Wednesday, July 28, 2021

बियॉण्ड सेक्स ... सोनल गोडबोले

बियॉण्ड सेक्स ... सोनल गोडबोले 
चेतक बुक्स 
चाळीशीनंतर पुनर्जन्म होतो का ...?? एक नवीन आयुष्य खुणावते का ...? काहीतरी नवीन हवेसे वाटते ..? जोडीदाराच्या स्पर्शाचा कंटाळा येऊ लागतो का ..?? संसारातील बहुतांशी जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर रितेपणा जाणवतो का ...?? अश्यावेळी कोण अनोळखी आयुष्यात आला तर काय होईल ..?? समाज काय म्हणेल..?? घरचे काय म्हणतील...?? 
नेमक्या याच गोष्टी लेखिकेने सरळ साध्या लिखाणात मांडल्या आहेत . सोशल मीडियाचा आयुष्यावर होणारा परिणाम कधी चांगला असू शकतो तर कधी वाईट.
मीरा ही कथेची नायिका . तिचा प्रेमविवाह. आता ती चाळीस वर्षाची आहे.स्वतःला जीम योगा करून फिट ठेवलंय. अत्याधुनिक राहणीची आवड. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह. ती कविता करते. मैत्रिणीमध्ये फेमस.  रोज नवीन फोटो अपलोड करत असते.तिचा नवरा समीर ..इंजिनिअर आणि मोठ्या कंपनीत मॅनेजर. दोन मुले .एकूण काय... तर आर्थिक किंवा इतर जबाबदारी नाही .तरी तिला आता शारीरिक संबंधामध्ये स्पर्शामध्ये तोचतोचपणा जाणवू लागलाय .तिची कामेच्छा जास्त आहे हे तीच मान्य करतेय. मोबाईलमधून भरपूर साहित्य मिळतेय. तिच्या स्वप्नात परपुरुष आहेच. पण तरीही नवऱ्यावर आत्यंतिक प्रेम आहे .
शेवटी फेसबुकवरून तिची एका पुरुषाशी मैत्री होतेच .जस बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत होते तसेच तिच्या बाबतीत ही होते. प्रथम हाय..गुड मॉर्निंग...जेवण झाले का.. ?? मग सौंदर्याची तारीफ,कवितेची स्तुती नंतर व्हाट्स अप चॅटिंग.असे होत तो तिला भेटतो . मग भेटीगाठी वाढू लागतात . एक चांगला मित्र म्हणून तो तिच्या मनात आपली प्रतिमा तयार करतो . पण पुढे काय ..…?? ही निखळ मैत्रीचं राहील का ...?? दोघांचे साथीदार त्यांची मैत्री स्वीकारतील का ...?? त्यांची मैत्री कुठल्या थरापर्यंत जाईल ...?? यासाठी हे पुस्तक वाचायला हवेच.
हे पुस्तक वाचताना सोशल मीडियावर कशी मैत्री होते याचा सत्य अनुभव येतो. नायिकेशी मैत्री जुळण्याची पद्धत ही बऱ्याचजणांच्या ओळखीची आहे .

No comments:

Post a Comment