालेल पण अश्यावेळी मात्र ड्युटी करावीच लागेल. सण चालू झालेत परिस्थिती अशांत आहे. आम्हीच कंटाळा केला तर इतरांचे रक्षण कोण करणार.."
"तरीही आज पहिली दिवाळी आपली ... सर्व घरी येतील आपल्या,नवीन आहे म्हणून कौतुक करतील नंतर कोण विचारणार आहे आपल्याला ..."??. तिचा तो नाराज चेहरा पाहून त्याला ही क्षणभर वाटले थांबावे घरी . नाहीतर इतक्या कडेकोट बंदोबस्तात कोण काय करेल ..?? मागचे बरेच सण असे बसूनच घालवले आज ऍडजस्ट करूया का ...?? बायकोचे मन तोडणे जीवावर आले होते . पाठवूया का जनार्दन लोकेला ....?? नको पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे तो .हालचाली ही मंद झाल्यात त्याच्या आणि सध्याच्या बॉम्बची टेक्नॉलॉजीही समजत नाही त्याला . जाऊ दे ... आपणच जाऊ .. आज राहिलो तर पुढे ही हीच सवय लागेल. मोठ्या निग्रहानेच बायकोची मिठी सोडवली आणि निघायच्या तयारीला लागला.
दिवाळीचे दिवस असल्यामुळे खरेदीची सुरवात लवकरच सुरू झाली होती.आज त्याची ड्युटी मार्केटमध्येच होती. मोटारसायकल पार्क करून तो पोलीस स्टेशनमध्ये शिरला. कॉल येईपर्यंत जागा सोडायची नसल्यामुळे तो मोबाईल घेऊन बायकोशी चाट करीत बसला . बघता बघता दुपार झाली . सहज म्हणून मार्केटमध्ये चक्कर टाकावी म्हणून तो उठला .आता मार्केट गर्दीने नुसते फुलून गेले होते . गर्दीत मोकळेपणाने श्वास ही घेता येत नव्हता.अचानक त्याचा मोबाईल वाजला . पाहतो तर पोलीस स्टेशन मधून कॉल होता . रामेश्वर ज्वेलर्समध्ये बॉम्ब असल्याची बातमी होती .अरे हा तर समोरच आहे .....! आपल्या आता परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन  बॉम्बप्रूफ जाकीट आणायला वेळ गेला असता त्याने तसेच आत शिरण्याचा निर्णय घेतला.  फोनवरून त्याने मी आत शिरतोय याची माहिती वरिष्ठांना दिली. आतमध्ये गोंधळ उडाला होता कसे बसे त्यांनी दुकान रिकामे केले आणि एका काऊंटरपाशी असलेल्या त्या काळ्या बॅगेच्या दिशेने गेला . हात लावताच त्याच्या अनुभवी नजरेने त्यात जिवंत बॉम्ब असल्याचे ओळखले .आता तर जॅकेटही घालण्यास वेळ नव्हता .धडधडत्या मनाने त्याने बॅग खोलली आणि आतील बॉम्ब पाहून तो चक्रावला . अतिशय नव्या पद्धतीच्या त्या बॉम्बने तेथील शेकडो लोकांच्या चिंधड्या उडवल्या असत्या .मन एकाग्र करून तो कामाला लागला . आता त्याच्या डोळ्यापुढे फक्त तो बॉम्बच दिसत होता . आपले लग्न झालेय तरुण सुंदर बायको आपली वाट पाहतेय या जाणिवेच्या पलीकडे गेला होता तो . घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी लोकांमध्ये अस्वस्थता वाढत होती .शेवटी  काही मिनिटे बाकी असतानाच तो बॉम्ब नादुरुस्त केला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला .सहकाऱ्यांकडे पाहून त्याने हात उंचावला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव आले . सर्वांनी टाळ्या वाजविल्या पण त्याच्या डोळ्यात मात्र चिंता दिसत होती . बहुतेक जॅकेट न घातल्यामुळे शो कॉज मिळणार तो स्वतःशी पुटपुटत तिथून निघाला.
हताश मनाने पोलीस स्टेशनमध्ये शिरला तितक्यात मागून हाक ऐकू आली "ओ साहेब....!! ऐकता का ....?? त्रासिक मुद्रेने तो वळला आणि समोरच्या म्हातार्याला पाहून शांत झाला . त्याच्याबरोबर तरुण मुलगी होती . नुकतेच लग्न झालेले दिसत होते तिचे . तो म्हातारा जवळ येऊन म्हणाला" साहेब ...तुमचे उपकार कसे मानू हेच समजत नाही . ही माझी मुलगी .. नुकतेच हिचे लग्न झाले आहे . पहिली दिवाळी म्हणून हिला काही गिफ्ट द्यायचे म्हणून त्या ज्वेलर्सच्या दुकानात गेलो होतो. आमच्या पायाखालीच ती बॅग होती .आज तुम्ही वेळेवर आला नसता तर तो बॉम्ब फुटून आमच्या चिंधड्या उडाल्या असत्या. माझे ठीक आहे हो पण आता ही परक्याची पोर . घरच्यांनी काय उत्तर दिले असते हिच्या नवऱ्याला . तुम्ही देव आहात आमच्यासाठी..." असे बोलून त्याने हात जोडले .काही न बोलता त्यानेही हात जोडले . इतक्यात फोन वाजला बायकोचा फोन पाहून चेहऱ्यावर हसू उमटले.
" येणार आहात का घरी ...."?? तिने प्रश्न केला . "नाही ...आता दिवाळी संपेपर्यंत नक्कीच नाही "तो उत्तरला.
"मीही तेच म्हणतेय .... आज तिथे तुमची गरज आहे . तुम्ही याल तेव्हा आपण दिवाळी साजरी करू .मी वाट पाहीन .. डोळ्यातील अश्रू पुसत त्याने फोन बंद केला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment