Thursday, October 7, 2021

पहिली माळ ......रंग ....??? 2021

पहिली माळ ......रंग ....??? 2021
रात्री होणाऱ्या शोसाठी ती संध्याकाळी लवकरच हॉटेलमधून बाहेर पडली .रस्त्यात किती ट्रॅफिक असतो आणि चाहते कसे आडवे येतात याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यात नवरात्र सुरू झाले होते.
तिने आजच्या रंगाची साडी नेसली होती.सेलिब्रेटींनी हे सर्व करायलाच हवे.मार्केटिंगचाच एक भाग असतो तो. 
गेले महिनाभर ती राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शो करीत होती .आताही तिचे पोस्टर हॉटेलभर लागले होते . शेवटी आंतरराष्ट्रीय किर्तीची नृत्यांगना होती ती . जगभरात नाव होते तिचे. तिला नुसते पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते.आताही ती बाहेर पडली  आणि बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे पाहून हात हलविला  आणि गाडीत बसली .
"मॅडम... आजचा शो ओव्हरपॅक आहे .शो झाल्यावर पहाटेचे फ्लाईट आहे .उद्या दुपार आणि संध्याकाळ दोन शो आहेत....तिच्या सेक्रेटरीने माहिती दिली.
काही न बोलता तिने मान डोलावली .रस्त्यात एके ठिकाणी गाडी सिग्नलला थांबली तेव्हा गाडीच्या काचेवर टकटक झाली.तिने काच खाली केली तेव्हा समोर आठ वर्षांचा मुलगा हातात थाळी घेऊन उभा होती .त्याच्या अंगावर आजच्याच रंगाचा फाटका शर्ट होता.तिच्या सेक्रेटरीने मान हलवून नकार दिला तेव्हा त्या मुलाने फुटपाथवर एका ठिकाणी बोट दाखविले . कुतूहलाने तिने तिकडे पाहिले.
  साधारण बारा  वर्षाची एक मुलगी लवचिकपणे अंग हलवित नाचत होती. तिच्या अंगावर आजच्याच रंगाचा ड्रेस होता.तिचे पदन्यास पाहून ती अचंबित झाली .घाईघाईने तिने शोफरला गाडी बाजूला लावायला सांगितली .रस्त्याच्या एका कोपऱ्यात गाडी लावून ती कौतुकाने तिचा नाच पाहत बसली.
 नाच संपताच तिच्या भोवतालची गर्दी पांगली आणि पाहणारे आपापल्या रस्त्याने चालते झाले .पुन्हा तो मुलगा तिच्यासमोर येऊन थाळी वाजवत बसला.थाळीत मोजून तीस ते चाळीस रुपये होते.तिने काही न बोलता शंभर रुपयांची नोट टाकली.त्याने नवलाईने त्या नोटेकडे पाहिले आणि गोड हसून आपल्या बहिणीकडे नाचतच गेला.स्वतःशी हसत तीने गाडी सुरू करायची सूचना केली. नेहमीप्रमाणे थिएटरभोवती गर्दी जमली होती . कशीबशी वाट काढत ती आत शिरली आणि सर्व विसरून कार्यक्रमाच्या तयारीला लागली.
नेहमीप्रमाणे तिचा परफॉर्मन्स दमदार झाला. काहीजणांनी तर चक्क नोटा उधळल्या .समाधानाने ती रात्री हॉटेलकडे निघाली. त्या सिग्नलजवळ येताच तिला त्यांची आठवण झाली .मध्यरात्री रस्त्यावर शुकशुकाट होता .वातावरण ही थंडच होते. तिची नजर त्या दोघांना शोधत होती.
 सिग्नलजवळ असलेल्या  बिल्डिंगच्या भिंतीला चिटकून ते दोघे झोपले होते .त्यांना पाहून ती खाली उतरली. तिची चाहूल लागताच त्याची सावध झोप उडाली.समोर तिला पाहताच दोघेही चकित झाले.
" दीदी..... हिनेच आपल्याला शंभर रुपये दिले.... "त्या मुलाने सांगितले.
" छान नाचतेस तू ...तिने तिच्याकडे पाहत म्हटले  आणि पर्समधून हातात येतील तितके पैसे काढून त्यांच्या समोर ठेवले.
"मी ओळखते तुम्हाला. शोरूमच्या टीव्हीत तुमचा डान्स पाहत मी नाचायला शिकले. खूप छान नाचता तुम्ही....तिने  तिला सलाम करीत म्हटले  आणि पैसे तिला परत केले .
आश्चर्यचकित होत तिने ते पैसे हातात घेतले आणि वळली.गाडीजवळ येताच ती थांबली आणि गाडीतील म्युझिक सिस्टीम सुरू केली. त्या म्युझिकच्या ठेक्यावर नकळत तिच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या.साडीचा पदर कमरेत खोचून ती जवळजवळ पंधरा मिनिटे बेभान होऊन नाचत होती. एक जगप्रसिद्ध नर्तिका आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय परफॉर्मन्स देत होती.आणि समोर प्रेक्षक होते ती दोन लहान मुले .
म्युझिक संपले आणि थकलेल्या शरीराने ती त्यांच्यासमोर उभी राहिली .आ वासून ती दोन्ही मुले तिचा तो अप्रतिम परफॉर्मन्स पाहत होते .
"कसा वाटला माझा डान्स ...."?? तिने हसत विचारले .
काही न बोलता ती मुलगी उभी राहिली आणि जसाच्या तसा परफॉर्मन्स तिच्या समोर सादर केला .डोळ्यातील पाणी बाहेर पडू न देण्याचा प्रयत्न करीत  तिचा परफॉर्मन्स  ती पाहत होती .
ते नृत्य संपताच  तिने थाळीतील  नोट काढून तिच्यासमोर धरली आणि पायावर डोके टेकविले .
"ही गुरुदक्षिणा आहे आणि तुमच्या कलेचा सन्मान आहे .जसा तुम्ही संध्याकाळी माझ्या कलेचा केलात .."
 तिने  चकित होऊन हातातील नोटेकडे पाहिले.तीच दुपारची शंभराची नोट होती.
होय त्या देवीचं आहेत
© श्री .किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment