Monday, October 11, 2021

पाचवी माळ... रंग ...?? 2021

पाचवी माळ... रंग ...?? 2021
नवरात्र चालू झाले आणि त्या गावात एक उत्साह पसरला .तिथे मनोरंजनाची फारशी साधने उपलब्ध नव्हतीच .लाईट तर अधूनमधून जात होते त्यामुळे टीव्ही हा प्रकार जवळजवळ बादच झाला होता .सण आले की गावात उत्साह संचारात होता . नवरात्र म्हणजे गरबा हे समीकरण लोकांच्या डोक्यात फिट बसले होते.त्यामुळे आता सगळेच खूष होते .
ती यावेळी मैत्रिणीकडे आली होती . शहरात राहणारी असल्यामुळे गावातील संथ जीवन तिला आवडले होते. इथला नवरात्र खूप प्रसिद्ध आहे अशी तिची मैत्रीण सांगत होती. गावाच्या बाहेर मोकळ्या पटांगणावर नवरात्रीचे विविध कार्यक्रम नऊ दिवस चालत.यावेळी ती पूर्ण तयारीत आली होती. नऊ रंगाचे वेगवेगळे कपडे. दागिने ,गरबा स्टिक सर्वच घेऊन आली होती.
आजचा दिवशी ही तिने आजच्या रंगाचा गरबा ड्रेस घातला होता .संध्याकाळपासून कार्यक्रम चालू झाले होते . ती मैत्रिणीसोबत धमाल करीत होती.काही वेळाने गरबा सुरू होणार होता त्याकडेच तिचे लक्ष लागून राहिले होते.
अचानक तिच्या मैत्रिणीला अवस्थ वाटू लागले. " तू गरबा खेळ...मी घरी जाते ..."असे म्हणून तिची मैत्रीण निघाली .एकटी राहिल्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली पण काही वेळातच गरब्यात रंगून गेली. 
त्या गरब्यात एक तरुणी तिच्यासमोर आली. तिच्याच वयाची असेल साधारण.आजच्याच रंगाची साडी नेसून ती एका लयबद्ध तालात नाचत होती.दिसायला साधी होती पण तिचा ताल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. समोरासमोर येताच दोघीही एकमेकांकडे पाहून हसत होत्या.
किती वेळ झाला कोण जाणे…. पण रात्र वाढत होती . शेवटी एक एक करत सर्व बाहेर पडू लागले . हिलाही आपल्या एकटेपणाची जाणीव झाली."निघायला हवे..."असे स्वतःशी म्हणत ती घराच्या दिशेने चालू लागली .
गावाबाहेरचा रास्ता असल्यामुळे गर्दी नव्हतीच. पुढेपुढे ती एकटीच चालू लागली.मनात गरब्याचे विचार चालू असल्यामुळे तिला आजूबाजूचे भान नव्हते.अचानक बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवल्यामुळे तिची लय तुटली आणि एकांतवासाची जाणीव झाली.
शहरातील असल्यामुळे पहिल्यांदा भीती वाटली नाही पण हळू हळू सर्वत्र पसरलेल्या काळोखामुळे भीती वाटू लागली.त्याचवेळी " आहो ताई.." अशी हाक ऐकू आली . अचानक कानावर पडलेल्या हाकेने ती दचकली वळून पाहिले तर तीच साडी नेसून गरबा खेळणारी मुलगी तिला हाक मारत होती.
"एकट्याच ..."तिने हसून विचारले 
"हो ना ...."
"चला आता मी आहे सोबत ..गप्पा मारीत निघू .."तिने साडीचा पदर कमरेला खोचला आणि चालायला सुरुवात केली.
"मी मुंबईला असते ...तुम्ही ....." तिने विचारले 
"मी फक्त नवरात्रात येते दरवर्षी. मग जाते पुन्हा घरी ..." दुसरीने सहज उत्तर दिले .
नंतर काही न बोलता दोघीही शांतपणे चालत होत्या .
"तुला भीती नाही वाटत असे एकटे चालायला .."पहिलीने कुतूहलाने  विचारले .
कसली भीती ...?? दरवर्षी कोणी ना कोणी गरबा खेळून तुझ्यासारख्या एकट्या चालत जातात किंवा चकव्यामुळे रस्ता विसरतात . त्यांना रस्ता दाखवायची जबाबदारी मी घेते .....तिने गुढपणे उत्तर दिले.
"म्हणजे ..."
"अग...गेली सत्तर ऎशी वर्षे मी तुझ्यासारख्या मुलींची या रस्त्यावर सोबत करतेय. माझ्या भक्तांसाठी इतकेतरी करायला हवे ना ...जा ते बघ तुझे घर आले ...."
तिने चमकून पाहिले तर खरेच तिचे घर दिसत होते  आभार मानण्यासाठी ती वळली तेव्हा तिची सोबती गायब झाली होती .
गेली कित्येक वर्षे एक स्त्री रात्री एकट्या स्त्रियांना सोबत करते अशी दंतकथा गावात पसरलेली होती.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment