Wednesday, July 28, 2021

बुब्स... नजर... आणि इतर काही

बुब्स... नजर... आणि इतर काही 
डेपोत उभ्या असलेल्या एसी बसमध्ये ती शिरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
मोजक्याच सीट्स असलेली ती बस आता भरलेली होती. म्हणजे सगळ्या सीट्सवर प्रवासी बसलेले होते.ती एका खांबाचा आधार घेऊन उभी राहिली.
स्त्रियांसाठी राखीव म्हणून दोनतीन सीट होत्या.पण सध्याच्या काळात ते नियम कोण पाळत नव्हतेच.प्रवास करायला मिळतोय हेच पुरेसे....मोठ्या कष्टाने बसमध्ये जागा मिळते. ती उभ्या स्त्रीला कोण देईल ...?? बरे ती नुसती स्त्री नव्हती तर तरुण स्त्री होती. अंगावरचा तिचा कुर्ता नेमक्या जागी फिट बसला होता आणि त्यामुळे छाती एकदम उठावदार दिसत होती .गळ्यात एक बारीक चेन.कानात ब्लूटूथ इयर फोन आणि त्याची रिंग गळ्यात अडकवलेली होती .ब्लॅक टाईट लॅगिंगमुळे कंबरेखालील शरीरही भरीव दिसत होते. छातीच्या मानाने बाकी शरीर सूट होत नव्हते.पण  पाहणाऱ्याचे पाहिले लक्ष छातीकडेच जात होते.
ती खांबाला टेकून उभी राहिली आणि पर्समधून मोबाईल काढला . तिला पाहताच जवळच्या सीटवर बसलेल्या एका स्त्रीने उगाचच आपली ओढणी नीट केली. दुसरीने शेजारी बसलेल्या आपल्या नवऱ्याच्या कुशीत कोपर्याने ढोसले.बसमधील सगळे प्रवासी नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होते.
ती दिसायला काही देखणी नव्हती पण मानेखालचे शरीर नजरेत भरण्यासारखे होते. तसेही हल्ली तोंडावरच्या मास्कमुळे अर्धा चेहरा झाकूनच जातो म्हणा.त्यामुळे नजर उरलेल्या अंगावरूनच फिरते.
"पिच चांगले आहे.बॉलिंग करायला मजा येईल...."माझा शेजारी स्वतःशी पुटपुटला.
"बॅटिंग कधी करणार ..."?? मीही तिरकसपणे विचारले. 
"अश्या पिचवर बॅटिंग नाही मिळाली तरी चालेल. फक्त बॉलिंग करू ...."तो हसत म्हणाला.मी काही न बोलता मोबाईलमध्ये डोके घातले .
पुढच्या स्टॉपवर अजून एक स्त्री बसमध्ये चढली.अगदी लूज असलेला सलवार तिने अंगावर चढवला होता.छाती अतिशय सरळ दिसत होती . तिचीही नजर पहिलीच्या छातीकडे गेली. एक क्षणभर असूयेची चमक तिच्या नजरेत आली. आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही पाहून थोडे हायसे वाटले . पण अधूनमधून प्रवासात तीही तिच्या छातीवर नजर मारून घेत होती.
मध्येच एक प्रवासी उठला आणि त्याच्या जागेकडे ती सरकली.तिला क्रॉस करताना त्याचा हात नक्कीच तिच्या छातीकडे सरकलेला सर्वाना दिसला. ती रिकाम्या सीटवर बसताच उभे असलेले प्रवासी तिच्या शेजारी उभे राहिले . काहीजण शर्थीचे आपली नजर तिच्या कुर्त्यातून खोलवर भेदण्याचा प्रयत्न करू लागले .
संध्याकाळी 
ती ऑफिसमधून घरी आली. कालच ऑनलाइनवरून मागावलेला कुर्ता आज घालून गेली होती.छातीवर जरा जास्तच फिट बसला होता . संपूर्ण प्रवासात आणि ऑफिसमध्ये सगळे तिच्या छातीकडेच चोरून पाहत होते. तिलाही ते जाणवत होते पण काहीही घाला हल्ली मास्कमुळे लोक चेहऱ्याकडे न बघता खालीच बघतात .स्त्रीकडे बघण्याची वृत्ती बदलणार नाहीच .तिने कपडे काढले . छातीवरची  डबल पॅडची ब्रेसीयर काढून बाजूला ठेवली . आपल्या छोट्याश्या उभारावरून हात फिरवीत स्वतःशी हसली आणि गाऊन चढवून बाथरूममध्ये शिरली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment