Friday, December 1, 2017

कोणतरी देशपांडे

अमेयने स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचे ठरविले होते.त्याचे आईवडील उच्चशिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे नोकरी करून निवृत्त झाले होते .स्वतः इंटेरियर डिझायनर असलेला अमेय मेहनती होता. नव्या उद्योगाचा शुभारंभ करताना त्याने मला ,विक्रमला आणि आमचा एक उद्योजक  मित्र संजय कानडे  याना आमंत्रण दिले. तिथे अमेयने आम्हास अनुभवाचे चार शब्द बोलायची विनंती केली मी अर्थात नेहमीप्रमाणे मागेच राहिलो पण कानडेने नवीन उद्योगावर फार सुंदर व्याख्यान दिले . विक्रम कितीही हरामखोर असला तरी अँडमिनिस्ट्रेशनमध्ये उत्कृष्ट होता हे मानावेच लागेल . त्याचे भाषण उत्तमच झाले .
दुसऱ्या दिवशी अमेय आमच्या कट्ट्यावर आला . त्याने विक्रमच्या हातात छोटे गिफ्ट पॅक दिले आणि माफी मागितली ."काल घाईगडबडीत तुमचे आभार मानायचे राहूनच गेले म्हणून हे छोटे गिफ्ट आता आणले तुमच्यासाठी".
विक्रमने खुश होऊन माझ्याकडे पाहिले. ते गिफ्ट म्हणजे एखादे पुस्तक वाटत होते. न राहवून विक्रम म्हणाला", काय आहे यात ..."??
तसे अमेयने उत्तर ",दिले पुस्तक आहे ..??
"हे बघ ....इंग्लिश असेल तर घेऊन जा". विक्रमचे सडेतोड उत्तर .
"नाही मला माहित नाही"अमेय हसून म्हणाला.
" माहीत नाही म्हणजे ..."?? विक्रम ने थोडा आवाज चढविला.
"माहीत नाही हो .....!कोणत्यातरी देशपांडेचे पुस्तक आहे .मी बुकस्टॉलमध्ये गेलो आणि त्याला एक चांगले पुस्तक पॅक करून द्यायला सांगितले. तो म्हणाला देशपांड्यांचे देतो . मी म्हटले ओके. बुकस्टॉलवाल्याने पॅक केले मी घेऊन आलो". असे म्हणून अमेयने कल्टी मारली.
"च्यायला कोण हा देशपांडे ...?? नवीन आलाय का..???आपल्याला तर पु.ल. देशपांडे माहितीय ". असे बोलून विक्रमने पॅकेट उघडले आणि त्यातून पु.ल. देशपांडे यांचे मैत्र पुस्तक बाहेर पडले .आम्ही एकमेकांकडे हताशपणे पाहत राहिलो.
© श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment