Tuesday, October 12, 2021

सहावी माळ... रंग ??? 2021

सहावी माळ... रंग ??? 2021
"म्हणजे माझी सेवा करायला तुला नेमले आहे का सुनबाईने ....."?? विमलआजीने  समोरील तरुण स्त्रीला निरखून विचारले.
 नवरात्र चालू होते . त्यामुळे आजच्याच रंगाचा ड्रेस त्या तरुण स्त्रीवर खुलून दिसत होता . विमलआजी बेडवर बसल्या होत्या ..
"होय ...मी संस्थेकडून आलीय .."ती हसत म्हणाली .
"किती दिवस राहणार आहेस ..?? माझ्याकडे फार कोण टिकत नाही .. मी खूप त्रास देते म्हणतात ..." विमल ताई छद्मीपणे म्हणाल्या ."म्हातारी झालीय ना आता"
"असू द्या हो... या वयात असे होणारच ..."ती म्हणाली .
"होय ना ... वय वाढते तसे आम्ही टाकाऊ होतो. तुम्ही असे वागता जसे आम्ही जग पहिलेच नाही"
"हा तुमचा औषधांचा डबा का .."?? तिने आजीच्या  बोलण्याकडे लक्ष न देता विचारले .
"हो आणि बघ त्या फ्रीजमध्ये गुलाबजाम आहे . तो देतेस का ...."?? तिने दिनवाणा चेहरा करीत म्हटले.
"आहो तुम्हाला डायबेटीस आहे ..असे काही देऊ नये अशी ऑर्डर आहे मला ... "ती कठोर स्वरात म्हणाली .
"मग त्या ओव्हनमध्ये पिझ्झाचा तुकडा असेल बघ .. माझा नातू ठेवून गेला होता ... " आजीने पुन्हा विनवणी केली.
"आहो आजी असे काही खायचे नाही . तुमचे पथ्यपाणी नीट पाळ अशी ऑर्डर आहे मला .... " तिने पुन्हा सांगितले .
"बरे ...मला भूक लागली आहे काही करून देशील का...." ??? शेवटी नाईलाजाने आजी तिच्यावर ढकलून  मोकळी झाली .
"हो... तुमच्यासाठी सूप आहे. उकडलेल्या पालेभाज्यांचा... तो ही रेडिमेड ... " हातातील रेडी टू ईटचे पाकीट दाखवीत तिने सांगितले ..
"अरे देवा ..असा रेडीमेड आणायचा होता तर तो मंचुरीयन सूप तरी आणायचा ..." आजी चिडून म्हणाली .
"चायनीज खाणे तुम्हाला पचणार नाही असे सांगितले आहे मला .."ती कामाच्या बाबतीत खूपच प्रामाणिक दिसत होती.
"राहू दे ....तो टीव्ही लावतेस का ...?? मराठी सिरीयल पहायची आहे मला ..".आजीने मोठ्या आशेने विचारले .
" सगळे मराठी चॅनेल काढले आहेत .सासूबाई मराठी सिरीयल प्रमाणे वागतात आणि आमच्याकडून ही तश्याच अपेक्षा ठेवतात असे मॅडम म्हणाल्या .... "ती फारच स्पष्टवक्ती दिसत होती .
"ते भाज्यांचे सूप...?? तू तरी पितेस का ..."?? आजीने छद्मीपणे विचारले .
"नाही...मी माझ्यासाठी न्यूडल्स करणार आहे .मी काय खायचे ते ही मॅडम ने ठरविले आहे ... " तिने शांतपणे म्हटले.
" मला दूध तरी देशील का ....?? आता तर आजी हात जोडण्याच्या तयारीत होती .
" दूध संपले आहे . मॅडम आणि सर जीममधून आल्यावर पिऊन जातात .तुमच्यासाठी चहा पुरते ठेवतात..." ती पक्की व्यावसायिक दिसत होती .
"तुमची औषध घेण्याची वेळ झाली आजी... "तिने गोळ्या हातात ठेवत म्हटले .
"अग बाई ... !! आताच तर चार गोळ्या दिल्यास ना ...?? ह्या दोन कुठल्या ...?? मी नाही घेणार या ..आता आजी  चिडल्या ...
"आहो तुमच्या दीर्घ आयुष्यासाठीच ही औषधे आहेत.मॅडमनी सांगितले आहे आईला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे ....".ती ठामपणे म्हणाली.
"हे असे आयुष्य जगण्यापेक्षा मला घेऊन का जात नाहीस माते .....आजीने हताश होऊन देव्हाऱ्यातल्या देवीपुढे हात जोडले .
"यावेळी नक्की येणार ना ..."?? तीने हसून विचारले. 
"यावेळी म्हणजे ...."?? विमलआजी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या .
"मागील दोन वर्षे तुम्ही घेऊन जा म्हणताय .दोन्ही वेळा दूत पाठविले आम्ही.पण तुम्ही वेगवेगळी कारण काढून टाळलेत. म्हटले यावेळी स्वतःच येऊन बघू कसे टाळता तुम्ही आम्हाला .... पण यावेळी खरच तुम्हाला कंटाळा आलेला दिसतोय .तयार असाल तर चला माझ्याबरोबर काही न बोलता .हे सर्व इथेच सोडून... ती शांतपणे आजीसमोर उभी राहून म्हणाली .
"यावेळी खरच येते. फक्त मला आजच्या रंगाची साडी नेसवून यांच्या फोटोसमोर घेऊन चल ...एकदा डोळे भरून पाहून घेते याना ...."
त्या स्त्रीने अलगद आजीला  बेडवरून उचलले आणि आजच्या रंगाची साडी नेसवून  तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर आणले .त्या फोटो कडे पाहत आजीने अलगद डोळे मिटले . तिने पुन्हा आत आणून  बेडवर झोपविले आणि दरवाजा उघडून निघून गेली .
होय ती देवीचं आहे 
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment