Saturday, June 29, 2024

कोकेन बीयर

Cocaine Bear
कोकेन बियर
त्याने विमानातून साधारण तीनशे किलो कोकेनच्या बॅग्स जंगलात फेकल्या आणि नंतर पॅराशूट घालून उडी मारली पण त्याचे पॅराशूट उघडले नाही .कोकेन च्या बॅग्स त्या जंगलात विखुरल्या गेल्या.
त्या बॅग्स परत आणायची जबाबदारी काहींनी घेतली आहे आणि त्या जंगलात ते बॅग्स शोधायला निघाले आहेत.
त्या जंगलात तरुण जोडपे ट्रेकिंगला आले आहेत.त्यांना ते भले मोठे अस्वल दिसते. ते अस्वल त्यांच्यावर हल्ला करते आणि स्त्रीचा जीव जातो.
दोन लहान मुले जंगलात खेळायला येतात .त्यांना एक कोकेनचा बॉक्स सापडतो .ते थोडी कोकेन चाखून बघतात पण त्यांना चव आवडत नाही.अचानक एक भले मोठे अस्वल त्यांच्या समोर उभे राहते.त्याचे तोंड कोकेनने पांढरे झालेय.ते त्या मुलांच्या मागे लागते.मुलगा उंच झाडावर चढतो तर मुलगी खोल जंगलात पळून जाते.
मुलीची आई जंगल रेंजरकडे तक्रार घेऊन येते.रेंजर तिची तक्रार हलक्यात घेते.पण तिला घेऊन ते मुलांना शोधायला निघतात .अचानक अस्वल त्यांच्यावर हल्ला करते.
कोकेन खाऊन अस्वल नशेत धुंद झालाय .तो सर्वांवर हल्ले चढवितो आहे. जंगलात कोकेन परत मिळविण्यासाठी आलेले गुंड आहेत.त्यांच्यामागे पोलीस अधिकारी आहे . मुले हरवली आहेत .त्यांची आई ही जंगलात फिरतेय. तर अस्वलालाही कोकेनची नशा हवी आहे .तो ही कोकेनच्या शोधत फिरतोय आणि समोर येईल त्याला क्रूरपणे मारतोय .
याचा शेवट काय होईल ??
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत हा चित्रपट आहे.अस्वलाने हल्ला करतानाची दृश्य क्रूरपणे चित्रित केली आहेत.

Tuesday, June 25, 2024

महाराज

Maharaj
महाराज 
1832 साली गुजरातमधील एका छोट्या गावातील मुलजी  परिवारात करसनदासचा जन्म झाला .मुलजी परिवार वैष्णव संप्रदायातील . 
लहानपणापासून करसनदासला खूप प्रश्न पडायचे .पण दहा वर्षाचा असताना त्याची आई वारली आणि मामा मुंबईला घेऊन आला .
त्यावेळी बॉम्बे म्हणजे आताची मुंबई सात बेटात विखुरली होती.काळबादेवीत मोठ्या हवेल्या होत्या.तिथेच करसनदास मोठा झाला .पण प्रश्न विचारायची सवय काही जात नव्हती.त्यात दादाभाई नवरोजी सारख्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद त्याच्या मागे होता.तो आपल्या लेखातून समाजातील गंभीर प्रश्न मांडायचा .विधवा पुनर्विवाह ,जाती भेद यावर मते मांडायचा .
त्याचे किशोरीसोबत लग्न ठरले होते .आज होळी आहे .त्याला पहिला रंग किशोरीला लावायचा होता पण महाराज यदुनाथ उर्फ जेजेने रंग लावल्याशिवाय तुला रंगवायला देणार नाही असे किशोरीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते.
जेजेच्या हवेलीत होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो .जेजे स्वतःला ईश्वरी अवतार समजतो. त्यांच्यामुळे पंथाचा प्रसार भारतभर झालाय आणि खूप पैसा मिळतोय.लोकांची त्याच्यावर मनापासून श्रद्धा आहे . त्याचे उष्ट केलेले अन्न खाणे आपला गौरव समजतात .
जेजेची नजर आज किशोरीवर पडली आणि तिला चरणसेवेसाठी आमंत्रित केले.किशोरीच्या घरच्यांना ही गर्वाची गोष्ट वाटली .किशोरीलाही आनंद झाला .ती जेजेच्या खोलीत शिरली .चरणसेवा पहायची जेजे पैसे घेतो.त्याच्या खोलीला चहुबाजूंनी खिडक्या आहेत.
करसनदास किशोरीला शोधत जेजेच्या खोलीत शिरतो आणि तिला पाहून हादरतो .ती त्याच्यासोबत न जाता जेजेची चरणसेवा स्वीकारते.चिडून करसनदास लग्न मोडतो .पुढे किशोरीला सत्य कळते आणि ती चिट्ठी लिहून माफी मागते.
करसनदास जेजेचे सत्य लोकांपुढे आणायचे ठरवितो.तो सत्यप्रकाश नावाचा पेपर काढतो .जेजेचे साथीदार त्याला नेहमीप्रमाणे त्रास देतात पण करसन्दास हार मानीत नाही.तो पेपर मधून जेजे विरुद्ध लिहितो .आता जेजेच त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकतो .
करसनदास हा खटला जिंकेल का ?? धर्म भक्ती अंधविश्वास यात अडकलेले  लोक करसनदासला साथ देतील का ?? 
1862 साली मुंबई कोर्टात घडलेल्या सत्य घटनेवर हा चित्रपट आहे.
अमीर खानचा मुलगा जुनेद खानने या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे.करसनदास त्याने दमदारपणे रंगविला आहे.
जयदीप अहलावटने  जेजेच्या भूमिकेत छाप पाडली आहे.
हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

तो आणि ती

तो अस्वस्थपणे ब्रिजवर तिची वाट पाहत उभा होता. सारखी नजर घड्याळाकडे जात होती आणि भरून येणाऱ्या ट्रेनकडे. शेवटी ती त्याला दिसली. धावतपळत, लोकांचे धक्के चुकवत येणारी. दुरूनच एकमेकांची नजरानजर झाली आणि अपेक्षित हास्य दोघांच्याही चेहऱ्यावर फुलले.चेहऱ्यावर दिसणारा थकवा आणि कंटाळलेले भाव कुठच्या कुठे निघून गेले. ती जवळ आली. "किती हा उशीर"? ती गोड हसून "सॉरी" म्हणाली. तिच्या हास्याने त्याचा राग क्षणात विरघळला "नेहमीचे आहे तुझे,माझ्या आधी कधीच येणार नाहीस " तो लटक्या रागाने बोलला.

दोघेही बाहेर पडले "कुठे जाऊया "?? "माहित नाही, कुठेही चल, दोघे एकत्र आहोत हेच खूप आहे माझ्यासाठी" ती बोलली. मग दोघेही चालत निघाले. आज त्याला कोणाशीही कसलाही वाद घालायचा नव्हता म्हणून रिक्षा, टॅक्सी काही नको. म्हणून चालतच निघाले. न विसरता त्याने थांबून 10 रु चे शेंगदाणे घेतले "अरे वा... आज पगार झाला वाटते, म्हणून ही चैन का ?? तिने चिडवले. त्यानेही हसून मान डोलावली.

समोरच पार्क होता. मोकळ्या बाकावर बसले. काहीवेळ निःशब्द शांतता. वादळापुर्वीची नाही बरं! वादळ शमल्यानंतरची. तसेही रोज घरी एकमेकांच्या सहवासात असायचे पण मोकळा वेळ कधीच मिळायचा नाही. जे काही बोलायचे ते चेहऱ्यावरून आणि डोळ्यातून. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर भेटायची संधी मिळाली होती. त्यामुळे काही सुचत नव्हते.

हळूच त्याने बॅगेतून गजरा काढला तिच्या समोर केला "हे कशाला आता??" पण चेहऱ्यावरचा आनंद काही लपला नाही. "किती खर्च कराल? आईंची औषधे घेतलीत का?" असे म्हणून पाठमोरी वळली. त्याने तो कसातरी तिच्या केसात माळला. आज कोणाचीच भीती वाटत नव्हती. जे मनात येईल ते पूर्ण करणार होता तो."अजूनही साधा गजरा माळता येत नाही " असे बोलून तीने तो व्यवस्थित केला. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला भरून आले, एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटला. आजही काही बोलायचे नव्हतेच तिच्या सहवासाचा आनंद लुटायचा होता फक्त. तिचीही अवस्था वेगळी नव्हती.

वन रूम किचनच्या त्या खोलीत आयुष्य गेले. सासू , सासरे, नणंद आजूबाजुला. सकाळी 5 वाजता दिवस चालू व्हायचा. स्वतःची तयारी ,मग नवरा, मग मुलगा, दुपारचे जेवण करून ऑफिस ला निघायची, त्याचेही काही वेगळे नव्हते. घाई घाईत बाहेर पडायचे. बरे तिच्या ऑफिसला मोबाईल बंदी त्यामुळे संपर्क नाहीच.रात्री उशिरा घरी यायचे. आणि ही येता येता रात्रीच्या जेवणाची तयारी करत यायची. आल्या आल्या सगळ्यांचे चहा पाणी मग जेवणाची तयारी. तो एका कोपऱ्यात बसून तिच्या हालचाली पहायचा. त्याचे आपले बरे होते. हातात मोबाईल घेऊन टाईमपास करायचा पण तिला टाईमपास हि नव्हता. मध्येच ती त्याच्याकडे बघायची. त्याने पाहिले कि गोड हसायची. तिच्या ह्याच हसण्यावर विरघळलायचा तो. घरात कधीही बोलणे व्हायचेच नाही. खूप काही असायचे त्यांच्या मनात पण संसाराच्या या पसाऱ्यात काही सुचत नव्हते. दोघांनीही खूप स्वप्ने बघितली होती आणि बघत राहणार. पण सध्या एकमेकांशी मोकळेपणानी आणि निवांत बोलणे हे देखील एक स्वप्न झाले होते. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी जायचो. ती सर्व आवरून बाजूला यायची तेव्हा त्याची मध्यरात्र झालेली असायची.

शेवटी त्याने ठरविले काही झाले तरी बाहेर भेटायचेच. त्याने तिला सांगितले. पहिल्यांदा तिने अडचणींचा पाढाच वाचला पण शेवटी तयार झाली. पण त्यासाठीही आठवडा गेलाच. रोज काहीना काही काम निघत होते. तिचीही घालमेल त्याला दिसत होती. पण सर्व सोडून भेटणे तिला पटत नव्हते. रोज त्याच्या जवळपास असणारा वावर बघून ती समाधान मानायची. शेवटी आज तो दिवस आलाच. ते दोघेही गप्प बसून  होते काय काय बोलू हेच कळत नव्हते. मध्येच एकमेकांकडे बघून हसायचे. शेंगदाणे तोंडात टाकायचे.

एकमेकांसाठी वेळ दिला याचा आनंदच ते उपभोगत होते, इथे शब्दांना थारा नव्हता. सहवासाचे सुख दोघेही  लुटत होते. तिने अलगद आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकले.हा दिवस संपूच नये असेच दोघांनाही वाटत होते. एक मूकपणे अश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त करीत होती तर दुसरा आवंढा गिळत येणारे अश्रू थोपावत होता. शेवटी बऱ्याच वेळाने दोघेही उठले. काही न बोलता एकमेकांच्या हातात हाथ गुंफून चालू लागले.

बाजारात येताच तिच्यातील गृहिणी जागी झाली "उद्यासाठी भाजी घ्यायची आहे, मसालाही संपत आलाय" असे म्हणत दुकानात शिरली. खरेदी आटपून दोघेही घराजवळ आले. तो थांबला आणि तिचा हाथ पकडून म्हणाला "माफ कर मला, सध्यातरी इतकेच देऊ शकतो तुला."  त्याच्या हातावर हात ठेऊन ती पुन्हा गोड हसली त्या हास्यातच खूप काही दडले होते. एक आनंदाचा ठेवा घेऊनच दोघे घरात शिरले परत आयुष्याला सामोरे जाण्यासाठी.

रे

Ray
रे
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे केवळ उत्कृष्ट दिग्दर्शक नव्हते तर उत्तम रहस्यकथाकार ,गूढकथाकार होते.त्यांची फेलुदा पुस्तक सिरीज तर प्रसिद्ध आहे. यावेळी रे नावाच्या सिरीजमध्ये त्यांच्या चार कथा आहेत.
1 फॉरगॉट मी नॉट ...सुप्रसिद्ध तरुण बिझनेसमन इप्सित नायरला पार्टीत एक सुंदर तरुणी भेटते.ती तरुणी त्याला काही वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये तिच्या सहवासात घालवलेल्या दिवसांची आठवण करून देते .आपल्या प्रखर स्मरणशक्तीवर विश्वास असलेल्या इप्सितला ही घटना मात्र आठवत नसते.पण हळूहळू अचानक भेटलेले मित्र त्याला या गोष्टीची आठवण करून देतात तेव्हा तो पुन्हा चक्रावतो. खरोखरच ती घटना घडलीय ? मग त्याला आठवत का नाही ? 
2 बहुरूपीया....इंद्रशीष एक मामुली क्लार्क .तसा तो पार्ट टाईम रंगभूषाकार आहे. गरिबीत राहत असताना त्याला आपल्या लांबच्या आजीकडून भरपूर संपत्ती मिळते आणि त्यासोबत एक रंगभूषेचा ग्रंथ .त्या ग्रंथाच्या मदतीने तो आपले रूप बदलून मनातील इच्छा पूर्ण करतो .एक दिवस तो रस्त्यावरच्या पीरबाबाला चॅलेंज करायला जातो .मग...??
3 हंगामा है क्यो बरपा.. मुसाफिर अली प्रसिद्ध गजल गायक.त्या दिवशी तो ट्रेनच्या पहिल्या वर्गातून भोपाळवरून दिल्लीला जात होता.बेग त्याचा सहप्रवासी .मुसाफिर अली  त्याला ओळख दाखवितो पण बेग त्याला ओळखत नाही .बेग पूर्वीचा कुस्तीगीर आहे.पण दारासिंह विरुद्ध कुस्ती खेळून आपली कारकीर्द संपली असे सांगतो . आता तो क्रीडा पत्रकार आहे. बोलता बोलता दहा वर्षांपूर्वी असाच प्रवास करताना आपले एक खास घड्याळ सहप्रवाश्याने चोरले असे सांगतो . ते ऐकून मुसाफिर अली घाबरतो आणि भूतकाळात जातो .काय आहे मुसाफिर अली चा भूतकाळ ?
4 स्पॉटलाईट...विक्रम अरोरा सुपरस्टार आहे.एका शहरात तो शूटिंगसाठी आलाय. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याच्यासाठी  स्पेशल सुईट अर्रेंज केलाय. पण मध्येच दीदीने प्रवेश केला .आता तो मागे पडला आणि शहरात फक्त दीदीचा जयजयकार चालू झालाय .पहिल्यांदाच विक्रमकडून त्याचा स्पेशल सुईट काढून तो दीदीला दिला.फिल्मचा निर्माता ही दिदीचा आशीर्वाद घेतोय.दीदी त्या हॉटेलात थांबलीय म्हणून तिथे नॉनव्हेज बनविले जात नाही.दीदीसाठी स्विमिंग पूल राखून ठेवला गेलाय .जिम ही फक्त दीदीसाठी आहे.हे सगळे पाहून विक्रम चिडलाय.दीदीमुळे आज त्याला कोणीही विचारत नाही. इतकेच काय त्याचे शूटिंग ही दीदीच्या संमतीशिवाय ओके होत नाही .तो संतापून दीदीला भेटायला जातो आणि त्याला अनपेक्षित धक्का बसतो ..
अली फझल, के के मेनन , मनोज वाजपेयी ,हर्षवर्धन कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चार वेगवेगळ्या कथा असलेली आणि चारच भागात असलेली ही सिरीज तुम्हाला धक्के देत राहील .नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे .

ट्रिगर वॉर्निंग

Trigger Warning
ट्रिगर वॉर्निंग
पार्कर एक स्पेशल फोर्स कमांडो . दहशतवाद विरोधी  कारवाई  करीत असताना तिला आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळते.
ती ताबडतोब आपल्या गावी येते. तिचे वडील हॅरी यांनी आत्महत्या केलीय असे प्रथम दर्शनी रिपोर्टमध्ये असते.त्यांना स्मृतिभंश होतात असे ही तिला सांगण्यात येते. तिचा पूर्वीचा प्रियकर आणि गावाचा शेरीफ तिला हेच सांगतो .
तिच्या वडिलांची मोठी प्रॉपर्टी असते.त्यांच्या घराखाली काही भुयारे असतात आणि ती दूरवर पसरलेली असतात.पण हॅरीला सर्व तोंडपाठ असतात.एक भुयार कोसळून त्याखाली हॅरीचा मृत्यू होतो.
तिचा यावर विश्वास बसतो पण हॅरीने भुयारात कॅमेरे लावलेले असतात. गावात  सेनेटर स्वानच्या मुलांकडे ती अत्याधुनिक मशिनगन पाहते. तिला याचे आश्चर्य वाटते आणि ती या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरविते. त्यातूनच तिला आपल्या वडिलांविषयी एक सत्य कळते.
जेसीका अल्बा बऱ्याच काळाने कमांडो पार्करच्या शूर आणि तडफदार दिसली आहे .चित्रपट पाहिल्यापासून वेगवान आहे.जेसीका अल्बाचे ऍक्शन सीन खूप छान चित्रित केले आहे.
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे .