Monday, November 5, 2018

त्यांचीही दिवाळी ...१

"चल रे लवकर .....!!  लवकरच दिवाळी सुरू होईल.."
"हो ग ....!! तयार तरी होऊ दे मला.दिवाळी आहे.चांगले दिसायला नको का ???
"हा... हा.. हा.. जोक करू नकोस ... मला काही फरक पडत नाही .. किती वर्षे अनुभवतेय तुझा सहवास ..... चल लवकर मी खूप उत्साहित झालीय ते फटाक्यांचे आवाज ऐकायला ..."
"हो ..हो .... चल निघू .."
"ओ दादा ... !! टॅक्सीवाले भाऊ ...!! चौपाटीवर चला घेऊन .. हॅपी दिवाळी तुम्हाला. चला मॅडम हात पकडा नाहीतर हरवाल त्या गर्दीत.."
"तुम्ही म्हणजे ना .... किती वर्षे जातोय  दिवाळीत ..??चौपाटीवर कधी हरवले आहे का .. ?? त्या निमित्ताने तुम्ही हात धरून ठेवता .."
"चला चौपाटी आली ... किती गर्दी आहे नाही ...किती गोगांट ..?? नुसती आनंदाने फुलून गेली आहे चौपाटी ...".
"हो ना... किती छान वाटते ऐकून .. बघ बघ फाटक्या वाजू लागल्या ..खरेच यार ..ही खरी दिवाळी ..
"हो ना ...किती वेगवेगळ्या आवाजाचे फटाके लावतायत लोक.किती छान वाटते वेगवेगळे आवाज ऐकून ..."
"अरे बापरे ....हा सायरनसारखा आवाज कुठून येतोय ....काय अपघात वगैरे झालाय का ....
"नाही हो .. तुमचे आपले काहीतरीच ..हा ही फटाका आहे .. सायरन सारखा आवाज येणारा.
"अरे देवा...!! दरवर्षी काहीतरी वेगळे आवाज ऐकतोय..."
"अरे हे काय ....?? आवाज बंद का झाले ...?? इतकी शांतता कशी अचानक ..."??
"माहीत नाही ग  काय झाले ...?? थांब विचारतो  कोणाला तरी ... ओ भाऊ काय झाले ..?? हे अचानक शांत का .."??
"आहो दहा वाजले ..कोर्टाने आदेश दिलाय रात्री दहा नंतर फटाके वाजवू नये . पोलीस आले आणि सर्व बंद करून गेले . तुम्हाला कुठे सोडू का ...??
"नको.. नको ... आम्ही ठीक आहोत धन्यवाद".
"काय ग .... हे काय नवीन ... अग फटाक्यांचे आवाजच ऐकू आले नाही तर आपण दिवाळी कशी साजरी करणार . आपल्या आयुष्यात अश्या मार्गाने येणारा प्रकाशही आपल्यातून निघून गेला ....."
"हो ना ... आयुष्यभर डोळ्यासमोर काळोखच असतो आपल्या.पण दरवर्षी किती हौसेने आपण इथे दिवाळी अनुभवायला येतो. ही गर्दी..उत्साहाने भरलेली माणसे..,ते फटाक्यांचे विविध आवाज ..यांच्यावरच आपली दिवाळी साजरी होते . आता तोच आवाज आपल्या आयुष्यातील एका आनंदाच्या प्रसंगातून निघून गेला .आता दिवाळी कशी साजरी करायची आपण . इतरांचे ठीक आहे हो.त्यांना सगळे दिसते .. ती रोषणाई ..फटाक्यांची आतिषबाजी . पण आपले काय .. आपण त्या फटाक्यांच्या आवाजात आणि आजूबाजूच्या माणसांच्या उत्साहाने भरलेल्या वाजताच रंगून आपली दिवाळी साजरी करतो . आता पासून ते ही नाही .. चला घरी निघू
"हो चल ... सांभाळून... हात धर माझा.. मी टॅक्सीला आवाज देतो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment