Sunday, September 4, 2022

मदत

मदत
गणेशोत्सव जवळ आला की त्या विभागातील सर्व नागरिक आणि दुकानदारांना मोठे दडपण यायचे . याचे कारण म्हणजे रघूदादा.
 आपले दोनतीन पंटर घेऊन प्रत्येक दुकानात आणि घराघरात फिरायचा . त्याची ती थंड नजर पाहून समोरची व्यक्ती मुकाट्याने पैसे देत असे. पावती वगैरे भानगड नाही. ऑनलाइन वर्गणी तर अजिबात नाही. फक्त कॅश. 
जो विरोध करेल त्याच्याकडे फक्त आपली भेदक नजर टाकून पुढे जायचा .दोन दिवसानी विरोध करणारा गळ्यात हात बांधून किंवा पायाला बँडेज बांधून वॉकर घेऊन फिरताना दिसायचा .
रघूदादाचा कारभार अतिशय शांतपणे चालला होता.एरियातील सर्व सण तो साजरे करायचा .पण त्यातही गणेशोत्सव मात्र जोरदार.
पहिल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस नुसता उत्साह असायचा. खाण्यापिण्याची चंगळ असायची . या दिवसात रघूदादाचे वेगळेच रूप पाहायला मिळायचे. त्याच्याकडे कोणीही मदत मागायला गेला की तो नाही म्हणायचा नाही .अट फक्त एकच , त्याच्या पाया पडून मदतीची याचना करा. असे कोणी मदतीची भीक मागताना पाहून त्याला आपण जणू देवच असल्याचा भास होई.
 ती त्या वस्तीत आपल्या मुलीसोबत राहत होती. करोनात नवरा गेला .त्यामुळे आर्थिक स्थिती थोडी गंभीरच होती.देवावर भरोसा ठेवून दोघीही येणारा दिवस ढकलत होत्या.
तशी ती मिळेल ते काम करीत होती. पण रोजच काम मिळेल असे नाही ना. रघूदादाकडे मदत मागायला जायचे तर आधी त्याच्या पायावर लोटांगण घालावे लागेल याची जाणीव तिला होती आणि तिला तेच नको होते.जीव देईन पण मदतीसाठी कोणाच्या पायावर डोके ठेवणार नाही  असा तिचा ताठा होता.
यावर्षी त्या दोघीही गणपतीचे स्वागत उत्साहात करणार होत्या. आहे त्या तुटपुंज्या पैश्यात तिच्या घरी गणेशाचे स्वागत उत्साहाने होणार होते.
तो उत्साहाने तिच्या घरात शिरला .आपले साधे मखर पाहून त्याने समाधानाने मान डोलावली. त्या जुनाट पाटावर तो खुशीत मांडी घालून बसला.आपल्या नाखुषीने नाक मुरडणाऱ्या उंदराकडे त्याने लक्ष न देता समोरच्या खोबऱ्याच्या वड्यांकडे हसत हसत पाहिले आणि तिच्या तरुण मुलीला मनातून आशीर्वाद दिला .
" देवा,  यावर्षी मला इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळू दे" ती त्याच्या पुढे हात जोडून म्हणाली तसा तो चमकला .
" अरे बापरे ! होय म्हटले तर पैश्याचीही सोय करावी लागेल. नाही म्हटले तर तिची बुद्धी वाया जाईल."तो द्विधा मनस्थिती सापडला. त्याची ही अवस्था पाहून खोबऱ्याची वडी कुरतडून खात असलेला उंदीर खुश झाला.
" झाले समाधान .तरी म्हटले होते या घरात नको .काही मानपान नसतो. ह्या अश्या वड्या खाव्या लागतील पाच दिवस. धड आरती नाही.कोण भक्त नमस्कार करायला येत नाहीत. तरीही तुला इघे आवडते. तो उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला.
" मग काय फक्त उच्च मध्यमवर्गीय ,श्रीमंत लोकांकडे जावेच का ? खोबऱ्याच्या वड्या तर कोकणात ही देतात आपल्याला.त्यांची भक्ती श्रद्धा पाहून आपण जातो त्यांच्याकडे. हो, आता तिची मागणी पूर्ण करणे थोडे अवघड आहे .कारण आपण देव असलो तरी चमत्काराने कोणाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. इकडचे काढून तिकडे देतो. जस्ट लाईक ट्रेडिंग .तिच्याकडे बुद्धी आहे.त्यामुळे तिला ऍडमिशन मिळणार हे नक्की.पण पैसे कुठून आणायचे हा प्रॉब्लेम आहेच .जाऊदे ,  करू काहीतरी पुढे. सध्या आराम करू "असे बोलून त्याने डोळे मिटले आणि शांतपणे घोरू लागला.
रघूदादा आपल्या ऑफिसमध्ये पायावर पाय टाकून आरामात बसला होता.ऑफिस कसले ? नाक्यावर चहाची टपरी होती ती. तिथून त्याला गणपतीचा मंडप आणि बाजारपेठ दिसे. त्याचवेळी एक माणूस त्याला शोधतच समोर आला, 
"साहेब , मला तुमच्याकडून मदत हवीय ."पायाजवळ घुटमळणार्या उंदराला तो हूसकावत म्हणाला.
"कसली मदत ? आणि माझी अट माहितीय ना ?"आपले दोन्ही पाय सरळ करत रघूदादा डोळे रोखून म्हणाला.
" होय, असे म्हणत तो तरुण त्याच्या पायाशी बसला आणि त्याचे पकडून म्हणाला मला काही पैसे हवेत "
" दिले.रघूदादा खुश होऊन म्हणाला. किती पाहिजे तितके घेऊन जा " 
तो रघूदादाने दिलेले पैसे घेऊन तिच्या घरात शिरला .
" हे तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे."
" कोण तुम्ही ? आणि हे पैसे का आम्हाला देतायत ?"ती आश्चर्यचकीत होऊन उद्गारली
"आम्ही एक एनजीओ आहोत. हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतो.तुमची मुलगी हुशार आहे . पुढे शिकायची इच्छा आहे म्हणून तिला मदत करायला आलो. " तो म्हणाला .
" पण आम्ही हे पैसे परत कधी करायचे." तिने काळजीने विचारले
" परत नाही करायचे, पण भविष्यात गरीब आणि हुशार विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मदत करायची .तसे केले की आमचाही भार कमी होईल" तो हात जोडून म्हणाला.
तिने डोळ्यातील अश्रू पुसत हात जोडले आणि पैसे ठेवायला कपाटाकडे वळली.
तिची पाठ वळताच त्याने मखरात उडी मारली आणि त्या पाटावर शांतपणे बसला.
" पैसे घेण्यासाठी त्या रघुदादाच्या पाया पडायची काय गरज ?"  समोरील केळ्याचा तुकडा तोडत त्या उंदराने चिडून विचारले.
" मग काय कोणा श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करून पैसे आणू ?अरे मी देव असलो तरी असे चमत्कार करू शकत नाही आणि नेहमी लोक आपल्या पाया पडून वेगवेगळे नवस बोलतात मग एक दिवस आपण त्यांच्या पाया पडलो तर काय हरकत आहे. आपल्या एका पाया पडण्याने एक शैक्षणिक साखळी निर्माण झाली बघ.  भविष्यात तीच मुलगी अनेक विद्यार्थ्यांना मदत करेल.आपण काही करत नाही तर फक्त मार्ग दाखवतो." असे म्हणून त्याने शांतपणे डोळे मिटले.
"बाप्पा मोरया " असे म्हणत त्या उंदराने हात जोडले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment