Sunday, October 10, 2021

चवथी माळ... रंग ...?? 2021

चवथी माळ... रंग ...?? 2021
संध्याकाळ होत आली होती. ती नुकतीच बाजारातील देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडली होती. आजच्या रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. आहो घरी गेल्यावर आपल्या रूपाची तारीफ करणार हे पक्के माहीत होते तिला . त्या विचारानेच ती मोहरून जात होती. दहा वर्षे मुलीची ती आई आहे हे सांगूनही खरे वाटत नव्हते.
 तशी ती एकदम सरळमार्गी स्त्री. रस्त्यात कोणाचे भांडण झाले तरी रस्ता बदलून लांबून अंग चोरत जायची.आपले घर आपला छोटा संसार यात रमणारी साधी गृहिणी होती ती .
चौकात येताच तिची नजर भिरभिरु लागली .जणू काही ती कोणाला तरी शोधत होती. सकाळी इथेच तर पाहिले होते तिला. आजच्याच रंगाचा परकर पोलके घालून हातात चाबूक घेऊन स्वतःला फटके मारत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागत फिरत होती.
तिच्या मुलींच्याच वयाची दिसत होती म्हणून जास्त लक्षात राहिली होती ती. नवरात्र सुरू झाल्यात त्यामुळे नऊ दिवस ती जरीमरी मातेची भक्त बनून इथे लोकांकडे पैसे मागणार हे नक्की.
सकाळी तिने तिला दहाची नोट दिली . तो माणूस बहुतेक तिचा बाप असावा ...त्याच्या डोक्यावर जरीमरी आईचा देव्हारा ठेवला होता . तो नुसताच तिच्या मागून फिरत होता .वा... रे... वा .. पोरगी स्वतःला चाबकाचे फटके मारत लोकांपुढे हात पसरते आणि हा शहाणा नुसता डोक्यावर देवी घेऊन फिरतो.अस्सा राग आला होता तिला....
शेवटी तिला त्या दुकानाच्या बंद शटरजवळ ती दिसलीच .त्या माणसाच्या मांडीवर बसून वडापाव खात होती. त्याचे हात तिच्या अंगावरून फिरत होते.मध्येमध्ये ती त्याचा हात झटकून टाकायचा प्रयत्न करीत होती . ती जवळ येताच दोघांनीही मान वर करून तिच्याकडे पाहिले. छोटीशी नजर स्वछ निर्मळ दिसली पण त्याची नजर पाहून अंगावर शहारे आले तिच्या अंगावर .हातातील खाऊचा पुडा देऊन ती ताबडतोब मागे फिरली .पण त्याची नजर तिच्या डोक्यातून जात नव्हती .
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उठली.कालची घटना तिच्या मनातून साफ निघून गेली होती. आपल्या नवऱ्याचे आणि मुलीची तयारी करण्यात अर्धा दिवस पार झाला .दुपारी मुलीला आजच्या रंगाचा ड्रेस आणि स्वतः आजच्या रंगाची साडी नेसून ती बाहेर पडली . आपल्या मुलीला ती जरीमरी मुलगी काय करते ते दाखवायचे होतेच .
मुलीला घेऊन ती चौकात आली. चौक गर्दीने फुलून गेला होता. सगळीकडे आजचा रंग खुलून दिसत होता. चौकाच्या मध्यभागी ती जरीमरी मुलगी आपल्या अंगावर चाबूक ओढीत पैसे मागत होती आणि तो माणूस देवीचा देव्हारा कोपऱ्यात ठेवून तंबाखू मळत बसला होता. 
तिने दहाची नोट आपल्या मुलीच्या हातात दिली आणि देवीच्या पुढ्यात ठेवायला सांगितली. देवीच्या पुढ्यात नोट ठेवणार्या आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत असताना तिची नजर त्या माणसाकडे वळली आणि ती ताठरली. 
होय.....तीच नजर तिने काल रात्री त्याच्या डोळ्यात पहिली होती. अचानक तिला त्या नजरेचा अर्थ कळला आणि तिचे डोळे संतापाने फुलून उठले.
काही न बोलता तिने त्या मुलीचा चाबूक आपल्या हाती घेतला आणि सपासप त्याच्या अंगावर ओढू लागली . अचानक झालेल्या हल्ल्याने तो गोंधळला आणि ओरडत रस्त्यावर लोळू लागला . पण आता ती दया दाखवणार नव्हती .काही न बोलता ती देवीचे रौद्र रूप धारण करून त्याच्या पाठीवर सपासप चाबूक ओढत राहिली.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment