Wednesday, September 7, 2022

युनिफॉर्म

युनिफॉर्म
अरुण भोसलेच्या घरात शिरताच तो प्रसन्न झाला .एकतर अरुणच्या तरुण मुलाच्या भक्कम हाताचा आधार होताच .त्यात मुलीने नेहमीप्रमाणे मखर सुरेख सजवला होता. काकूने प्रसन्न चेहऱ्याने त्याचे स्वागत केले.काल रात्रभर मखराची सजावट चालू होती.पण  कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता .दरवर्षी अरुणच्या घरी असेच वातावरण असायचे.शेवटी कोकणी माणूस.भक्ती करेल तर मनापासून .
अरुण घरी नव्हताच. तो कधी असतो म्हणा.
 आठ दहा वर्षापूर्वी तो पहिल्या दिवशी असायचा .पण नंतर ड्युटीवर गेला की घरी येण्याची वेळ नाही . गेली काही वर्षे मुंबई पोलिसांचे काम वाढलंय हे खरे. त्यात हा साधा शिपाई.
सीताराम भोसले म्हणजे याच्या बापाने शिव्या देत मारून मुटकून दहावीपर्यंत शिकवला आणि त्याच शिक्षणाच्या जीवावर पोलिसात चिटकवला.
मखरातील मऊ उबदार  आसनावर बसताच त्याने आपल्या उंदराकडे नजर टाकली.यावेळी काकूने त्यालाही भरजरी वस्त्रे शिवली होती त्यामुळे तोही खुश होता.समोर कोकणातील पारंपरिक पद्धतीचा नैवेद् होता.त्याकडे हावरट नजरेने पाहत शेपटी हलवीत होता.

"आपणही वाहन बदलावे का ?" तो उंदराकडे पाहून विचार करत होता. गेली हजारो वर्षे आपण तेच वाहन वापरतोय. इथे मात्र पंधरा वर्षांनी वाहने बदलायला सांगतात, नाही ,तर तसा कायदाच केला आहे .हल्ली हा खूपच आळशी झालाय आणि बडबड ही जास्त करू लागलाय. बघू पुढे "असं ठरवून तो पूजेसाठी सज्ज झाला .
दरवर्षीप्रमाणे यावेळी ही अरुण भोसलेची ड्युटी संवेदनशील ठिकाणी होती. नेहमीप्रमाणे वरिष्ठांनी याला बकरा बनवून तिथे पाठविले होते.या सणासुदीला अरुण भोसले सारखा माणूस प्रिय बनतो.
आता रिलिव्हरही एक दोन दिवस दांडी मारणार .पण अरुण साधा होता. न बोलता प्रामाणिकपणे ड्युटी करणारा .आताही त्या म्हातारीच्या हातातली जड पिशवी घेऊन तिला जिन्यावर चढायला मदत करत होता. तिच्या बरोबरची ती सुंदर स्त्री मात्र मोबाईलवर कोणाशी तरी हसून बोलत होती. 
तिचे सामान जागेवर ठेवून तो परत आपल्याजागी आला तेव्हा तो तरुण तिथे बसला होता.एक आपलेपणाचे हास्य त्याच्या चेहऱ्यावर होते .
"काय काका ? कसे चालले आहे ? सध्या हमालाची कामे ही करता का ?" त्याने हसत अरुणला विचारले.
"मी  विनायक , महादेव पार्सेकरांचा मुलगा "त्याने अरुणच्या प्रश्नार्थक नजरेला उत्तर दिले .
"पार्सेकर म्हणजे मधल्या वाडीतले की काय ?"अरुणने आश्चर्याने विचारले. 
"होय , इथे आलो होतो म्हटले भेटून जाऊ . कधी पर्यंत ड्युटी तुमची ?" त्याने विचारले.
"अरे या ड्युटीचा काय घेऊन बसलस. ती तर माझ्या पचवीक पुजली असा.दोन दिवस हयसून खय जावूक मिळत ना बघ"  शेवटी कोकणी माणूस भेटताच अरुणचा बांध फुटला.
"वाटलाच माका. युनिफॉर्मचो वास हयसर मारता बघा" तो हसत म्हणाला.
" मग काय तू धुवून देणार आहेस का ?" अरुण चिडला ."तुम्हाला काय माहित,  किती टेन्शन असते आम्हाला . जरा चुकीचे पाऊल उचलले की हंगामा होईल. घरी बाथरूमच्या दरवाजाची कडी तुटलीय ती लावायला वेळ नाहीय.घरी तरुण बायको आहे मुलगी आहे काळजी वाटते ." अरुण आता जास्तच चिडला होता .
"तरुण बायको ? "त्याने मिस्कीलपणे अरुणकडे खालून वर पाहत विचारले.
"कोकणातला ना रे तू ? मग तुका माहीत नाय ,प्रत्येक कोकणी माणसाक त्याची बायको नेहमीच तरुणच वाटता " असे बोलून जोरात हसला.
"बरे द्या, मी तुमचे कपडे धुवून आणतो "त्याने हात पुढे करत विचारले.
"काय तरी काय ? आणि काय नागडो बसून ड्युटी करू? थट्टेने बोललय मी , मनावर घेऊ नको आणि कपडे काढले तर आतील फाटकी बनियन दिसायची " अरुण पुन्हा हसला .
"काका मी घरून तुमचे कपडे घेऊन आलोय. हे घाला ." असे बोलून त्याने कडक इस्त्रीचा युनिफॉर्म त्याच्या हातात दिला.
" घरून इलास ता बोललस नाय. आमचो बाप्पा बसलो की नाय ? पूजा बिजा झाली काय ?? दोन वर्षा खूप कठीण गेली रे.मागच्या वर्षी तुझ्या काकीला करोना झाला .ती बाहेर ,मी ड्युटीवर,  पोरांनी सर्व केलान हो ."अरुण हळूच डोळे पुसत म्हणाला . 
"सर्व व्यवस्थित झाले काका. हे कपडे घाला तोवर मी हे अंगावरचे कपडे धुवून आणतो ."असे म्हणून तो अंगावरचा युनिफॉर्म घेऊन निघाला.
 कडक इस्त्रीचा युनिफॉर्म अंगावर चढवताच अरुणला खूपच फ्रेश आणि प्रसन्न वाटू लागले. जणू काही एक नवीन उर्जाच त्याच्या अंगात निर्माण झाली .थोड्या वेळाने तो धुतलेला युनिफॉर्म हाती घेऊन आला .
"काका मस्त दिसता हो. ते शूजही द्या . पॉलिश करून आणतो . "असे बोलून जबरदस्तीने शूज काढून घेऊन गेला . काही वेळाने त्याने चकचकीत पॉलिश केलेले शूज त्याच्या हाती दिले.
"आता कसे छान रुबाबदार दिसताय तुम्ही . आता हा प्रसाद घ्या " असे बोलून त्याने उकडीचा मोदक अरुण च्या हाती दिला.मोदक तोंडात टाकताच त्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
"काका तुमच्याच घरचा आहे . काकीने बनविलेला ." तो हसत म्हणाला .
खुश होऊन अरुणने हात जोडले."चल एक आठवण म्हणून सेल्फी काढू " असे बोलून अरुणने त्याच्यासोबत दोन सेल्फी घेतले.
"तुझा नंबर दे " अरुणने मोबाईल हातात घेत विचारले
"नंबर नाहीय माझ्याकडे .फोन बिघडलाय पण भेटीन ना मी तुम्हाला पुढे " तो म्हणाला आणि घाईघाईत निघून गेला.
"आलात का त्याचे कपडे धुवून ?" मखरात शिरताच उंदीर कुत्सितपणे म्हणाला . " शूजही पॉलिश करून दिले असतील ?"
"काय झाले रे त्यांची थोडी सेवा केली तर ? आज कित्येक वर्षे भोसले कुटुंब मनोभावे आपली सेवा करतात.अरुण बघ स्वतःचा घरचा गणपती सोडून लोकांचे गणपती कसे सुरक्षित राहतील त्याची काळजी घेतोय. करोनात कित्येक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती दिले पण जनतेची सेवा केली. मग एक दिवस आपण त्यांची सेवा केली तर काय हरकत आहे. त्याच्या घरी माझी वस्त्रे नेहमीच बदलली जातात आणि तुझीही .मग त्याने का दोन दिवस एकाच युनिफॉर्मवर राहावे. केली मदत त्यात काय " बेफिकीर स्वरात त्याने समोरचा मोदक उचलला.
"मग तू धुतलेस का ?" उंदराने कुतूहलाने विचारले
"छे. छे.. आपण कुठे काम करतो ? इकडचे तिकडे करतो फक्त.एका बाईला सांगितले ते पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत पण दोन दिवस युनिफॉर्म बदलला  नाही. तिने ताबडतोब धुवून दिला .तेच बूट पॉलिश साठी केले. लोक मदतीला नेहमी तयार असतात . फक्त आपण सांगत नाही " त्याने हसत हसत उत्तर दिले.
इथे मुलाने अरुणला फोन केला."काय हो बाबा कसलेही सेल्फी काय म्हणून पाठवता .एकट्याचा सेल्फी काढण्यापेक्षा गणपतीसोबत तरी काढून पाठवायचा ."
आपल्या सोबत सेल्फीत असणारा महादेव पार्सेकरचा मुलगा कसा दिसत नाही ? हाच प्रश्न पुढे दिवसभर अरुणला छळणार होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment