Friday, September 2, 2022

जुळे

जुळे
रात्रीचे अडीज वाजले असतील.शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्या भागात अजूनही लगबग आणि गर्दी दिसत होती. 
पण एका अंधाऱ्या गल्लीत ती टपरी अजूनही चालूच होती. होय, गणेशोत्सव उत्साहात सुरू होता. त्या भागात अनेक सार्वजनिक गणपती बसले होते. दोन वर्षे कोविड लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मंडळांनी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा केला होता.
पण यावर्षी सरकारने सणांवर लादलेली बंधने काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा उत्साहात सगळी गणेश मंडळे आपल्या विभागात गणेशोत्सव साजरा करीत होते.
एका रोषणाईने सजलेल्या गल्लीतून तो बाहेर त्या टपरीवर आला.त्याचे कपडे उच्च दर्जाचे दिसत होते.हातात ,गळ्यात सोन्याचे दागिने होते.आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक .
टपरीजवळच्या लाकडी बाकड्यावर बसून त्याने "अण्णा , एक कटिंग ." अशी ऑर्डर सोडली आणि हुश्श करून पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला .
इतक्यात दुसऱ्या गल्लीतून दुसरा बाहेर आला . त्याचेही कपडे उच्च दर्जाची खूण दाखवीत होते .हातात गळ्यात फारसे दागिने ही नव्हते पण चेहऱ्यावरची बुद्धिमत्ता मात्र सारखीच होती. त्यामुळे दोघांचे चेहरेही सारखेच दिसत होते.कोणतीही घाई नसल्यासारखा तो आरामात पहिल्याचा बाजूला बसला .
"अण्णा एक कटिंग .पण कडक बनव, नवीन चहा  बनव मला घाई नाही ."असे म्हणत त्याने बरणीतल्या नानकटाईत हात घातला .
अचानक त्याने पहिल्याकडे पाहिले आणि मानेनेच घेणार का ? असे खुणेनेच विचारले.
पहिल्याने आशाळभूत नजरेने त्या बिस्किटाकडे पाहिले .तसा दुसरा हसला आणि एक बिस्कीट त्याला दिले.
"कुठला ..? " दुसर्याने त्याच्या बाजूला बसत विचारले.
"श्रीपार्कचा ,पाहिल्याने उत्तर दिले  तू "
" तिरंगी चाळ ."एका गल्लीच्या दिशेने बोट दाखवीत दुसरा म्हणाला . " तरीच, त्या बिस्किटाकडे नवलाईने पाहत होतास .कधी पाहिले नाही असे. तुम्ही श्रीमंत लोक.नेहमी तुमच्याकडे गडबड .लोकांच्या नवसाला पावणारे तुम्ही." चेहऱ्यावर छद्मी हास्य आणत दुसरा तोंडात बिस्कीट टाकत म्हणाला .
" कसला श्रीमंत रे . पार वाट लावून टाकलीय माझी. इथे झोपायला काय पण साधा श्वास घ्यायला मिळत नाही . सतत कोणी ना कोणी येत असतो .मनातील इच्छा बोलत असतो. सगळ्यांना होय म्हणावे लागते" पहिला कंटाळून म्हणाला ," तू इतका आरामात का ?? तुझ्याकडे गर्दी नाही का ?"त्याने कुतूहलाने दुसऱ्याला विचारले .
" ह्या ! तू बाजूला असताना माझ्यासारख्या गरीबाकडे कोण येईल ?  मस्तपैकी दिवसभर बसून असतो .काही येतात, पण कोण आपल्या मनातील इच्छा बोलत नाहीत .चुकून बोलल्या तर माझा मूड असेल तर त्या पूर्ण करतो. पण दर्शन मात्र डोळे भरून मिळते. त्या दिवशी एकजण आला . पुढ्यातच मांडी घालून बसला आणि लागला गायला.दोन तास तल्लीन होऊन गात होता .तुला सांगतो बालगंधर्वांची आठवण झाली .एके काळी ते ,दीनानाथ मंगेशकर असेच पुढ्यात बसून गात होते."तो जुन्या काळात हरवून गेला .
"आयला, मजा आहे रे तुझी .माझ्याकडे तर रांगच रांग असते दर्शनासाठी. रांगेत त्यांची भांडणेच भरपूर. चुकून धक्का लागला तर अंगावर येतात आणि ते रेकॉर्ड करायला मिडियावाले असतातच. कुठे मनोरंजन नाही आणि कुठे जाताही येत नाही . प्रसाद ही एकदम भारी भारी असतो. हे बिस्कीट तर कधी पाहिले ही नाही. शेवटी आज गर्दी कमी झाली तसा सटकलो .म्हटले ते नेहमीचे दूध पिण्यापेक्षा कटिंग मारू.
दोघेही हसत चहा पिऊ लागले.
" पण मला एक सांग आपण दोघेही सारखेच आहोत.बाजूबाजूला राहतो.तरी तू आरामात राहतोस मला इतका त्रास का ..? पाहिल्याने दुसऱ्याला विचारले.
" अरे तुला सवय झालीय प्रत्येकाला होय म्हणायची . मग ते खुश होऊन तुला भेटवस्तू देतात .माझे तसे नाही .मी फारच कमी आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच हो म्हणतो.आता त्या दिवशी एक बाई आली. तिची मुलगी हुशार आहे पण पुढे शिकायला पैसे नाहीत मग मी तिला होय म्हणालो.उद्या काहीजण तिला मदत करायला घरी जातील. पण तू..? त्या दिवशी तो  गृहस्थ मला सुख शांती दे असे म्हणाला तर तू पटकन होय बोलून गेलास .त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध आईवडिलांना  वृद्धाश्रमात सोडून दिले.आता घरी छान आयुष्य जगणार तो.मिळाली त्याला सुख शांती." असे म्हणून मोठ्याने हसला 
" मी अश्या लोकांना उभे करीत नाहीं म्हणून माझ्याकडे कोण येत नाही ." अजून एक बिस्कीट त्याच्या पुढे करीत दुसरा म्हणाला .
" हा अण्णा बघ .कधीच आपल्याकडे येत नाही .पण गणेशोत्सवात चोवीस तास टपरी चालू.त्याच्या टपरीत बघ.." असे म्हणून दुसर्याने टपरीत बोट दाखविले.
पहिल्याने त्या दिशेकडे पाहिले .तेव्हा देव्हाऱ्यात तो बसला होता. त्याने हसून त्या दोघांकडे पाहून ओळखीचा हात हलविला.
"अण्णा , भगवान को मानते हो."पाहिल्याने हसून विचारले.
"हा साब , रोज सुबह उसके सामने हात जोडता हू, और हार डालता हू " अण्णा हसत म्हणाला .
"कुछ मांगते नही. " दुसर्याने विचारले 
" क्या जरूरत है साब, ये सब तो उसकी देन है. मै तो सिर्फ मेहनत करता हू .अभी ये दस दिन धंदा इतना जोर से है की गाव से भतिजे को बुलाना पडा, उसको दुसरी टपरी बांधके दी है ." एका बंद टपरीकडे बोट दाखवत अण्णा म्हणाला .
" बघ , याला आपल्याकडे यायची गरज पडली नाही तरी आपण याला भरभरून देतोय. सकाळी फक्त स्वच्छ निर्मळ मनाने पाया पडतो आपल्या." दुसरा हसत हसत म्हणाला .
" खर आहे,  पण सध्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.मागची दोन वर्षे आरामात गेली.पण पुढे आपल्याला खूप कठीण जाणार आहेत. काय सांगावे पुढे तुला ही आराम मिळणार नाही"  पहिला दुसऱ्याच्या खांद्यावर थाप मारून म्हणाला .
" बस क्या , माझ्याकडून दोन बिस्किट्स खाऊन वर मलाच शाप देतोस का ? चल वेळ मिळाला तर ये उद्या ह्याच वेळी .आता मी शांतपणे झोपतो .मंडपात पत्त्यांचा मोठा डाव सुरू आहे ." असे बोलून दुसर्याने पहिल्याच्या हातावर टाळी दिली आणि आपापल्या मार्गाने निघाले.
दोन जुळे भाऊ परस्पर विरोधी दिशेने निघालेले पाहून अण्णा विचारात पडला.
श्रीपार्कात गणपतीच्या मंडपात अजूनही दर्शन चालू होते आणि तो प्रत्येकाच्या इच्छेला होकार देत चेहऱ्यावर कंटाळा न दाखवता तो उद्याच्या रात्रीची वाट पाहत उभा होता.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment