Sunday, September 25, 2022

अभिनय

अभिनय
"आजी ,उद्या शूट आहे.फिल्मसिटी सेट तीनला . सकाळी दहा वाजता या आठवणीने ". दरवाजा उघडून आत येत त्या तरुणाने तिला निरोप दिला . तसे तिने डोळे किलकिले करत त्याच्याकडे पाहून मान डोलावली. 
तिचा होकार पाहून तो हसला. " किती दिवस शूटिंग आहे रे " तिने हातानेच चहाची खूण करत त्याला विचारले.
"असेल दोन दिवस तरी . तुला माहितीय हल्ली प्रत्येक गोष्ट काही एका एपिसोडमध्ये संपत नाही . दोन तीन एपिसोड तरी होतील ". तो मोठ्याने हसत म्हणाला ." ये वेळेवर आणि हो येताना  टॅक्सीभाडे लावायचे विसरू नकोस ." त्याने आठवण करून दिली आणि निघून गेला.
तो गेल्यावर बंद त्या दरवाजाकडे पाहत ती कितीतरी वेळ गप्प बसून होती. ती साधारण सत्तरीच्या जवळपास होती. एकटीच राहायची . म्हणजे नवरा पूर्वीच गेला होता. नंतर एकुलता एक मुलगा ही गेला . अंगात थोडे अभिनयाचे गुण होते . त्यावर कधीकधी छोटीमोठी कामे मिळायची तिला.  
हल्ली टीव्ही सिरियलमुळे कामाची कमी नव्हती त्यामुळे जिथे काम मिळेल तिथे जायची. आपल्यावर तिचा बोजा नको म्हणून नातेवाईक ही टाळत होते तिला.
आज सकाळपासूनच तिच्या अंगात थोडी कणकण जाणवत होती.पुढे ताप आला तर कोणाला त्रास नको म्हणून गोळी घेऊन थोडी पडली  तेव्हाच हा निरोप आला .
सकाळी लवकर उठली तरी अंग दुखत होतेच. घाईघाईने तयार होऊन ती सेटवर वेळेवर पोचली. तिला पाहताच तो कालचा तरुण जवळ आला .
" वेळेवर आलीस आजी " असे म्हणून सरळ सेटवर घेऊन गेला . आज सेटवर दुःखद वातावरण दिसत होते. बरेचसे कलाकार पांढऱ्या कपड्यात वावरत होते. अच्छा म्हणजे आज मरणाचा सीन आहे तर. चला म्हणजे दुःखी चेहरा करून कोपऱ्यात बसायचे इतकेच काम तर. बरे झाले . असे मनात म्हणत ती सेटवर फिरू लागली .
इतक्यात तो तरुण पुन्हा आला " आजी, त्या चटईवर झोप. प्रेतासारखे . आज तुलाच मेलेल्या आजीची ऍक्टिग करायची आहे. आज सेलिब्रिटी आहेस तू ." असे म्हणून मोठ्याने हसला. तशी ती चमकलीच .
" अरे पण किती दिवस असे प्रेतासारखे पडून राहायचे. कंटाळा येईल रे " ती केविलवाणा चेहरा करीत म्हणाली. "काळजी नको, आज दिवसभरात करून टाकू .एकदा का तुला चितेवर झोपवून अग्नी दिला की तुझे काम संपले." तो सहज स्वरात म्हणाला .
तिने डोळे वटारत त्याच्याकडे पाहिले आणि मुकाटपणे त्याने दाखविलेल्या जागेवर झोपली . हळूहळू एक एक सेलिब्रिटी कलाकार तिच्या शेजारी येऊन गोलाकार बसू लागले. सगळ्यांनी पांढरे ड्रेस चढविले होते. ती त्या कलाकारांना पाहून खुश झाली . सगळेच टीव्ही सिरियलचे मोठे कलाकार होते आणि आज तिच्यासाठी रडणार होते. नेहमीच भरपूर दागिने आणि उंची साड्या नेसणार्या , एकमेकींच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या स्त्रिया आज डोळ्याला पदर लावून रडत होत्या .एकीने सासूबाई असे मोठ्याने ओरडत तिला मिठी मारली त्यात  हातातली बांगडी जोरात तिच्या मानेजवळ टोचली . त्या मोठ्या आवाजात  मग तिनेही आई ग करीत ओरडून घेतले.
" मॅडम , इतकेही प्रेम दाखवू नका हो की प्रेताच्या मानेतून रक्त येईल." डायरेक्टर हसत ओरडला.तसे तिच्यासकट सगळेच हसू लागले.
"बघत होते आजीला खरोखरच प्रेताचा अभिनय येतोय का ?"  ती अभिनेत्री हसत हसत म्हणाली.
दुःखी असलेले वातावरण अचानक हलके झाले.सगळे इथेतिथे पसरले.काहीजण सिगारेट ओढू लागले तर काही चहासाठी गेले. बराच वेळ झोपून राहिल्यामुळे हिचे अंग आखडून गेले होते. ती उठून उभी राहिली आणि सेटवर फेऱ्या मारू लागली.
"आजी ,काही त्रास नाही ना ?  सेलिब्रिटी तुमच्या मरणावर रडतायत .भाग्यवान आहात." तो हसून म्हणाला. तशी तीही हसली.
पुन्हा शूटिंग सुरू झाले .यावेळी बरेचजण रडत होते. तिच्याविषयी चांगले बोलत होते.तिला आंघोळ घालून भरजरी साडी नेसवली गेली.दागिने चढविले गेले.
साडी तर खूपच महाग दिसते. शूटिंग संपल्यावर मागून घेतली पाहिजे निर्मात्याकडून .तिने मनात पक्के केले. केसातील गजऱ्याचे धागे तिच्या कानाजवळ येऊन गुदगुल्या करू लागले.मोठ्या कष्टाने तिला चेहरा गंभीर ठेवावा लागला .तिच्या नाकात कापसाचे बोळे होते. तोंडात कापूस आणि तुळशीचे पान ठेवले होते. शेवटी तिला उचलून तिरडीवर ठेवण्यात आले. "अरे देवा ह्याला काही नीट उचलता येत नाही का ? आता पडले असते ना मी ." ती मनातच चिडली. 
मग तिची प्रेतयात्रा  निघाली. इच्छा असूनही तिला डोळे उघडता येत नव्हते. नेमके कॅमेऱ्याने पकडले तर सगळी मेहनत वाया जायची. आज ना उद्या टीव्हीवर बघूच .
शेवटी चितेवर झोपवून पुन्हा सर्वांनी रडारड केली.त्या सेलिब्रिटी कलाकारांनी तिला पाणी पाजले आणि एक हातात जळते लाकूड घेऊन चितेभोवती फेऱ्या मारू लागला.
"अरे देवा, हा खरोखरच पेटविणार की मला ."ती मनातून हादरली.इतक्यात कट ओके आवाज ऐकू आला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
"आजी तुझे काम झाले . निघालीस तरी चालेल " तो तरुण पुन्हा तिच्याजवळ येऊन म्हणाला .तशी ती त्याच साडीवर बाहेर पडली.
सकाळी जाग आली तेव्हा तो तरुण तिच्यासमोर उभा होता. "दुसऱ्या जगात स्वागत आहे तुमचे ? "तो हसत उद्गारला 
" दुसरे जग ..? म्हणजे ".तिने कुतूहलाने विचारले.
" म्हणजे आता तुम्ही मेल्या आहात. पृथ्वीवरचे जीवन संपवून आमच्या जगात आला आहात. कालपासून तुमच्यावर नजर ठेवून होतो.योग्य वेळ येताच तुम्हाला घेऊन जाणारच होतो .पण म्हटले असेही महानगरपालिका बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार आहे तर निदान शुटिंगमधून तरी मृत्यूचे सर्व विधी अनुभवू द्या.चार चांगल्या लोकाना खोटेखोटे का होईना तुमच्या मृत्यूवर रडू द्या .म्हणून सर्व घडवून आणले. म्हातारे बेवारस म्हणून तुला अग्नी मिळेल पण खोटे खोटे का होईना तुझ्या प्रेतावर विधिवत अंत्यसंस्कार तरी झालेत .चल आभार मान माझे ."असे म्हणून तिचा हात धरून चालू लागला .
निघताना मागे वळून पाहिले तेव्हा बेडवर तिचे शरीर शांतपणे पडून होते.कालच नेसलेली साडी तिला शोभून दिसत होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment