Sunday, July 25, 2021

महाभारताचे रहस्य

महाभारताचे  रहस्य... क्रिस्टोफर सी. डॉयल 
अनुवाद...मीना शेटे संभू
ख्रि. पू. २४४ ... 
त्या गर्द वनात लपलेल्या गुहेत सम्राट अशोक आपला सेनापती शूरसेनसोबत उभा होता. तिथे काय दिसणार आहे याची शूरसेनने आधीच कल्पना दिली होती. तरीही त्याला त्या गोष्टी पाहून भयानक धक्का बसला होता . समोर दिसणाऱ्या गोष्टी महाभारताशी संबंधित होत्या. गुहेतील रहस्य बाहेर पडले तर जगाचा विनाश निश्चित होता.आता हे रहस्य जगासमोर कधीच येऊ नये याची जबाबदारी सम्राट अशोकवर होती .
महाभारताच्या एका प्रकरणात या रहस्याची पाळेमुळे होती आधी ते प्रकरण महाभारतातून काढायला हवे पण त्याच बरोबर भविष्यात या रहस्याचे रक्षणही करायला हवे याची कल्पना सम्राट अशोकला होती. त्यासाठी त्याने आपल्या नऊ सरदारांची नेमणूक केली . आता भविष्यात त्या सरदार आणि त्यांच्या वारसांकडून रहस्याचे रक्षण होणार होते .
सन ५०० 
 राजवीरगडमध्ये कोणाला तरी ते पुस्तक सापडले होते आणि आता ते पालाच्या मागे लागले होते. अश्यावेळी काय करायचे ते पालाला पक्के माहीत होते.शेवटी तो त्या रहस्याचा राखणदार होता.वायव्येच्या बामियान राज्यात तो जाणार होता आणि दुसऱ्या राखणदाराच्या हाती आपल्याकडील रहस्य सोपविणार होता.
मार्च २००१ 
तालिबान्यांनी बामियानमधील प्राचीन बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या पण त्यामागील गुहेत एक मानवी सांगाडा सापडला जो दीड हजार वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज होता.
आता
जोनगडच्या किल्ल्यात  प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ विक्रमसिंह राहायला आलेत.त्यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे जी काही दहशतवादी संघटनांना हवी आहे . त्या गोष्टीसाठी अनेकांचे खून झालेत.आताही विक्रमसिंहाचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या किल्ल्यातील अत्याधुनिक  सुरक्षा यंत्रणा तोडून काही प्रशिक्षित मारेकऱ्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. पण मरणापूर्वी त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या  विजयसिह या आपल्या पुतण्याला काही इ मेल करून रहस्याचे रक्षण करण्यासाठी काही संकेत दिलेत.
विजयसिह आपल्या मित्रासह भारतात येतो पण विमानतळापासूनच त्याच्यामागे काही माणसे लागतात . ही माणसे लष्कर ए तोयबाचे दहशतवादी आहेत. त्यांना विजयसिहकडून त्या रहस्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यातूनच  जगभरात भयानक हल्ले करायचे आहे .
विजय आणि त्याचा मित्र या रहस्याचा शोध घेतील का ..?? कुठपर्यंत त्यांना हे रहस्य घेऊन जाणार आहे ..?? ते नऊजण अजूनही त्या रहस्याचे रक्षण करतायत का ...?? सम्राट अशोकाने भारतभर त्या रहस्याचे संकेत दडवून ठेवले आहेत .
एक थरारक.... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कादंबरी .

No comments:

Post a Comment