Saturday, November 24, 2018

त्याच्या नंतर

आज त्याला जाऊन पंधरा दिवस झाले .घरातील गडबड शांत झाली .तिच्या सासरचे... माहेरचे ...तेरा दिवस झाल्यावरच घरी परतले होते. कधी एकदा हे सोपस्कार संपतात याचीच जणू वाट पाहत होते .
त्याचे अचानक जाणे हा जणू तिचाच दोष धरला गेला होता . सोनूलीला कुशीत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती . संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर जणू रिकामे उभे होते . अचानक डोअरबेलने ती जागी झाली .दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा दिर उभा.
"वहिनी.... पुण्याला कामासाठी चाललो आहे .गाडी घेऊन जाऊ ......"? दरवाजातूनच विचारले.तिने काही न बोलता कारची चावी हातात दिली.
त्याने पहिली ऍक्टिव्हा घेतली तेव्हा सोनूलीचा जन्म ही झाला नव्हता.हिच्या मागे लागायचा ...शिकून घे. पण ही ऐकली नाही. "तुम्ही आहात ना...?? मग काय गरज मला शिकायची ..??मग सोनूली झाल्यावर कार घेतली . पण हिला शिकायचा कंटाळा. तो असता तर कोणाची हिंमत होती का  गाडीची चावी मागायची....?? . जाऊदे नाहीतरी पडून राहणार अश्याच . वापरतील आपलीच माणसे ....
इतक्यात त्याचा मोबाईल वाजला .कोणत्यातरी कंपनीचा होता ."मॅडम काही पेमेंट राहिले आहे त्याची आठवण करून द्यायला फोन केला .ऑनलाईन पेमेंट करा.
" बापरे ही काय भानगड ..??? कुठे कुठे यांनी पैसे गुंतवलेत देव जाणे . . तरी सारखे सांगत होते लक्ष दे ,इंटरनेट बँकिंग शिक. पण ही हसून टाळत होती.. ते पैश्याचे तुम्ही पहा मी घरातील पाहीन . तिने  कपाटातील लॉकरमधून त्याची पर्सनल फाईल काढली   देवा .... इतके पेपर्स . इतकी कार्ड्स . यातील मला काहीच माहिती नाही .आता कोणाला विचारू ...??
इतक्यात टॉयलेटमधून सोनूलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला .काळजीने तिने हाक मारली तेव्हा रडत बाहेर आली . हातात कमोडचा स्प्रे होता ."मम्मी ....तुटला .... त्याही स्थितीत ती हसली . ताबडतोब  दुरुस्त कर तुला माहितीय त्याशिवाय मला जमत नाही. तिने मान डोलावली.ही पण त्याचीच शिकवण .आपल्या मुलीला सगळे अत्याधुनिक द्यायचे हा त्याचा हट्ट . आजच्या युगात तिला सर्व वापरता आले पाहिजे आपल्यासारखे अडाणी आणि जुने नको .
पण आता हे दुरुस्त कोण करेल .....??सगळे काही तोच बघत होता .कसातरी प्लंबरचा नंबर शोधून त्याला फोन केला पण त्याने ताबडतोब यायला नकार दिला . फोनवर बोलताना त्याचा वेगळाच स्वर ऐकून चमकली. आता हे एकटीला सहन करावेच लागेल.... मनाशी काही ठरवून ती जुना स्प्रे घेऊन बाहेर पडली . जवळपास कुठेतरी याचे दुकान आहे हे आठवत होते तिला . ती चौकशी करत निघाली .
समोरून सोसायटील रेगे येत होते . तिला पाहतच त्यांच्या नजरेत वेगळीच चमक आली . तशीही अनेकवेळा अनेकांच्या नजरेत तिने अशी चमक पहिली होती .पण आज ती जास्तच तीव्र वाटली .
"वहिनी तुम्ही कुठे निघालात ...?? काही हवे आहे का...... ??? न लाजता सांगा ...आहे मी .असे म्हणत हसला.तिला एकदम शिसारी आली .आतापर्यंत लांबून नजर ठेवणारे लांडगे आता जवळ सरकू लागले होते.गेटजवळ बसलेल्या टपोरी मुलांच्या लोचट नजरा सहन करीत बाहेर पडली .
दुकानदाराला तो स्प्रे दाखवताच त्याने नवीन दिला . आता  लावेल कोण ...?? ती मनाशी म्हणाली .घरी येताच तिने भाऊला फोन लावला पण तो गावी आहे असे कळताच खट्टू झाली . मग विक्रम.....?? त्याने फोन उचलला तिचा प्रॉब्लेम ऐकताच "आता मीटिंग सोडून तुझ्या संडासात स्प्रे फिट करायला येऊ का ....???? असा चिडून प्रश्न केला .
तिने काही न बोलता फोन ठेवला . घरातील टूल बॉक्स काढून योग्य ती हत्यारे काढली आणि कमोडवर बसून स्प्रे लावायची खटपट करू लागली दीड तास खटपट करून झाल्यावर स्प्रे बदली केला तेव्हा ती स्वतःवर खुश झाली .आपल्याला जमू शकते तर ..???
संध्याकाळी सासू घरी आली . बोलता बोलता तिने मुलाच्या बँक अकाउंटचा विषय काढला .दुसरा मुलगा सर्व व्यवहार पाहिल असे आश्वासन दिले . ती काही न बोलता ऐकून घेत होती . हळूहळू आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या अडचणींचा तिला अंदाज येऊ लागला.
तिने ताबडतोब विक्रमला फोन करून गाड्या विकून टाकायचा निर्णय सांगितला तसा विक्रम पंधरा मिनिटात घरी हजर झाला . यावेळी सोबत वनिता होती.
" मामा.... मम्मीने कमोडचा स्प्रे बदलला..."त्याच्या अंगावर उडी मारत सोनूली हसत म्हणाली.
"तिला सर्व येते सोनू ...फक्त आळशी आहे ती "चॉकलेट तिच्या हाती देत विक्रम म्हणाला." दोन्ही गाड्या विकायची काही गरज नाही. पुढच्या महिन्यात कार विकून टाकू पण स्कुटर ठेवू तुझ्यासाठी "
"अरे पण मला नाही चालवता येत ..ती रडवेला चेहरा करून म्हणाली.
"पुढचे पंधरा दिवस वनिता शिकवेल तुला .."तो वनिताकडे पाहत म्हणाला "फक्त पंधरा दिवस देतोय माझी बायको देतोय तुला... स्कुटर ..गाडी ,बँकिंग सगळे शिकून घे तिच्याकडून .नंतर तुझे तूच बघ . इथे तुझ्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही . नंतर कार विकून टाकू .
"हे सर्व जमेल का मला पंधरा दिवसात ...? तिने काळजीने विचारले .
"कमोडचा स्प्रे बदललास ना दीड तासात ...?? यापुढे तुझे तू बघ ..वाईट नजरेचा कसा सामना ते तूच ठरव.आम्ही फक्त पंधरा दिवस तुझ्या सोबत आहोत . मग तू आणि तुझी मुलगी आणि तुमचे आयुष्य .."मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनिताला हाताने थोपवत विक्रम म्हणाला .
वनिताने हताश होऊन तिच्याकडे पाहिले तशी ती हसली ."वनिता.... उद्या सकाळी आठ वाजता मी तुझ्या बिल्डिंगखाली येते . बँकेत जायचे आहे आपल्याला त्यानंतर इन्शुरन्स ऑफिसमध्ये.."तिच्या आवाजातील बदल पाहून विक्रमने सुटकेचा सुस्कारा सोडला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment