Monday, December 25, 2023

द लायन्स गेम

द लायन्स गेम
नेल्सन डेमिल
अनुवाद ..अशोक पाध्ये
मेहता पब्लिशिंग हाऊस
साल १९८६ लिबिया 
त्या रात्री लिबियातील अल अझीझिया गावात शांतता होती. लिबियाचा सर्वेसर्वा कर्नल गडाफी तेथे रात्रीच्या मुक्कामाला होता.त्याचवेळी अमेरिकन वायुदलातील चार विमाने त्या गावावर हल्ला करण्यास निघाली होती.चार विमानात एकूण आठजण होते. त्यांची नावे गुप्त राहणार होती.ठरल्याप्रमाणे हल्ला झाला .गावातील शंभरएक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. त्यात गडाफीची मुलगी , दोन मुले मारली गेली.कर्नल गडाफी आश्चर्यकारकरित्या वाचला.असद खलील हा सोळा वर्षाचा मुलगा ही त्यातून  वाचला.पण तोही आपल्या कुटुंबियांना वाचवू शकला नाही.
वर्तमानकाळ
लिबियातील त्या घटनेला बरीच वर्षे उलटून गेलीत.पोलीस अधिकारी जॉन कोरी एफबीआयच्या दहशतवाद विरोधी पथकात नुकताच कॉन्ट्रॅक्टवर जॉईन झाला होता.तो मूळात एक हुशार पोलीस ऑफिसर आहे. तिरसट ,वरिष्ठाना न जुमानणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याची ख्याती होती. आज त्याला पॅरिसहून येणाऱ्या एका दहशतवाद्याला आणायला विमानतळावर जायचे होते.त्याची सोबती केट वरिष्ठ एफबीआय ऑफिसर होती.
पॅरिसहून येणाऱ्या विमानाचा संपर्क टॉवरशी होत नव्हता. पण विमान रडारवर दिसत होते. शेवटी विमान धावपट्टीवर उतरले.पण आत सर्व प्रवासी कर्मचारी मृत झाले होते आणि कैदी निसटला होता . त्या कैद्याचे नाव होते असद खलील.
अरबी भाषेत असदचा अर्थ सिंह असा होतो.जो शांतपणे विचारपूर्वक आपल्या सावजाची शिकार करतो.आता असद खलील ही आपल्या सावजांची शिकार करण्यास सज्ज झालाय.त्याने सुरवातच विमानातील तीनशे लोकांना मारून केलीय.त्यानंतर त्याने एफबीआयच्या ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना ठार केलेय. आता तो पुढे निघालाय.तो नक्की काय करेल याविषयी कोणालाच माहीत नाही.
जॉन आपल्या पोलिसी बुद्धिमत्तेवर यामागे असदचा काय प्लॅन आहे ते शोधून काढतो. आता फक्त त्याला सापळ्यात अडकवायचे आहे .
लेखकाने अतिशय बारकाईने सगळा घटनाक्रम लिहिला आहे.त्यामुळे आपल्याला सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडतायत असे वाटते.एफबीआय ची कार्यपद्धती, विमानतळावरील आपत्कालीन परिस्थिती आल्यास कसे वागतात .विमाने  भाड्याने घेण्याची पद्धत, त्यात असणाऱ्या त्रुटी लेखकाने विस्तृतपणे लिहिल्या आहेत.
असदची मारण्याची पद्धत पाहून आपल्या अंगावर शहारे येतात .
पहिल्या पानापासून शेवटपर्यंत उत्सुकता आणि थरार वाढवणारे पुस्तक .

No comments:

Post a Comment