Tuesday, July 6, 2021

फॉल्स इम्प्रेशन.…..जेफ्री आर्चर

फॉल्स इम्प्रेशन.…..जेफ्री आर्चर
अनुवाद...सुधाकर लवाटे
मेहता पब्लिशिंग हाऊस
व्हॅनगॉगच्या "सेल्फ पोट्रेट विथ बँडेज इयर" असे शीर्षक असलेले ते चित्र मुळातच साठ दशलक्ष डॉलरचे होते. पण व्हिक्टोरिया व्हेंटवर्थ सध्या पूर्णपणे कर्जात बुडाली होती आणि आता ते कर्ज चुकविण्यासाठी ते चित्र फेन्स्टनला द्यावे लागणार होते.
फेन्स्टन हा मोठा खाजगी बँकर. मूल्यवान चित्रांच्या बदल्यात कर्ज देणे हा त्याचा धंदा .तो क्रूर आणि स्वार्थी होता. कर्जदाराचा चित्रसंग्रहालय ताब्यात घेऊन नंतर त्याची हत्या करायची हा त्याचा डाव .व्हिक्टोरियाने त्याच्याकडे चित्र पाठवून दिले आणि त्याच रात्री तिचा गळा चिरून खून झाला .
डॉ. अँना पेट्रेस्कु एक इम्प्रेशनिस्ट . लिलावात जाणारे प्रत्येक चित्र तिच्या नजरेखालून जायचे.फेन्स्टनची मुख्य अधिकारी .समोर आलेल्या प्रत्येक चित्रांची ती अचूक किंमत सांगायची .व्हिक्टोरियाने व्हॅनगॉगचे चित्र फेन्स्टनला न देता बाहेर कोणाला तरी विकून कर्ज फेडावे असा सल्ला दिला आणि परिणाम तिची नोकरी जाण्यात झाला .
व्हिक्टोरियाचा खून झाल्याचे कळताच फेन्स्टनला व्हॅनगॉगचे चित्र मिळू द्यायचे नाही तर योग्य व्यक्ती गाठून त्याला ते चित्र विकून व्हिक्टोरियाला न्याय मिळवून द्यायचा असे अँना ठरविते आणि ते चित्र मोठ्या चातुर्याने आपल्या ताब्यात घेते. मग पुढे चालू होतो एक जीवघेणा पाठलाग .
ते चित्र आपल्या हातून निसटलेय हे कळताच फेन्स्टन पिसाळतो. तो आपल्या भाडोत्री मारेकऱ्याला तिच्या मागावर सोडतो .पण अँना अतिशय कुशलतेने त्या चित्राची काळजी घेत त्याला योग्य ठिकाणी कसे पोचविते त्यासाठी तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे वाचणे फारच रोमांचक आहे . 
लेखकाने 9/11 च्या घटनेचा अतिशय कुशलतेने वापर केला आहे . तसेच लंडन ,रुमानिया, टोकियो देशांच्या माध्यमातून पाठलागाचे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे वर्णन केले आहे .
हे पुस्तक अतिशय थरारक असून एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली ठेवता येणार नाही .

No comments:

Post a Comment