Tuesday, September 27, 2022

पांढरा रंग

पांढरा रंग 
 गाव तसे छोटेच होते.मुख्य शहरापासून थोडे लांब आणि आडवाटेवर .गावाची लोकसंख्याही मर्यादित होती. गावात सर्व धर्म समभाव वागणूक होती.  आता कमी लोकसंख्येमुळे काय जातीभेद , धर्मभेद पाळणार म्हणा . गावात ईद , गणपती,  ख्रिसमस जोरात साजरे व्हायचे. त्यावेळी मात्र गावात नुसती गर्दी दिसायची .
आजपासून गावात नवरात्र उत्सव सुरू होणार होता.गावातील तरुण वर्ग  नुसता उत्साहाने सळसळत होता. सणांच्या वेळीच त्यांना एकत्र येण्याची संधी मिळत होती.उत्सव समितीने रोजचे रंग प्रसिद्ध केले होते.आता त्याप्रमाणे रोज त्यात्या रंगाच्या साड्या , ड्रेस  नेसायला सुरवात होणार होती.
आजचा रंग होता पांढरा. उत्सव समितीने आज गरबा नृत्याचे आयोजन केले होते. पण गरबा नृत्यात भाग घेणाऱ्यांनी पांढरा पोशाख नेसला पाहिजे अशी अटही ठेवली होती.
संध्याकाळ झाली तशी देवीच्या पटांगणात गर्दी जमा होऊ लागली. डीजे ही तयार होता. सर्व स्त्री पुरुष पांढरे कपडे घालून हळूहळू डीजेच्या तालावर ठेका धरू लागले. हळूहळू गर्दी वाढू लागली  प्रत्येकाच्या अंगात गरबा भिनू लागला .बेफाम होऊन सर्व नाचत होते. 

आजच्या  गर्दीत त्या दोन तरुणी उठून दिसत होत्या .पांढरी शुभ्र साडी ,मोकळे केस ,कपाळावर देवीचा मोठा टिळा,गळ्यात पांढरी माळ अश्या पेहरावात त्या मोकळेपणाने हसत धुंद होऊन नाचत होत्या .काही तरुण तर त्यांच्याभोवतीच  नाचत होते आणि त्याही प्रतिसाद देत होत्या .
गावात काही वेळेचे बंधन नव्हते .त्यामुळे मध्यरात्र उलटून गेली तरी गरबा चालूच होता . हळूहळू त्या तरुणींच्या भोवती तरुणांचा घोळका वाढू लागला . त्यातील दोन तरुणांनी त्यांना हेतुपूर्वक एका कोपऱ्यात ढकलत नेले. नाचण्याच्या नादात त्यांच्याही लक्षात आले नाही .
शेवटी नाच थांबवून ते तरुण त्यांच्या जवळ गेले.
"या गावातल्या दिसत नाही तुम्ही ? " एकाने विचारले .
"ही इथलीच आहे .एकीकडे बोट दाखवून दुसरी म्हणाली , मी शेजारच्या गावची, हिची मैत्रिण ."
"मग आता काय विचार आहे .? तिच्याजवळ सरकत एक तरुण गूढ हसत म्हणाला .
"इथे नको . घरी जाऊ .मी काय एकटी घरी जाऊ का ? मला  सोडून परत या "  दुसरी डोळ्याने सूचक इशारा करीत म्हणाली .
ते दोघे खुश झाले ."चला निघू "असे म्हणून सर्व निघाले .
गप्पा मारत मारत कधी गावाबाहेर आले ते त्यांना कळलेच नाही . अचानक एका मोठ्या झाडाच्या पारावर त्या थांबल्या .
" थोडे थांबूया इथे ,एक म्हणाली .नाचून आणि चालून पाय दुखले माझे ."
" इथे नको ," ते दोघेही घाबरत म्हणाले ."इथे स्मशान आहे .आपण पुढे जाऊ ."
"मग काय झाले . गेली कित्येक वर्षे आम्ही इथेच राहतोय. ही या झाडावर राहते आणि मी त्या स्मशानात . यावेळी पहिल्याच दिवशी पांढरा रंग होता .म्हटले आपण गेली शेकडो वर्षे पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालून फिरतोय मग त्याच ड्रेसवर गरबा खेळायला जाऊ .आता उद्यापासून पुन्हा इथेच बसून गरबा बघणार .चला येतायत ना ?" असे म्हणून एक स्मशानात शिरली तर दुसरी मोठ्याने हसत झाडावर चढून गेली.
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना एक तरुण स्मशानात तर दुसरा वडाच्या पारावर बेशुद्धावस्थेत आढळले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment