Thursday, December 14, 2017

डिजिटल लग्न

व्हाट्सअँपवर अग्निहोत्रीसाहेबांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण पाहून मी थोडा चकित झालो.ते माझे बॉस. त्यामुळे रोजचा संबंध.असे असूनही डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना व्हाट्सअँप वरून आमंत्रण देणे थोडे विचित्रच वाटत होते.त्यात माझे आणि त्यांचे संबंध खूप जुने आणि घरचे . निदान मला तरी त्यांच्याकडून पत्रिकेची अपेक्षा होती.थोडा नाराज होऊनच मी त्यांना केबिन मध्ये भेटायला गेलो.
मला पाहताच ते खुश झाले."या भाऊ !!.बसा..आमंत्रण मिळाले ना ..?? लग्नाला नक्की या.
मी म्हटले "हो साहेब ....आताच मेसेज आला तुमचा .पण पत्रिका छापल्या नाहीत का ...?? आपण डिपार्टमेंटमध्ये पत्रिका लावतो.नेहमीची पद्धत आहे आपली.
"वाटलेच तुम्ही विचारणार मला" ते थोडे गंभीर झाले. "भाऊ आम्ही रियाचे लग्न डिजिटल करायचे ठरविले आहे... ???
" काय ....?? डिजिटल लग्न ..?? ही काय भानगड आहे ...?? मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
"आम्ही एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे .संपूर्ण लग्न डिजिटल पद्धतीने होईल. तू जर मेसेज नीट पाहिलास तर तुला मेसेजमध्ये लिंक दिसेल . त्या लिंकवर तू क्लीक केलेस तर तुला काही प्रश्न विचारण्यात येतील त्या तू हजर राहणार का.. ? किती माणसे येणार.?नाही हजर राहणार तर तुझा ऍड्रेस... घरात किती माणसे आहेत ..??असे प्रश्न असतील . तू मुलीकडून असलास तर मुलीचा बँक अकाउंट नंबर.तिच्या घरचा ऍड्रेस असेल".
"हे सर्व कशासाठी.."??मी उत्सुकतेने विचारले.
"याची बरीच कारणे आहेत.काहीजणांना वेळ नसतो.काही आयत्यावेळी प्लॅन बदलतात.काहींना गर्दी .वाट पाहणे पसंद नसते .आता तू प्रत्यक्ष हजर राहणार असे तिथे नोंद  केलेस तर तुम्ही सांगाल तितक्या माणसांचे जेवण ठेवण्यात येईल . अशा प्रकारे  माणसांचे जेवण ठरविणे सोपे जाईल .काहीजणांना रांगेत उभे राहून आहेर देणे पटत नाही .त्यामुळे वेळ खूप जातो .म्हणून तुमचा आहेर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकता .काहीजणांना आहेर द्यायचा असतो पण प्रत्यक्ष हजर राहायला जमणार नसते तेव्हा त्यांनी आहेर दिला की ताबडतोब त्यांच्या घरी जेवणाचे पार्सल जाईल याची ही व्यवस्था केली आहे.
"ते कसे बुवा ...?? माझी उत्सुकता काही संपत नव्हती.
"त्या कंपनीने जी लिंक तयार केली आहे ती वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी जोडली आहे . तुम्ही हजर नाही राहणार असे लिहून दिले असेल आणि तरीही तुम्ही ऑनलाइन आहेर दिलात की त्याचे नोटिफिकेशन जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टरला जाईल . तो तुमचा ऍड्रेस पाहून आणि किती माणसे आहेत हे पाहून जेवण तुमच्याघरी पार्सलने पाठवेल .दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण लग्न सोहळा या लिंक वरून तुम्हाला ऑनलाइन दिसेल.तुम्ही लग्न ऑनलाइन बघता आहात हे ही आम्हाला कळेल आणि त्याची नोंद होत जाईल.त्यासाठी हॉलमध्ये सगळीकडे कॅमेरे लावले आहेत" .
"पण सगळ्यांनाच हे जमणार नाही आणि तुमचे नातेवाईक प्रत्यक्ष हजर राहणारच ना"..?मी नेहमीप्रमाणे शंका काढलीच.
"हो ..जे प्रत्यक्ष हजर राहतील त्यांनाही वधूवराना भेटता येणार नाही उलट वधूवरच त्यांना खाली येऊन भेटतील . ते स्टेजवर उभे राहणार नाहीत. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतील.त्यांच्याशी गप्पा मारतील . त्यांच्याबरोबर सेल्फी काढतील. लोकांचा वेळ ही वाचेल."
"अरे बापरे ...! हे असेही असते का ?? पण काहीजणांना वस्तुरूपात आहेर द्यायचा असेल त्याचे काय .."?? माझे प्रश्न संपत नव्हते.
"ज्यांना वस्तू द्यायच्या असतील त्यांनीही ऑनलाइन डायरेक्ट वधू वरांच्या घरी पाठवून द्याव्या. त्यासाठी पत्ताही दिला आहे . शिवाय आम्हालाही कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचे असेल तर आम्हीही त्यांच्या अड्रेसवर पाठवू म्हणजे इथे कोणाचे मानपान नको" साहेबांकडे उत्तर तयारच होते .
" ते ठीक आहे हो ...पण लग्न म्हटले की आनंद सोहळा असतो . नाचगणे असते . नटणे मुरडणे असते" मी काय साहेबांना सोडायला तयार नव्हतो.
"हो ...ते सर्व आहे . मेहंदी ,हळद वरात सर्व काही आहे . तेही कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे आणि जो हजर राहणार नाही त्यांना ते ऑनलाइन दिसेलच .आम्ही फक्त लोकांचा वेळ आणि नको त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतोय . माझी आई अंथरुणावर असते तिला हॉलवर आणणे शक्य होणार नाही त्यामुळे ती घरातील टीव्ही वर सर्व सोहळ्याचा आनंद घेईल."
"ठीक आहे ...असे बोलून मी उठलो.
" हे बघ भाऊ ....मला कळतंय तुम्हालाहे  पटत नाही .आहो मलाही पटत नाही .पण हल्लीच्या फास्ट जीवनात लग्नासाठीही पूर्ण दिवस देणे कोणाला जमत नाही . काही स्वखुशीने येतात.तर काही इच्छा नसताना हजर राहतात . तर काही मानापमानासाठी येतात.सर्वाना खुश करण्याचा हा एक प्रयत्न आहे . त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतलीय इतकेच . मला तर भीती वाटते की आपल्या नातवंडांची लग्ने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच होतील. नवरा नवरी तरी प्रत्यक्ष स्वतःच्या लग्नाला हजर राहतील का.." ??
मी खेदाने हसून मान डोलावली आणि केबिन बाहेर पडलो .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment