Saturday, November 10, 2018

त्यांची ही दिवाळी ....४

त्यांची ही दिवाळी ....४

"अरे मॅडम..... अजून इथेच का तुम्ही ...?? घरी नाही गेलात ते ..?? आज दिवाळी आहे जा लवकर.." हातातील कंदील सावरत डॉक्टर रवी निमकर नर्स रेवतीकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला.
"आहो सर ....जातच होते.पण या अपघातातील बॉडी आल्यात . तिघेही जागीच गेले . त्यांचे पेपर बनवत बसले . शिवाय रिलिव्हर आली नाही अजून . त्यामुळे आज डबल ड्युटी . म्हटले तुम्हाला मदत करू आज . आपल्या शिफ्ट वेगळ्या त्यामुळे एकत्र काम करायची संधी कमीच मिळते म्हणा .." तिनेही तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिले आणि दोघेही हसले
"आणि हे काय ..?? कंदील कुठे लावणार आहात..........."?? तिने कुतूहलाने विचारले.
"आपल्या डिपार्टमेंटमध्ये .." शवागृहाच्या दरवाज्यावर बोट दाखवून त्याने म्हटले .
"काहीतरी काय ...?? लोक काय म्हणतील ..??.तिने डोळे वटारून म्हटले.
"काय म्हणणार .....? प्रत्येकजण आपापल्या  कामाच्या ठिकाणी सजावट करतो.दिवाळी प्रत्येकजण आहे तिथे साजरी करतात..पोलिस स्टेशन,ऑफिस दुकाने सगळीकडे कंदील ,तोरणे लावतात . आता हे सरकारी हॉस्पिटलचे शवागृहच आपले ऑफिस आहे त्याला आपण तरी काय करणार . आता प्रत्येक वार्ड मध्ये कंदील लागले आहेत मग इथेच का नाही..."??  तो तिला समजावत म्हणाला.
" हो ..तेही खरेच म्हणा .. नाहीतरी तुमचे डोके कुठे कसे चालेल ते सांगता येत नाही "ती हसून म्हणाली ."होणाऱ्या बायकोला इथेच एका म्हातारीचे पोस्टमार्टेम करता करता प्रपोज केलेत ही गोष्ट आख्या हॉस्पिटलला ठाऊक आहे .चार दिवस मान खाली घालून ती नर्स काम करीत होती".
" मग काय करणार . मला आवडलेली पहिली तरुणी होती ती . पण आमच्या शिफ्ट वेगळ्या . मी घरी तर ती इथे . शेवटी एकदा तिने शिफ्ट चेंग करून घेतली आणि नेमकी माझ्या टेबलवर आली .इथेच विचारायचे कसे म्हणून संभ्रमात पडलो पण नशीब नव्वद वर्षाची म्हातारी समोर पोस्टमार्टेमसाठी आली . हिला काहीच वाटणार नाही असे समजून प्रपोज केले " रवी ती घटना आठवून हसत हसत म्हणाला .
"काय तुमची ती विचारायची पद्धत ...तुझ्या हृदयात मला स्थान मिळेल का अशी फिल्मी वाक्ये बोलत समोर आडवी पडलेल्या म्हातारीचे ह्रदय कटरने कापलात"तिने हसत हसत म्हटले.
"हो... पण तिने होकार दिलाच .आपल्या क्षेत्रात असेच असते.तरीही डीनने झापलेच मला. डॉक्टर निमकर ही काय प्रेयसीला प्रपोज करायची जागा आहे का ..?? म्हटले काय करू ...??भेटायची संधीच मिळत नव्हती .  तेव्हा ते ही हसले".रवी त्या आठवणीत गुंतून गेला.
" पण नुसते हसले.... रेवती डोळे फिरवत म्हणाली  कसली सूट दिली नाही .लग्नाची बोलणी ..तयारी हनिमूनची तयारी ...सगळे इथेच ठरले की ...त्यानंतर दिवाळी ही इथेच साजरी होते तुमची .."ती ठसक्यात म्हणाली .
"काय करणार दिवाळीत मृत्यू रजा घेत नाही मग आपणही का घ्यावी ....?? आणि आपण रजा घेतली तर याना मोकळे कोण करणार...??.समोरच्या बॉडीवर बोट रोखून तोम्हणाला "चला कामाला सुरुवात करू .आज बऱ्याच महिन्यांनी आपण एकत्र काम करू .."असे म्हणून दोघेही आत शिरले .वार्डबॉयला कंदील लावायला सांगून ते केबिनमध्ये आले .दोघांनी देवाला नमस्कार केला.
तो कामाला सुरुवात करणार तेव्हा अचानक तिने त्याला थांबविले "आहो ..दिवाळी आहे .घरी तर कधी या दिवशी भेटत नाही तुम्ही.आजतरी इथेच ओवाळून घेते तुम्हाला "असे म्हणून तिने देवाजवळचे तबक उचलले .
"हे काय रेवती ....इथे ओवाळणार तू ....तो आश्चर्याने म्हणाला .
"तर काय झाले ..बंद केबिन आहे ही  तुमची आणि तुमचे पेशंटही उठणार नाही आता .मीच मुद्दाम आज डबल शिफ्ट घेतली .कितीवर्षं आपण वेळ मिळेल तेव्हा सण साजरे करणार...??.मागाच्यावर्षी पाडवा झाला आणि दहा दिवसांनी तुम्हाला ओवाळले मी . मान्य आहे ही जागा योग्य नाही पण सणाच्या दिवशीतरी आज एकत्र असण्याचा योग जुळून आलाय त्याचा फायदा का करून घेऊ नये आणि कामाच्या प्रति आपली निष्ठा सगळ्यांना माहीत आहे ..काय करेल तो डीन हे कळल्यावर....??? जास्तीत जास्त एक शो कॉज दोघांना देईल . सण एकत्र साजरे करतोय मग शिक्षा ही एकत्र भोगू "त्याने हसून तिला टाळी दिली . तिने त्याला ओवाळले . दोघांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले . इतक्यात दरवाजावर टकटक झाली . वार्डबॉय दरवाजा उघडून आत आला "चला साहेब ..पेशंट वाट पाहतायत . सुरवात करू ...
"चला मिस्टर मिसेस निमकर लागा कामाला ...तो हसत तिला म्हणाला आणि दोघेही तयारीला लागले .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment