Saturday, October 9, 2021

तिसरी माळ... रंग ....?? 2021

तिसरी माळ... रंग ....?? 2021
रात्रीची  साधारण साडेनऊची वेळ. त्या बसस्टॉपवर ती एकटीच उभी होती. नवरात्रीच्या दिवसात हल्ली रंगांना फारच महत्व आले होते. तिने ही आजच्याच रंगाची साडी नेसली होती. सारखी घड्याळात पाहत दूरवर मोकळ्या रस्त्याकडे पाहत होती.
जसजशी रात्र चढू लागली तसतशी आजूबाजूची गर्दी  वाढू लागली. नको त्या माणसांचा वावर तिथे होऊ लागला .एक दोनजणी तर तिच्याकडे पाहून नई है क्या ...?? हमारे पेट पे क्यू लाथ मारने आई है ..??असे पुटपुटताना तिने ऐकले. शेजारून एक काळपट घामाजलेला तरुण तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडून गेला .हळूहळू तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटू लागली .
नाईलाजाने तिने एका रिक्षाला हात केला .ती रिक्षा थांबली नाही पण बराच वेळ एका कोपऱ्यात उभी असलेली रिक्षा हलली आणि तिच्यासमोर उभी राहिली.ती आत बसताच रिक्षा चालू झाली .काही अंतरावर जाताच अजून दोन माणसे रिक्षात चढली .त्यांना पाहताच ती घाबरली . त्या सर्वांनीच आजच्या रंगाचे शर्ट आणि टी शर्ट चढविले होते .
तिने रिक्षा थांबविण्याची विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही . आतमध्ये झटापट सुरू असतानाच एका जुन्या फॅक्टरीजवळ ती रिक्षा थांबली .त्या तिन्ही तरुणांनी खेचतच तिला बाहेर काढले आणि उचलून आतमध्ये नेले .
आतमध्ये जमिनीवर फेकताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.ते दोन तरुण तिच्या शरीराशी खेळू लागले तर एकजण तिचा विडिओ काढू लागला .
अचानक त्या रूमचा दरवाजा धाडकन उघडला आणि एक जीन्स आणि टीशर्ट घातलेली तरुणी आत शिरली. तिच्यासोबत साध्या कपड्यातील पोलीसही होते. त्या तरुणीने ही आजच्याच रंगाचे टी शर्ट घातले होते .
पोलिसांना पाहताच त्या तिघांनीही पळायचा प्रयत्न केला पण त्या तरुणीने आपल्या हातातील रिव्हॉल्व्हरने त्यांना शांतपणे गोळ्या घातल्या .
पहिल्या तरुणीने ताबडतोब तिघांचे खिसे चपापले आणि त्यांची पाकिटे काढून त्यातील सर्व पैसे आपल्या पर्समध्ये टाकले.
"लवकर यायला काय होते .दोघांनी वाट लावली माझी सर्व अंग दुखतंय. साले मिळेल तिथे हात लावत होते...."ती दुसरीकडे पाहत रागाने म्हणाली .
"म्हणून तर तुला मदतीला घेतले.सभ्य मुलगी तयार झाली असती का ...?? बरेच दिवस यांच्यावर संशय होता.किती स्त्रियांच्या आयुष्याची नासाडी केली असेल यांनी ..आज तुझ्या मदतीने याना धडा शिकवला .त्यांच्या पाकिटात जितके पैसे मिळतील ते तुझे .शेवटी तुझीही मेहनत आहेच की.आजच्या रात्रीची कमाई समज ही ..." दुसरीने रिव्हॉल्व्हर काखेखालच्या होस्टरमध्ये ठेवत म्हटले .
होय दोघीही देवीचं आहेत 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment