Wednesday, October 13, 2021

सातवी माळ...रंग .?? 2021

सातवी माळ...रंग .?? 2021
शनिवार असल्यामुळे तो मॉल गर्दीने फुलून गेला होता.तीन मजली असलेला तो मॉल शहरात प्रसिद्ध होता . सुईपासून ते मोटारपर्यंत प्रत्येक गोष्ट तिथे मिळत होती.साहजिकच सर्व थरातील लोक तिथे खरेदीला यायचे आणि  एखादा सण किंवा उत्सव असेल तर पाहायलाच नको ..काहीजण नुसते टाईमपाससाठी यायचे..पण कसला टाईमपास..?? काहीही खरेदी न करता दोनतीनशे रुपये कसे खर्च व्हायचे ते त्यांनाच कळायचे नाही .
आजच्या रंगाच्या कपड्यांनी आणि वस्तूंची तो मॉल जणू झळाळून उठला होता .नवरात्र उत्सव चालू होता त्यामुळे रोज नव्या रंगाच्या कपड्यांनी आणि वस्तूंनी मॉल भरून गेला होता.
आज तिची ड्युटी फूड मॉलजवळ होती. अंगावर कडक इस्त्रीचा युनिफॉर्म ..डोक्यावर स्वछ कॅप.. पायात चकचकीत शूज घालून ती कठोर चेहऱ्याने सर्वांवर नजर ठेवून होती.मॉलच्या सिक्युरिटी गार्डपैकी एक गार्ड होती ती. आजच्या रंगाचे विविध ड्रेस पाहून तिच्या मनात असूया उमटत होती.पण शेवटी आपली नोकरी स्पेशल आहे याची  तिला जाणीव होती. तरीही आजच्या रंगाचा स्कार्फ गळ्यात घालून ती ड्युटी करत होती.
एका फूड शॉपजवळ काही टारगट मुले तरुण मुलींच्या जवळपास फिरत होती हे तिने नजरेच्या कोपऱ्यातून पाहिले होते .सहज फिरत ती त्यांच्याजवळ गेली .एका मुलीच्या कंबरेखाली जाणारा त्या मुलाचा हात तिने कोणाच्या नकळत पकडला .आजूबाजूला कोणाचा गोंधळ न उडू देण्याची काळजी घेत तिने त्याच्या हाताची विशिष्ट नस दाबली आणि पुन्हा गडबड केलीस तर फेकून देईन असे कानात कुजबुजत सांगितले .हात चोळत तो तरुण दूर झाला आणि परत ती जागेवर गेली.
अचानक तिला रेड अलर्ट मिळाला.हातातील वॉकीटॉकीमधून सगळ्यांना बाहेर काढा अशी सूचना मिळाली.
तिने चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता सर्वाना एकत्र जमा करून हळूहळू फूड मॉलच्या बाहेर जाण्यास मदत करू लागली . पण त्याचवेळी पाठीवर सॅक असलेली तरुणी टॉयलेटच्या दिशेने जाताना दिसली . सर्वजण फूड मॉलच्या बाहेर गेल्याची खात्री पटताच ती टॉयलेटकडे वळली .
टॉयलेटमध्ये ती तरुणी सॅक खोलून काहीतरी करत होती .अचानक सिक्युरिटी गार्ड पाहताच ती चपापली. सॅकमधून हात बाहेर काढणार इतक्यात तिच्या मानेवर मजबूत हाताची पकड बसली आणि क्षणात तिची मान तुटली .
"फूड मॉलमध्ये एक ... तिने मोबाईलवरून कोणाशी तरी संपर्क साधला आणि अंगातील युनिफॉर्म काढून टाकला .आतमध्ये आजच्या रंगाची टी शर्ट आणि ट्रॅकपॅन्ट होती.केस मोकळे सोडून कानाला इयरफोन लावून ती बाहेर पडली आणि खालच्या गर्दीत दिसेनाशी झाली.
गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना आपली ओळख उघड करायची नसते हा ट्रेनिंगमधील पहिला धडा  ती कधीच विसरत नव्हती.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment