Monday, December 4, 2017

भंडारा

आज सकाळी fb वर योगेश राऊत यांची पोस्ट आली आणि त्यावरून ही कथा सुचली . धन्यवाद योगेश

"कुठे निघालास ......"??? मला तयार होताना पाहून विक्रमने डोळे वटारत शंकाखोर प्रश्न विचारला.
मी म्हटले "खाली चाललोय ...."
"भाऊ .....आज रविवार असला तरी दत्तजयंती आहे विसरू नकोस".विक्रमने हसत म्हटले.
"अरे खाली भंडारा आहे .तिथे चाललोय .ही आधीच पुढे गेलीय. मला निरोप पाठवला म्हणून निघालो . तुझ्या मनात तेच असते का रे... ??? आणि तुझ्या कडे भंडारा नाही का ?? तू इतका फ्री कसा ..." ??
त्याने हसून खांदे उडविले ",झाले माझे काम. चल मी येतो ....जाऊ दोघे .असे म्हणत तो ही बाहेर पडला.
आम्ही दोघे शेजारच्या सोसायटीत शिरलो. तिथे दत्तजयंतीचा उत्सव चालू होता . वातावरण उत्साहाने भरले होते . सगळेजण नवीन कपडे घालून इकडेतिकडे फिरत होते .तरुण तरुणी एकत्र सेल्फी काढत होते .भंडारा चालू होता तिथे मोठी रांग लागली होती . एक कोपऱ्यात खूप चिखल झालेला होता . त्याच्या आजूबाजूलाच थर्माकोलच्या प्लेट्स पडल्या होत्या . त्यात बरेसचे अन्नही होते . त्याच्याच आजूबाजूला बरेचजण जेवतही होते .मुख्य पंगतीत सहज लक्ष गेले तेव्हा तर मला धक्काच बसला . कार्यकर्ते हवे तसे जेवण वाढत होते . समोर कोण लहान मोठा आहे याचे भानही नव्हते . खूपसे अन्न वाया जात होते . कोण नुसतीच पुरीभाजी खत होता.तर कोण पुलाव.पण ताटात सर्व पदार्थ दिसत होते .
मी न राहवून एक कार्यकर्त्याला विचारले" अरे किती वाढता आहात....?किती अन्न फुकट जातेय . जरा कंट्रोल करा .
त्याने हातातील मोबाइलकडे पाहत उत्तर दिले "काय करणार भाऊ ....?? बघा ना किती गर्दी आहे ...?. खूप धावपळ होतेय .सकाळपासून कामे करतोय आम्ही ".
शेजारी प्लास्टिक ग्लासेसचा खच पडला होता.एकूणच कोणालाच कसली फिकीर नव्हती . मला ते पाहूनच उबग आला .जेवायची इच्छाच मरून गेली.हताशपणे मी विक्रमकडे पाहिले तो छद्मीपणे हसत होता.
मी चिडून म्हटले "तुझ्याकडेही हेच असेल म्हणून आलास माझ्याकडे... ?
तो म्हणाला ",नाही रे ...! उलट मीच तुला माझ्याकडे घेऊन जायला आलो होतो.पण तू इथे आलास .हरकत नाही चाल माझ्याकडे ".
मी सौ.ला सांगून विक्रमच्या गाडीवर बसलो . विक्रमच्या सोसायटीत ही रोषणाई केली होती पण तिथे बरीच शांतता होती . विशेष म्हणजे परिसर स्वछ होता . घाई गडबड कुठेच दिसत नव्हती . ऐके ठिकाणी लोक शांतपणे रांग लावून उभे होते . स्पीकर वर छान साईबाबांची गाणी बारीक आवाजात चालू होती.मीही रांगेत उभा राहिलो .दोन कार्यकर्ते प्रत्येकाच्या हातात एक बॉक्स आणि छोटी पाण्याची बॉटल देत होते . आणि हात जोडून सर्वाना बाहेर खाण्याची विनंती करीत होते .मीही बॉक्स आणि पाण्याची बॉटल घेतली आणि विक्रमच्या घरी गेलो.
तिथे विक्रमला विचारले", हा काय प्रकार.. ??
तो म्हणाला "हाच महाप्रसाद भंडारा . लोकांना जेवण किंवा प्रसाद पार्सल देऊ ही माझी कल्पना. कुठे गडबड नाही ,अन्न फुकट जाणार नाही . प्लेट्स आणि ग्लासेसचा कचरा नाही . वाढायची कटकट नाही . एक बॉक्स ऐवजी दोन घ्या पण घरी जाऊन किंवा दुसरीकडे जाऊन खा पण इथे नको.  जेवताना दव समोरच पाहिजे असे कुठे लिहिले नाही .बघितलेस ना सर्व कसे आरामात आणि शांतपणे चालू आहे ".
"अरे.... पण हे सर्व करायला मेहनत ही तेव्हडी लागते मी शंका काढलीच .
"कसली मेहनत भाऊ ...?? अरे सोसायटीत तीन केटरर्स आहेत .दोन बाहेरचे .प्रत्येकाला दोनशे पार्सलची ऑर्डर दिली . आपलीच माणसे म्हणजे  चांगल्या जेवणाची खात्री  आणि त्यांनाही ऑर्डर मिळाली . जितके पैसे जमले  त्यात पार्सल फिट केले .
" पण भांडाऱ्याला सगळेच पैसे देत नाहीत .काही वस्तू ही देतात ".मी काही मागे हटायला तयार नव्हतो .
" हो ना ..!! आम्ही आलेल्या वस्तू त्यांना दिल्या सर्वांचा हिशोब करून बॉक्स  बनविले". विक्रमही काही कमी नव्हता .
"पण बॉक्स कमी पडले तर ..??
"कसले रे भाऊ ...?? त्या बॉक्समध्ये एक जण पोटभर जेवेल इतके पदार्थ आहेत . आणि घेऊन गेले तर अन्न फेकून देण्याची हिम्मत होणार नाही . दरवर्षी हजार माणसे जेवतात पण अन्न खूप वाया जाते आजही हजार बॉक्स झाले पण गेल्यावर्षीच्या तुलनेत आम्हाला खूपच कमी खर्च झाला .उलट आम्ही अजून दोनशे बॉक्स देऊ शकतो . तुला पाहिजे तर अजून एक घेऊन जा . सकाळी घेऊन जाशील ऑफिसला ".
"  खरेच विक्रम ...काही बाबतीत तुझे डोके भन्नाट चालते आता बघ ना ...तुझ्याकडे बाबांचे दर्शनही मनासारखे होते आणि प्रसादही पुरेसा पोटभर मिळतो... . पुढच्यावर्षी आमच्याइथेही हीच संकल्पना राबवतो "असे बोलून मी शांतपणे जेवू लागलो .

© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment