Wednesday, November 7, 2018

त्यांची ही दिवाळी ....३

त्यांची ही  दिवाळी ...३
"बाब्या.....!! लक्ष कुठे आहे तुझे ...?? तो तीन नंबर टेबलवाला कधीपासून पाणी मागतोय .. दे त्याला लवकर..." काउंटरवर बसलेला मालक त्याच्यावर खेकसला तेव्हा तो भानावर आला.
तृप्ती हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यात आजचा दिवाळी सण...खरेदी करायला आलेले बरेचसे लोक त्या हॉटेलातच घुसत होते .त्याचे मात्र आज कामात लक्ष नव्हतेच . आणि कामात चूका घडल्या तरी फारसा फरक पडत नव्हता. बोलून चालून टेबलवर फडके मारणार पोऱ्या तो .... पण आज त्याला राहून राहून तिची आठवण येत होती . कधी नव्हे तर तिने यावेळी त्याच्याकडे काही तरी मागितले होते .
"दादा...... घरात बसून बसून कंटाळा येतो रे.. छोटासा मोबाइल आण ना... विडिओ गेम खेळायला... .नाहीतरी बाहेर जायला मिळतच नाही आपल्याला " तिची मागणी ऐकून तो मनातून हलला.काय चुकीचे  होते तिचे ....?? जन्मतः पायात काहीतरी प्रॉब्लेम झाला तेंव्हापासून लंगडत चालते . जास्त चालले की त्रास होतो म्हणून घरात बसूनच असते . शाळेत जाणे हेच तिचे बाहेर पडणे . हा हॉटेलमध्ये कामाला . कधी सुट्टी नाहीच . इतरवेळी वेळेत घरी यायचा पण सण आले की ह्याचे काम वाढले . हा .....त्यात टीप जास्त मिळायची म्हणून सुट्टी न घेता काम करायचा. आई वडील लवकरच गेले तेव्हापासून बहिणीची जबाबदारी यांच्यावरच . रोजचा खर्च निघताना मुश्किल तर मोबाईल कुठून घेणार ...??आणि गरजच काय.....?? हा दिवसभर तृप्ती हॉटेलमध्ये भेटणार तर घरी बहीण आहेच..
.पण काही म्हणा ..बहिणीवर जीवापाड प्रेन होते . हॉटेलमध्ये काही उरले की स्वतः न खाता बहिणीसाठी  बाजूला काढून ठेवायचा. सहकारी वेटर त्याची टर उडवायचे पण हा हसून सहन करायचा .पण आज अचानक तिने अशी मागणी केली तो विचारात पडला.
मालकालाही समजले याचे लक्ष नाही . त्याने पुन्हा त्याला बोलावले आणि सहा नंबर टेबलवर पाठविले . तिथे दोन तरुण बसले होते . याने पाणी ठेवताच त्यांनी यांच्याकडे दोन चहाची ऑर्डर दिली .दोन तीन नुकतीच खरेदी केलेली पॅकेट्स त्यांच्याजवळ दिसत होती .
"लवकर आण मित्रा.... आम्हाला निघायचे आहे"याने मान डोलावली आणि ताबडतोब दोन चहा आणल्या. त्यांनी ताबडतोब बिलही दिले आणि बाकी ठेव असे बोलून उठले . हा त्यांचे कप उचलायला गेला तेव्हा त्या टेबलवर एक बॉक्स राहिल्याचे लक्षात आले ..आजूबाजूला पाहून त्याने तो बॉक्स उचलला . त्या बॉक्समध्ये नवीन मोबाइल आहे हे  त्याच्या लक्षात आले . काय करावे ....?? बहिणीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला . हा मोबाईल तिला दिला तर किती खुश होईल.. पण दुसरे मन ऐकेना .काही न करता तो काउंटरवर गेला आणि  बॉक्स मालकाच्या हाती दिला.
"सहा नंबर टेबलवर कोणीतरी विसरून गेलाय..".मालकाने काही न बोलता तो बॉक्स ठेवून घेतला . थोड्या वेळाने ते दोघे घाईघाईने हॉटेलमध्ये शिरले आणि मालकाशी बोलू लागले. "बाब्या .... ..!! मालकाने आवाज देऊन त्याला बोलावले .
"हेच का ते ...."??? त्याने होकारार्थी मान डोलावली.तसे मालकाने बॉक्स त्यांच्या हाती दिला .बॉक्स पहाताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
"आहो ...यावर्षी बहिणीने मोबाईल मागितला. दहावी पास झाली ना ती ...?? म्हणून कर्ज काढून हा नवीन मोबाईल घेतला आणि इथेच विसरून गेलो .  नशीब सापडला नाहीतर नुकसान झाले असते हो... खूप खूप आभार तुमचे ".असे बोलून त्याने शंभर रुपये पुढे केले . त्याने मान डोकावून घेण्यास नकार दिला . मालक ही नको म्हणाला.
दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ते दोघे निघून गेले . "चला निघा ...मालक खेकसला. संध्याकाळी घरी निघताना मालकाने त्याला जवळ बोलावले .. हातात मिठाईचा बॉक्स दिला आणि ड्रॉवरमधून आपला जुना मोबाईल काढून त्याच्या हातात दिला."जा बहिणीला दे ..चार नवीन गेम टाकलेत त्यात .. खुश होईल ती .तिला गेम खेळायला मोबाईल हवाय ते कळले होते मला. अरे तुम्ही माझी माणसे आहात .आज तुझा प्रामाणिकपणा पाहिला आणि त्याचेच हे बक्षीस समज"
त्याने तो मोबाईल  घेतला . घरी लवकर जाण्यातही  किती आनंद असतो ते आज कळले त्याला .
© किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment