Thursday, October 14, 2021

आठवी माळ.... रंग ....?? 2021

आठवी माळ.... रंग ....?? 2021
 ती ऑफिसमध्ये शिरली आणि तिथला गोंगाट शांत झाला. सगळे तिच्याकडे पाहू लागले.काहींच्या नजरेत सहानुभूती होती तर काहींच्या डोळ्यात असूया तर काहींच्या तिरस्कार.तशी ती कोणाच्या अध्यातमध्यात नव्हती.दिसायला साधारण. नेहमी एका टाईपचा ड्रेस तो ही साधा . कधीतरी साडी तीही साधारण.एकच हेयर स्टाईल . काहीजण ही नेहमी रस्त्यावरील कपडाबाजारात कपडे घेते असे म्हणायचे .
पण तिला याची कधीच जाणीव नसायची आणि असली तरी ती लक्ष देणारी नव्हती. सहकाऱ्यांशी नेमके बोलणे आपले काम चोख करणे आणि वेळ झाली की घरी पळणे हाच तिचा दिनक्रम.
नवरात्र उत्सव सुरू झाले होते. सगळे ऑफिस आजच्या रंगाचे ड्रेस घालून आले होते .फोटो सेशन चालू होते . उद्याच्या रंगाची चर्चा चालू होती. पण ही मात्र नेहमीसारखीच आली होती. तिला रंगाचे सोयरसुतक  दिसत नव्हते.आजच्या रंगाची एकही गोष्ट तिच्या शरीरावर दिसत नव्हती .
इतरांच्या गोंधळाकडे लक्ष न देता तिने आपले काम सुरू केले .मध्येच फोन वर  कोणाशीतरी बोलायची .संध्याकाळी ऑफिस संपले तशी ती निघाली.बाकीचे थांबले .
 घामाने भिजलेला आपला चेहरा पदराने पुसत दरवाजाचे लॅच उघडून ती आत शिरली तेव्हा समोर तो बसला  होता. त्याला पाहून ती गोड हसली .
"शॉवर घेणार ...?? त्याने विचारले तशी ती मोहरली .लाजून तिने त्याला कळेल इतपत मान डोलावली . तिने त्याची व्हीलचेयर बाथरूमच्या दिशेने वळवली .मग आपल्या खांद्याचा आधार देत त्याला आत नेऊन प्लॅस्टिक टेबलवर बसविले आणि हळूहळू त्याचे कपडे काढू लागली मग त्याच्यासमोर उभी राहून स्वतःचे कपडे काढले.तो अनिमिष नेत्राने तिला पाहत होता .
शॉवर सुरू करून त्याला हळुवारपणे साबण लावत आंघोळ घालू लागली. तो डोळे बंद करून ते अनुभवत होता.काही वेळाने दोघेही बाहेर आले. तिने त्याला स्वछ करून नवे कपडे चढविले. आजच्या रंगाचा टी शर्ट आणि शॉर्ट .कालच तिने ते काढून ठेवले होते .मग सावकाश स्वतःचे कपडे घालू लागली. आजच्या रंगाची शरीरावर फिट बसणारी साडी . त्याच रंगाची लिपस्टिक, टिकली . दोन्ही हातात त्याच रंगाच्या बांगड्या .तयारी पूर्ण झाल्यावर तिने त्याच्याकडे पाहून हसून स्वतःभोवती गिरकी घेतली .त्याने हातानेच छानची खूण करून तिला जवळ ओढले .
"जेवण काय करू ..."?? तिने विचारले 
"काहीही कर ...पण माझ्यासमोर राहून कर ..."तो डोळा मारीत म्हणाला .
"चावट ..."ती लटक्या रागाने हात उगारत म्हणाली.
 रात्री जेवण करून तिने त्याला बेडवर झोपविले आणि नंतर हळूच त्याच्या कुशीत शिरली .त्याचे डोके आपल्या छातीशी घट्ट धरून केसांमधून हात फिरवीत बसली. काही वेळाने तो शांत झोपी गेला.
तो झोपल्याची खात्री होताच ती उठली .कपडे बदलताना तिने टेबलावरील त्याच्या फोटोकडे पाहिले . फोटोत तो रुबाबदारपणे बाईकजवळ उभा होता.बाजूला एका पेपरचे कात्रण फ्रेम करून ठेवले होते . त्यात लिहिले होते एका तरुणाने जीवाची बाजी लावून एका तरुणीला चार गुंडांपासून वाचविले होते पण त्या प्रयत्नात त्याच्या कमरेखालील बाजू पूर्णपणे निकामी झाली होती .
तिने फोटोसमोर हात जोडले . त्यादिवशी तो आला नसता तर त्या गुंडांनी तिच्या शरीराचे काय हाल केले असते याची कल्पनाच ती करू शकत नव्हती .असा नवरा दिल्याबद्दल देवाचे आभार मानले तिने .
होय ती देवीच आहे
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment