Saturday, July 3, 2021

भुलभुलैय्या ...व.पु. काळे

भुलभुलैय्या ..... व.पु. काळे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
चष्मा माणसाचा स्वभाव सांगतो असे म्हणतात.म्हणूनच महादेवने ऑफिसमधील तणाव कमी करण्यासाठी चष्म्याची अदलाबदल केली. म्हणजे ऑफिसच्या साहेबांचा चष्मा युनियन लीडरने घातला आणि युनियन लीडरचा साहेबांनी .सदानंद हा मनमौजी हसतमुख तरुण तर दामले नेहमी गंभीर.. सतत कामात आणि त्याचाच विचार करणारे . संधी मिळताच महादेवने त्यांच्याही चष्म्याची अदलाबदल केली.पण त्यानंतर काय घडले ते वाचायलाच हवे.
राईलकर  हेडक्लार्क .ऑफिसमधील फाईली उलटसुलट करून घोटाळे करण्यात हुशार.प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचा बाप आला तरी आपले काही वाकडे करू शकणार नाही असेच सगळ्यांना सांगायचा. पण तो बिचारा ब्रम्हदेव तरी किती सहन करेल. एक दिवस संध्याकाळी खाली येऊन राईलकरासमोरच बसला .मग काय झाले ते वाचाच.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीकडून सर्व वस्तू काढून घेणारी व्यक्ती असेल का ...??? आमचा बेकार सुशिक्षित नायक जेव्हा कड्यावरून उडी मारायला गेला तेव्हा त्याच्याकडील सर्व वस्तू त्याने मागून घेतल्या . पण नायकाचे पुढे काय झाले ???
लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गातच बांधल्या जातात .पण मधुवंती मासिकाच्या केतनने छापण्यासाठी आलेल्या वधुवरांचे फोटो कापून आपल्या मनासारख्या जोड्या लावल्या .पण त्याचे परिणाम इतके भयंकर होतील याची त्याला कल्पना नव्हती.
अश्या अनेक फँटसी भुलभुलैय्यामध्ये व पु ने लिहिल्या आहेत.सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. त्याची स्वप्नेही फार मोठी नसतात .बरे वाईट ,आंबट गोड प्रसंग येतच असतात. चांगले आयुष्य जगण्यासाठी तो नेहमी कल्पनेच्या जगात वावरत असतो.त्या कल्पना व पु ने आपल्या नेहमीच्या शैलीत मांडल्या आहेत. कोणाला वाचनाची सुरवात करायची असेल तर त्यांनी भुलभुलैय्यापासून करावी.

No comments:

Post a Comment