Friday, September 16, 2022

क्रिमिनल जस्टिस 2

क्रिमिनल जस्टिस 2
बिहाईंड क्लोज डोअर

बिक्रम चंद्रा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील आहे. पत्नी अनुराधा आणि बारा वर्षाची  मुलगी रिया यांच्यासोबत एक छान आयुष्य जगतोय. 
अनुराधा  डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचे एका  मानसोपचारतज्ञाकडे उपचारही चालू आहेत. अनुराधा  एकलकोंडी बनली आहे. सतत गोंधळलेली आणि विसारळू  बनली आहे असे तो म्हणतो.त्याने तसे आपल्या आईला आणि सासऱ्यांना ही सांगितले आहे.
आजच बिक्रमने  एक खूप  गाजलेली केस जिंकली आणि तो आनंदात घरी आला .आल्यावर त्याने पत्नीचा वॉर्डरोब चेक केला .त्यातील वस्तूंचे फोटो काढले. तिच्या गाडीचे किलोमीटर चेक केले. फोन चेक केला . त्यानंतर त्याने तिला आईसस्क्रिम आणले का ? म्हणून विचारले. आईसस्क्रीमचे तिच्या लक्षात नव्हते म्हणून स्वतः जाऊन आईसक्रिम घेऊन आला . रात्री तिघेही एकत्र जेवले .
मध्यरात्री रियाला कसल्याश्या आवाजाने जाग आली . तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पाहिला तर तिची आई बाहेर  जात होती. म्हणून ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिचे वडील जखमी अवस्थेत बेडवर पडले होते. त्यांच्या कुशीत सुरा भोसकला होता .भीतीने तिने तो सुरा बाहेर काढला आणि रक्ताची धार सुरू झाली.घाबरून तिने आपल्या आजीला फोन केला .
थोड्या वेळाने पोलीस  हजर झाले आणि बिक्रम चंद्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. थोड्याच वेळाने अनुराधाने त्याच्याजवळ येऊन सॉरी म्हटले आणि काही वेळाने बिक्रम चंद्रा मृत्यू पावला.
 रियाच्या जबानीनुसार पोलिसांनी अनुराधाला अटक केली. तिचा गाऊन रक्ताने माखला  होता . तिने आपण नवऱ्यावर  चाकूने वार केले हे  कबूल केले. 
तिचा बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला .पोलिसांनी त्याला जामिनासाठी वकिलाची मदत घेण्यास सांगितले. बिक्रम चंद्रासारख्या वकीलावर हल्ला झालाय तेव्हा त्याच्या विरोधात कोणताही वकील केस लढणार नाही हे निश्चित होते.इतक्या रात्री कुठून वकील आणायचा या चिंतेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने माधव मिश्राला फोन केला .
माधव मिश्राचे लग्न झालेय .आज त्यांची पहिली रात्र आहे . त्याचवेळी त्याचा फोन वाजतो आणि त्याला केस घेणार का ? असे विचारले जाते. समोरची पार्टी तगडी मालदार असेल या आशेने  माधव तडक मुंबईला निघतो.
केस फारच सोपी आणि सरळ असते. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला आहे.सर्व पुरावे अनुराधाच्या विरुद्ध आहे . सोशल मीडिया ,प्रेस सर्व अनुराधावर तुटून पडलेत.तिला तुरुंगातही त्रास होतोय.त्यात ती गरोदर असल्याची बातमी येते. अनुराधा काहीही बोलायला तयार नाही . माधव मिश्राला फक्त खुनाचा हेतू शोधायचा आहे.
अनुराधाविषयीची सगळी माहिती गोळा करायला माधव मिश्रा सुरवात करतो .त्याला साथ मिळते ती एका नवोदित हुशार स्त्री वकिल निखटची .निखटने माधव मिश्राला आधीच्या केसमध्येही मदत केलेली असते आणि त्याचा परिणाम नोकरी जाण्यात होते.आता ती पुन्हा जॉब शोधतेय .माधव पुन्हा तिला सहाय्यक बनण्याची विनंती करतो आणि ती स्वीकारते.
दोघे मिळून अनुराधाच्या केसचा पहिल्यापासून तपास करतात.त्यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी कळतात.इथे तुरुंगात अनुराधा मुलीला जन्म देते. पण अजूनही ती खुनाचा हेतू सांगायला तयार नाही .
शेवटी असे काय घडते की भर कोर्टात अनुराधाला तोंड उघण्यास भाग पडते. का करते अनुराधा आपल्या पतीचा खून ??
नेहमीप्रमाणे पंकज त्रिपाठी माधव मिश्राच्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय.संपूर्ण सिरीजच त्याच्या खांद्यावर आहे. अनुप्रिया गोयंका निखटच्या भूमिकेत शोभून दिसते.पंकज त्रिपाठीच्या समोर यावेळी आशिष विद्यार्थी सरकारी वकील म्हणून उभा राहिलाय .कीर्ती कुल्हारी अनुराधा चंद्राच्या भूमिकेत फिट बसते.

No comments:

Post a Comment