Thursday, March 7, 2024

साउंड ऑफ फ्रीडम

Sound Of Freedom
साउंड ऑफ फ्रीडम
रॉचीओ आणि मिगल ही रॉबेर्तोची दोन छोटी मुले.रॉचीओ ही साधारण आठ वर्षाची तर तिचा भाऊ मिगल साडे चार वर्षाचा.
एके दिवशी गिसेल त्यांना मॉडेलिंग करण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावते. तिथे अजूनही काही मुले असतात त्यामुळे रॉबेर्तो त्यांना परवानगी देतो.पण दुसऱ्या दिवशी तो तिथे पोचतो तेव्हा हॉटेलात कोणीही नसते .सर्व मुले आणि गिसेल नाहीशी झालेले असतात.
पोलीस अधिकारी टीम बेलार्ड कॅलिफोर्नियातील काही भागात छापे मारतो आणि त्याला तिथे मिगल सापडतो.साडेचार वर्षाच्या त्या गोड निरागस मिगलला पाहून टीम हादरून जातो.लैंगिक व्हिडिओ आणि इतर कारणांसाठी लहान मुलांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होतेय याची त्याला जाणीव होते.तो मिगलला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करतो तेव्हा मिगल त्याला आपल्या बहिणीचा शोध घेण्याची विनंती करतो.
टीम आपल्या परीने रॉचीओचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला लहान मुलांची तस्करी किती मोठ्या प्रमाणात आणि कोणकोणत्या कामासाठी होते याची माहिती मिळते.लहान मुलांचा गुलाम म्हणून वापर केला जातो .त्यांचे लैंगिक व्हिडिओ बनविले जातात ,लैंगिक अत्याचार होतात. त्यांना शोधण्यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत.या सर्वांवर मात करून टीम रॉचीओचा शोध घेईल का ??
चित्रपट लहान मुलांच्या तस्करीवर आधारित एक सत्यघटनेवर  आहे.पोलीस अधिकारी टीमच्या मागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी राहिली.पोलिसाची नोकरी सोड आणि त्या मुलांना सोडवून आण अशी त्याची पत्नी सांगते.
टीम हळवा आहे तो आपले अश्रू मुक्तपणे वाहू देतो.मोजकेच संवाद असलेला हा चित्रपट तुम्हाला अस्वस्थ करेल .तुम्हाला मध्येच उठून जावेसे वाटेल पण तुम्हाला ते टाळता येणार नाही .
 चुकवू नये असा हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर  इंग्रजी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment