Tuesday, September 6, 2022

कलंक

कलंक 
त्या वृद्धाश्रमात आज नेहमीपेक्षा जास्तच गडबड दिसत होती.कारणच तसे होते.
आजपासून गणेशोत्सव चालू होणार होता. सर्व वृद्ध स्त्रीपुरुष आपल्यापरीने गणेशाच्या आगमनाची तयारी करत होते. गणेशाची पूजा करायला का होईना काहीजणांनी मुले नातेवाईक येणार होते.
आता दहा दिवस वृद्धाश्रम उत्साहाने फुलून जाणार होता. थरथरत्या हाताने आरती ओवाळली जाणार होती तर अडखळत का होईना पण उत्साहात आरती म्हटली जाणार होती.
शहराबाहेर तो वृद्धाश्रम बांधला होता.कोणी बांधला होता याची माहिती फारशी कोणाला नव्हती. पण नको झालेल्या वृद्धांना हा आश्रम सहारा देतो हे बहुतेकांना माहीत होते. त्यामुळे बरेच वृद्ध स्त्रीपुरुषांच्या हक्काचे ठिकाण बनले होते.
इथे अति वृद्ध ,आजारी,  रोगी , जखमी असे सर्वजण एकमेकांना सांभाळत राहत होते. इथला खर्च कोण कसा चालवतो याची माहिती कोणाला नव्हती पण एक दोन केयरटेकर नियमितपणे वृद्धाश्रमाची काळजी घेत होते. 
बापू राणे साधारण  नव्वदीच्यावर होते. आता त्यांचे उरलेले आयुष्य अंथरुणात आणि व्हीलचेयरवर होते. 
दरवर्षी गणपती आला की ते आयुष्यातून सुटका मागत होते. पण अशी सुटका त्यांच्या नशिबात अजूनतरी दिसत नव्हती.
आश्रमातील इतर वृद्ध त्यांच्यापासून लांबच राहत होते . तर काही ओळखीचे त्यांना चोर म्हणून ओळखत होते .
 खरे आहे , बापूंनी आपली उमेदीची काही वर्षे तुरुंगात काढली होती . त्यावेळी तुरुंगवास झालेल्या व्यक्तींना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान होता . पण बापूंच्या ते ही नशिबात नव्हते. 
टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एका मूर्तीचे दागिने चोरल्याचा आळ त्याच्यावर होता आणि त्याचीच शिक्षा त्यांनी भोगली होती. ते दागिने  अजूनपर्यंत कधीच सापडले नव्हते आणि बापूनी ते कुठे आहेत हे सांगायला अजूनही तोंड उघडले नव्हते.
त्यांच्या या कृतीची शिक्षा कुटुंबीयांनी भोगली होती. घरदार सोडून दूर या शहरात यावे लागले होते. पण इथेही त्यांची अपकीर्ती पाठ सोडत नव्हती.
काळ बदलला. हळूहळू वातावरण निवळू लागले. त्यांच्या नातवंडांनी ही गोष्ट कधीच फारशी मनाला लावून घेतली नव्हती. ते सर्व आता उच्चवर्गीय झाले होते आजोबांचा घरात त्रास होऊ लागला होता .मग त्यांची रवानगी ह्या वृद्धाश्रमात झाली होती.
दुर्दैवाने इथेही त्यांच्या कामगिरीची बातमी पोचली होती. काही वृद्ध त्यांना ओळखत होते आणि त्यांनीच ही बातमी संपूर्ण वृद्धाश्रमात फैलावली होती.त्यामुळे प्रत्येकाची त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. म्हणूनच बापू राणे आयुष्याला कंटाळले होते.कधी एकदा गणपती येतो आणि त्याच्याकडून सुटका करून घेतो असे झाले होते.
 बाप्पा मोरयाच्या गजरात सिंहासनावर बसून तो आत शिरला तेव्हा त्याच्या मनात धडधड सुरू झाली. दोन्ही बाजूला पाट धरून उचलणारे म्हातारे स्वतःला तरी सांभाळतील का याचीच भिती त्याला मखरापर्यंत  पोचेपर्यंत वाटत होती. हताश नजरेने तो नेहमी आपल्या बाजूला असणाऱ्या उंदराला शोधू लागला .तेव्हा ते महाशय आधीच मखरात जाऊन स्वतःची जागा पटकावून बसले होते. त्याच्या नजरेतील छद्मी भाव पाहून तो हसला आणि अलगद जागेवर जाऊन बसला.
" तुम्हाला या म्हाताऱ्यांच्यात बसायला बरे आवडते "प्रसादासाठी आणलेल्या उकडीच्या मोदकाकडे तो आशाळभूत नजरेने पाहत म्हणाला .
" अरे बरेच हिशोब बाकी आहेत यांच्याकडे, म्हणून मुद्दाम आलोय इथे " तो लोडाला टेकून आजूबाजूला नजर फिरवीत म्हणाला .
"आरती तरी फिरवतील ना नीट.नाहीतर पेटता दिवा आपल्याच अंगावर पडायचा .आरती स्पष्ट तरी म्हणता येईल का त्यांना " त्याने शेपटी हलवीत नाक मुरडत विचारले.
" हीच ती माणसे आहेत ज्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढून सार्वजनिक बनविले आणि स्वातंत्र्यसंग्राम पेटविला हे विसरू नकोस मूषका " कठोर आवाजात त्याने आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली.
त्यानंतर रोज त्याची आरती झाल्यावर वेगवेगळे कार्यक्रम होत होते. तोही तल्लीन होऊन त्याचा आनंद घेत होता .बापू राणे मात्र खोलीतूनच त्याच्या पाया पडत होते.
विसर्जनाच्या दिवशी एक तरुण वृद्धाश्रमात शिरला .भारतीय स्वातंत्र्यसंग्रामावर  काही व्याख्यान द्यायची इच्छा होती. स्वातंत्र्यसंग्राम हे नाव ऐकताच बापू राणे व्हिलचेयर वरून बाहेर आला . त्यांना पाहून तो तरुण हसला . त्याचे आश्वासक हास्य पाहून बापू भारावून गेला.
"भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामचा तो ऐन भराचा काळ होता. महात्माजींनी करो या मरो अशी हाक दिली होती .काही ठिकाणी हिंसा चालू होती .इंग्रज अधिकारी त्याचा फायदा घेऊन घरदार लुटत होते तर काही इंग्रज, स्त्रियांची अब्रू खुलेआम लुटत होते.अश्याच एका घरात ते चार इंग्रज अधिकारी शिरले आणि त्या घरातील दोन छोट्या मुलींची आणि त्यांच्या आईची अब्रू लुटून त्यांना ठार केले.पण काही काही महिन्यातच त्याच घरात त्यांची गोळ्यांनी छिन्न झालेली प्रेते सापडली होती. आजपर्यंत त्यांना कोणी ठार केले याचा शोध लागला नाही.अजूनही ती केस ब्रिटिश दप्तरी ओपनच आहे .पण त्या घटनेच्या काही दिवस आधी त्या गावातील सार्वजनिक गणपतीच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले होते त्या चोराला मात्र इंग्रजांनी पकडले काही वर्षे तुरुंगवास भोगून तो कुठे गायब झाला ते कळलेच नाही ." तो तरुण रंगून व्याख्यान देत होता.
" हे काय ते महान चोर बापू राणे." कोपऱ्यात केविलवाणा चेहरा करून  बसलेल्या बापूंच्या दिशेने बोट करीत एक वृद्ध म्हणाला .
" तुम्हाला फक्त त्यांची अर्धवट कथा माहितीय .त्यांनी चोरी केली हे खरंय पण त्या दागिन्यांतून त्याने बंदूक आणि काडतुसे खरेदी केली आणि त्या चार अधिकाऱ्यांसह पुढे कित्येक इंग्रजांना ठार केले हे कितीजणांना माहीत आहे "त्या तरुणाने शांतपणे प्रश्न विचारला .
ते ऐकताच सर्व स्तब्ध झाले . सर्वांनी उठून बापूंपुढे हात जोडले आणि माफी मागितली.
बापूनी भरल्या डोळ्यांनी त्या तरुणांकडे पाहत हात जोडले आणि खोलीत नेण्याची खूण केली.
त्या तरुणाने व्हीलचेयर ढकलत खोलीत आणली." हे सर्व तुला कसे कळले ? माझ्याशिवाय ही गोष्ट कोणालाच माहीत नाही" बापूनी त्याच्या डोळ्यात नजर रोखून विचारले.
" आहो बापू माझेच तर दागिने त्या दिवशी चोरले होते तुम्ही आणि त्या दागिन्यांचे तुम्ही काय करणार याचीही माहिती होती मला. "तो हसत म्हणाला .
" मग इतकी वर्षे का आला नाहीस.? गेली कित्येक वर्षे माझी सुटका कर म्हणून हात जोडून विनंती करतोय तुला ? खरे सांग कोण आहेस तू ? बापूनी रागानेच विचारले.
" कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते बापू. आज ती वेळ आलीय पण जाण्यापूर्वी तुमच्या नावावर लागलेला कलंक ही मिटला पाहिजे .कळू द्या जगाला स्वातंत्र्यलढ्यात तुमचे काय योगदान आहे ते आणि जाता जाता मी कोण हे ही दाखवतो तुम्हाला " असे बोलून त्याने आपले खरे रूप प्रकट केले.बापूनी  मान  वर करून पाहिले तर तो आपल्या मूळ रुपात उभा होता .त्याचे ते तेजस्वी रूप बापूंना सहन झाले नाही .समाधानाने त्यांनी डोळे मिटले .
" काय  गरज होती त्याला आपले खरे रूप दाखवायची " नेहमीप्रमाणे उंदीर चिडून म्हणाला .
" अरे आज त्याचा शेवटचा दिवस आहे या जगात. त्याने केलेल्या कार्याची कदर व्हावी म्हणून त्याला खरे रूप दाखवून समाधान दिले" तबकातील एक मोदक तोंडात टाकीत तो हसत म्हणाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment