Sunday, November 18, 2018

द ओल्ड मॅन अँड द सी...अर्नेस्ट हेमीग्वे

द ओल्ड मॅन अँड द सी...अर्नेस्ट हेमीग्वे
एका कोळीयाने........ पु.ल. देशपांडे
देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स
सुप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिग्वे यांच्या नोबेल पारितोषिक प्राप्त कलाकृतीचा पु. ल. देशपांडे यांनी केलेला अनुवाद.
ही कथा आहे एका म्हाताऱ्या कोळ्याची.त्याने भर समुद्रात एका भल्या मोठ्या माशाशी केलेल्या संघर्षाची .....लढाईची....
तो म्हातारा कोळी रोज समुद्रात जातो आणि रिकाम्या हाताने परत येतो. त्याच्या जोडीला शेजारचा तरुण मुलगा आहे पण मासे मिळत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी आज त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली नाही . एकूण पंच्याऐशी दिवस म्हाताऱ्या कोळ्याला एकही मासा मिळाला नाही . आज तो एकटाच खोल समुद्रात मासेमारी करायला गेला आहे आणि त्याच्या गळात अठरा फूट लांबीचा मासा सापडतो . सलग दोन दिवस  एकटा स्वतःशी बडबडत तो त्या अजस्त्र माश्याशी झुंज देतो.आपला अनुभव पणाला लावून त्याच्यावर विजय मिळवतो आणि त्याला होडीच्या शेजारी बांधून परतीच्या प्रवासाला निघतो.
पण परतीच्या प्रवासात त्याला शार्क माश्यांच्या झुंडीशी सामना करावा लागतो . जेव्हा तो किनाऱ्याला लागतो तेव्हा माश्याचा फक्त सांगाडा उरलेला असतो.
अतिशय रोमांचक असे हे पुस्तक आहे . पु.ल.नी लेखकाचा आदर ठेवून जशास तसा अनुवाद केला आहे . यात कुठेही पु.ल.ची शैली दिसत नाही.
१९५५ साली वि. स. खांडेकर यांनी लेखकाकडे भाषांतराची परवानगी मागितली आणि त्यांना ताबडतोब मिळालीही. खांडेकरांनी १९५५ ते १९५८ पर्यंत भाषांतराचा प्रयत्न केला पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे काम सोडून द्यावे लागले .मग ते काम अनंत काणेकर यांच्याकडे आले . पण कामाच्या व्यापात त्यांनाही ते जमेना म्हणून प्रकाशकाला परत केले . शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पु.ल.ना विचारणा केली . पु.ल. नी नाकारले असते तर ते पुस्तक मूळ लेखकाला परत करायचे असे ठरले .पु.ल.आणि सुनीताबाईनी चार वर्षानी त्याचे भाषांतर पूर्ण केले . दरम्यान हेमीग्वे यांचा मृत्यू झाला . त्यामुळे हे पुस्तक हेमीग्वे याना पाठविण्याची इच्छा अपूर्णच राहिली .१९६५ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . मूळ पुस्तकातील चित्रांपासून सगळे काही जसेच्या तसे देण्याचा प्रकाशकांनी प्रयत्न केला आहे .

No comments:

Post a Comment