Friday, October 15, 2021

नववी माळ..... रंग.….?? 2021

नववी माळ..... रंग.….?? 2021
"काय करतेस ग घरी बसून ...??  सकाळी सात ते रात्री आठपर्यंत नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणारी तू .घरात कंटाळा येत नाही का  ....?? तिची एक  मैत्रीण विचारत होती.
त्या चारपाचजणी चौकातील देवीच्या मंडपापाशी जमल्या होत्या .आजच्या रंगाचा ड्रेस आणि साड्या सर्वांना खुलून दिसत होत्या.तिने ही आजच्याच रंगाची साधी साडी नेसली होती.सर्वजणी कॉलेजपासून एकत्रच होत्या .नोकरी …करियर..संसार सांभाळणाऱ्या.
"हिला कसला कंटाळा येणार ग ...?? बघावे तेव्हा ऑनलाईन दिसत असते ...फोन करावा तर माझा कार्यक्रम आहे .मी लाईव्ह आहे ..हीच कारणे देत असते ..." दुसरीने बोलायचा चान्स सोडला नाही .
"म्हणे मुलीसाठी नोकरी सोडतेय. तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे ..जशी काय आम्हाला मुलेच नाही ..." तिसरीने बऱ्याच दिवसाची खदखद काढली.
"कॉलेजमध्ये असल्यापासून बघतेय अगदी शांत असतेस तू. काही प्रकरण ही केले नाहीस तू.जॉब ही व्यवस्थित चालू होता .....मग आता काय करतेस तू....?? एकीने कुतूहलाने विचारले .
"जाऊ द्या ग ...बोलत बसलो तर दिवस पुरणार नाही . आरती सुरू होतेय चला जाऊया..."असे बोलून ती सर्वांसोबत मंडपात शिरली.
मंडपाच्या प्रवेशद्वारावर एका फळ्यावर आजचा रंग त्याची कारणे आणि एका देवीची माहिती सुंदर हस्ताक्षरात लिहिली होती. 
" किती सुंदर हस्ताक्षर आहे. बघत राहवेसे वाटते..."एक कौतुकाने म्हणाली .
आतमध्ये देवीची आरती सुरू झाली होती.फारच थोडी माणसे योग्य अंतर ठेवून आरती करत होते पण त्यात ती बारा वर्षांनी छोटी मुलगी लक्ष वेधून घेत होती. आजच्या रंगाचा स्वच्छ ड्रेस ,त्याच रंगाची रिबीन आणि स्पष्ट खणखणीत स्वरात लयबद्ध टाळ्या वाजवित आरती म्हणत होती.तिच्या आरतीमुळे इतरांची तारांबळ उडत होती. बऱ्याजणांना योग्य शब्दच माहीत नव्हते . त्याचे परिणाम दिसत होते. पण ती छोटीमात्र आत्मविश्वासाने आरती म्हणत होती.
"एकतरी आरती इतक्या स्पष्टपणे बोलता येईल का आपल्याला ... "?? टाळ्या वाजवित एक मैत्रीण दुसरीच्या कानात पुटपुटली.
आरती संपली आणि तीर्थप्रसादला गर्दी झाली.पण ती छोटी मुलगी तिच्याकडे  धावत गेली आणि पायाला हात लावून नमस्कार केला .
"मॅडम ...बरोबर म्हटली ना आरती आणि मनाचे श्लोक ..."?? छोटीने निरागस चेहऱ्याने विचारले .
"खूप सुंदर..... " तिने कौतुकाने गालावर हात फिरवत सांगितले.
इतक्यात एक दहा वर्षाचा मुलगा प्रसाद घेऊन तिच्यासमोर आला .
"अरे रवी..... छान लिहिलेस तू बोर्डवर . सगळे तारीफ करतात तुझ्या हस्ताक्षराची .पण आता ड्रॉईग सुधरव. मी तुला एका मॅडमशी ओळख करून देते. त्या तुला ड्रॉईग शिकवतील ...." तिने त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हटले . 
"चालेल मॅडम .."असे म्हणून त्यानेही तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला .
तिच्या मैत्रिणींना कळेना काय चालू आहे .ती अजूनही शांतच होती.
मंडपाच्या बाहेर येताच एक मध्यमवयीन माणूस आपल्या तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन तिच्या समोर आला .
"कालच सोसायटीच्या वॉचमनला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले. हिने घरी येऊन आम्हास सांगितले तो हिच्या अंगाला कुठे कुठे स्पर्श करीत होता .मॅडम तुमच्यामुळे माझ्या मुलीला बरे वाईट स्पर्श कळू लागले त्यामुळेच पुढचा अनर्थ टळला ...."असे बोलून त्याने हात जोडले. 
"मॅडम मी तुमच्यावर कविता केली आहे . ऐकणार ..?? त्या मुलीने विचारले .
" हो ..." तिने कौतुकाने उत्तर दिले 
मग एक छान कविता त्या मुलीने सर्वांसमोर ऐकवली.
ती ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
"हे सर्व काय चालू आहे ग ...?? तिच्या एका मैत्रिणीने आश्चर्याने विचारले.. कोण तो मुलगा ....?? कोण ही मुलगी ....?? सगळे पाया का पडतात तुझ्या ."??
" हे सर्व माझे ऑनलाईन विद्यार्थी आहे .तुम्ही विचारताना तू सतत ऑनलाईन कशी असतेस..?? मी ह्या मुलांना बालसंस्कार शिकवते .दर दिवशी संध्याकाळी दोन तास मी या मुलांना देते. त्यांना सगळ्या देवांची आरती,मनाचे श्लोक, देशातील शूर सैनिकांची, प्रसिद्ध नेत्यांची माहिती सांगते .शरीराच्या विविध भागांची ओळख,त्याची कार्य ,चांगले ,वाईट काय याची माहिती देते . सुंदर हस्ताक्षर कसे काढावे हे शिकवते . मोबाईलने मुले बिघडतात त्यांच्यावर वाईट संस्कार होतात हे नुसते बोलण्यापेक्षा त्याच मोबाईलचा वापर करून मुलांवर संस्कार कसे करता येईल याचा प्रयत्न करते मी. यातील एक जरी विद्यार्थी चांगला नागरिक बनला तरी स्वतः ला भाग्यवान समजेन मी . उगाच घरी बसून काय करते याचे उत्तर हेच आहे ...असे बोलून ती चालू लागली 
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment