Wednesday, September 14, 2022

क्रिमिनल जस्टीज

क्रिमिनल जस्टीस
आदित्य शर्मा एक उत्साही तरुण. तो चांगला फूटबॉल प्लेयर आहे .एमबीए करून छान करियर करायचे अशी स्वप्ने बघतोय. फावल्या वेळात तो वडिलांची खाजगी कॅबही चालवतो. 
त्या दिवशी फुटबॉल मॅच जिंकल्यावर मित्रांसोबत पार्टी करायला निघतो पण त्याची बहीण त्याला थोडा वेळ कॅब चालव अशी विनंती करते. फक्त चार कस्टमर करेन असे सांगून तो बाहेर पडतो. 
शेवटच्या क्षणी एक तरुणी सनाया त्याच्या कॅबमध्ये बसते . सनाया थोडी अस्वस्थ असते.त्याच्या विनंतीकडे लक्ष न देता चार ठिकाणी फिरवते . त्यांची बाचाबाचीही होते. शेवटी ती त्याला घरी सोडायला सांगते . तोपर्यंत पार्टीला उशीर झालेला असतो. 
 आदित्य तिला घरी सोडून निघतो पण काही अंतर गेल्यावर त्याला तिचा फोन कॅबमध्ये सापडतो . तो पुन्हा तिच्या घरी जातो आणि तिला फोन देतो.
 त्याच्या प्रामाणिकपणावर ती खूष होते .त्याला आत बोलावून ड्रिंक ऑफर करते .तो नाही बोलतो तरी जबरदस्तीने पाजते. त्याच्यासोबत डान्स करते.ड्रग घेते. चाकूने गेम खेळते.शेवटी त्यांचे संबंध घडतात आणि नंतर  ते गाढ झोपून जातात .
पहाटे आदित्यला  जाग येते आणि बाजूचे दृश्य पाहून तो हादरतो. सनाया मेलेली असते. तिच्या अंगावर चाकूचे अनेक वार केलेले असतात. संपूर्ण बेड आणि चादर तिच्या रक्ताने माखलेले असते.
आदित्य  घाबरतो. घाईघाईने पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतो.चाकू स्वतःच्या जाकिटात लपवून पळ काढतो.त्याचवेळी शेजारच्या इमारतीतील एक गृहस्थ त्याला पाहतो.
घाईघाईने कॅब घेऊन जाताना त्याची दुसऱ्या गाडीला धडक बसते.त्यानंतर पोलीस त्याला ड्रिंक अँड ड्रॉईव्ह आरोपाखाली अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तिथे त्याला तो गृहस्थ ओळखतो आणि पोलीस त्याला सनायाच्या  खुनाच्या आरोपाखाली अटक करतात .
माधव मिश्रा  लखनौ येथून गोल्ड मेडल मिळवलेला वकील.त्याच्याकडे फक्त ड्रिंक अँड ड्रॉईव्ह , रात्री वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सोडविणे अश्या छोट्या केस येतात.यावेळी ही पोलिसांनी आदित्य शर्मा सोबत काही स्त्रियांना अटक केलेली असते आणि या सर्व  केससाठी पोलीस माधवला बोलवितात.
आपल्या अशीलला खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय हे कळताच माधवच्या पायाखालची जमीन सरकते. इतकी मोठी केस तो हँडल करू शकणार नाही याची जाणीव त्याला होते.तरीही त्यांच्याकडून काही पैसे उकळता येतील का याची चाचपणी करायला जातो पण तिथे सुप्रसिद्ध वकील मंदिरा येते आणि कॅब कंपनीतर्फे आदित्यची केस ती लढणार असल्याचे जाहीर करते. नाराज चेहऱ्याने माधव तिथून बाहेर पडतो .
त्यानंतर माधव आपल्या परीने ही केस सोडविण्याचा प्रयत्न करतो .पण त्याला यश मिळेल का ? कोण आहे या खुनामागे ? खुनाचा हेतू काय आहे ? प्रत्येक भागात माधव आदित्य सोबत प्रेक्षकही गुंतून जातात .
या मालिकेतील प्रमुख आकर्षण आहे तो माधव मिश्रा अर्थात पंकज त्रिपाठी .चेहऱ्यावर भोळेपणाचा भाव आणून थंड आवाजात विनोदी  कसे बोलले जाते हे यांच्याकडून शिकावे. तर मिर्झापुरमध्ये हाच थंड आवाज वापरून दगडी चेहऱ्याने डोळ्यातून  अंगावर काटा आणणारा अभिनय केला होता. 
जॅकी श्रॉफची या मालिकेत एक तगडी भूमिका आहे . तो तुरुंगात एक खतरनाक कैदी आहे आणि आदित्यकडून  पैसे घेऊन त्याला  संरक्षण  देतोय. 
मिता विशिष्टने मंदिराची भूमिका केलीय.
पोलीस स्टेशन , तेथील वातावरण ,तुरुंगातील  कैद्यांचे जीवन , त्यांचे राहणीमान , कोर्टरूम , वकिलांची जुगलबंदी याचे सुरेख चित्रीकरण यात केले आहे.

No comments:

Post a Comment