Friday, October 8, 2021

दुसरी माळ... रंग ..?? 2021

दुसरी माळ... रंग ..?? 2021
खरे तर तो वॉर्डच किळसवाणा होता. औषध..मलमूत्राची दुर्गंधी ..त्यातच कीटकनाशकांचा वास यांचे एकत्र मिश्रण असलेला वास सतत तिथे पसरून राहिला होता .लास्ट स्टेजला असलेले पेशंट तिथे आणून ठेवले जात होते. कोणाची जखम उघडी तर कोणाच्या अंगावर कपडे नाहीत तर कोणी स्वतःच्या घाणीत झोपलेला.तिथे आलेला पेशंट दोन रात्रच राहत असे तिसरा दिवस पाहतच नसे.पेशंट बरा होण्याचे चान्सेस नसल्यामुळे त्या वॉर्डकडे कोणीच लक्ष देत नसे .
नुकताच नवरात्र सुरू झाले होते .सगळीकडे ठराविक दिवसाचे रंग दिसत होते .आजच तिलाही कोणीतरी त्या वॉर्डमध्ये ऍडमिट केले होते. आपले दिवस फार राहिले नाहीत हे तिच्या लक्षात आले होते. आजाराने तिला पोखरून काढले होते .हाडाचा सापळाच दिसत होता .पण डोळ्यात एक चमक दिसत होती. 
आजच्या रंगाची साडी आणि हातात मध्यम आकाराची बॅग घेऊन तिने वॉर्डात प्रवेश केला तेव्हा ड्युटीवरच्या नर्सने बोटाने तिची बेड दाखवली. एक गोड हसून ती त्या बेडच्या दिशेने गेली.
बेडवरची काळी चादर पाहून तिने नाक मुरडले तशी शेजारची चिमुरडी हसली. 
"कोणी येणार नाही करायला ...असेच राहावे लागेल..ती चिमुरडी म्हणाली.तशी तीही हसली.
 "मग आपणच आपले करू ...." तिनेही  टोला परतवला आणि दोघीही हसू लागल्या .
तिने बागेतून स्वछ डार्क रंगाची चादर काढली .एका फडक्याने आपला बेड स्वछ केला .चादर बदलली बाथरूममध्ये जाऊन चादर धुवायला टाकली.
शेजारची ती चिमुरडी असूयेने तिच्याकडे पाहत होती. "माझी चादर कधीतरी बदलते ती मावशी .."ती चिमुरडी म्हणाली .
"मी बदलेन की ..."असे म्हणून तिने त्या छोटीला उचलले .तिला कमरेखाली काही जाणीवच नाही हे उचलताच लक्षात आले तिच्या.पण तिने तसे दाखवून दिले नाही .उचलताना तिचे कपडे ओलसर लागले . न जाणे किती दिवस तो फ्रॉक तिच्या अंगावर होता .कितीतरी वेळा नैसर्गिक विधी त्यातच झाले असतील. लाज वाटून त्या छोटीने मान खाली घातली .पण हिने अजिबात जाणवू न देता तिला व्हीलचेयरवर बसविले.मग तिचा बेड स्वच्छ केला .त्यावर नवीन चादर घातली. त्यानंतर व्हीलचेयर हळू हळू ढकलत बाथरूमपर्यंत आणली. एव्हड्या कामानेही तिला धाप लागली. तरीही तिला स्वछ करून पुन्हा बेडजवळ आणले .
"त्या पिशवीत माझे कपडे आहेत.त्यातील एक घाल मला..."छोटीने ऑर्डर सोडली. 
तिने हसत ती पिशवी उघडली.आत जुने जीर्ण चार पाच कपडे होते .त्यातील आजच्या रंगाचा ड्रेस काढून तिला घातला .मग अलगद बेडवर बसविले.आणि आपल्याकडील बिस्कीटचा पुडा तिला दिला .
"किती दिवस आहेस तू इथे ..."?? तिने  बिस्कीट खात विचारले .
"माहीत नाही .पण लवकरच जाईन ..."असे म्हणून तिने हात वर केला .
"मी ही जाईन लवकर असे म्हणतात सगळे.रात्री खूप त्रास होतो.....पण माझ्या आधी जाऊ नकोस ...." चिमुरडी डोळ्यात पाणी आणून म्हणाली .
"नाही जाणार ..." तिनेही डोळ्यातील अश्रू लपवित उत्तर दिले .
"उद्या ही आपण नवीन कपडे घालूया ...?? उद्या कोणता रंग आहे ..."?? तिने बाजूच्या कॅलेंडरकडे पाहत विचारले.त्यावर कोणीतरी नवरात्रीचे रंग लिहिले होते .
"हो नक्की ...."तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले .
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने उठून पाहिले तर शेजारची चिमुरडी गाढ झोपली होती पुन्हा कधीही न उठण्यासाठी .
तिने शांतपणे एक फोन केला आणि पलीकडच्या व्यक्तीला छोट्या मुलींसाठी आजच्या रंगाचा एक नवीन ड्रेस आणायला सांगितला.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment